नोटाबंदीवरून कॉंग्रेस नेते रडकुंडीला ः पंतप्रधान

0
100

नोटाबंदीवरून कॉंग्रेसकडून केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून सतत लक्ष्य केले जात असतानाच काल येथील निवडणूक प्रचार सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर या विषयावरून घणाघाती टीका केली. नोटाबंदीमुळे कॉंग्रेस नेते रडकुंडीला आले अशा शब्दात मोदी यांनी खिल्ली उडवली.
भ्रष्टाचार, जातीयवाद व घराणेशाही या सगळ्यांना कॉंग्रेसशी जवळचा संबंध आहे आणि त्या गोष्टीला आमचा विरोध असल्याने कॉंग्रेसने आपले धोरण आमच्या विरोधात ठेवले आहे. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या स्वराज संस्थांच्या निवडणुकांतील निकालांवरून आमच्यावर टीका करणार्‍या कॉंग्रेसला उत्तर मिळाले आहे असा दावा त्यांनी केला. आता गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून भाजपने काय केले आहे, असा सवाल विचारला जात आहे. तथापि गेल्या तब्बल ७० वर्षांत कॉंग्रेसने देशासाठी काय केले याचे उत्तर कॉंग्रेस नेत्यांनी द्यावे, असे मोदी म्हणाले.