नॉर्थईस्ट-ब्लास्टर्समध्ये नीरस गोलशून्य बरोबरी

0
124

हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात शुक्रवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यातील लढत नीरस खेळामुळे गोलशून्य बरोबरीत सुटली. नॉर्थईस्टचे गोल करण्याच्या आघाडीवरील अपयश कायम राहिले.

नॉर्थईस्टला नॉर्थईस्टला १४ सामन्यांत केवळ नऊ गोल करता आले आहेत. ब्लास्टर्सचा हा आकडा २३ असला तरी त्यांना २७ गोल पत्करावे लागले आहेत. दोन्हीसंघांच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या होत्या.

नॉर्थईस्टला १४ सामन्यांत सहावी बरोबरी पत्करावी लागली. दोन विजय, सहा पराभव आणि सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १२ गुण झाले. त्यांचे शेवटून दुसरे नववे स्थान कायम राहिले. ब्लास्टर्सला १६ सामन्यांत सहावी बरोबरी पत्करावी लागली. तीन विजय, सहा बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १५ गुण झाले. त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.

एफसी गोवा संघाने बाद फेरीतील स्थान नक्की केले आहे. १६ सामन्यांतून त्यांचे सर्वाधिक ३३ गुण आहेत. एटीके एफसी (१५ सामन्यांतून ३० गुण) दुसर्‍या, गतविजेता बेंगळुरू एफसी (१५ सामन्यांतून २८) तिसर्‍या, तर मुंबई सिटी एफसी (१६ सामन्यांतून २६) चौथ्या स्थानावर आहे. बाद फेरीच्या शर्यतीत चेन्नईन एफसी (१४ सामन्यांतून २१) आणि ओडिशा एफसी (१५ सामन्यांतून २१) यांना संधी आहे.
पहिल्या सत्रात एकमेव उल्लेखनीय क्षण अंतिम टप्यात आला. ४५व्या मिनिटाला ब्लास्टर्सला फ्री-किक मिळाली. सर्जिओ सिदोंचाने मारलेल्या फटक्यावर मौहमदौ ग्‌निंगने हेडिंग केले, पण नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉयने अचूक अंदाज घेत योग्य जागी थांबून हा प्रयत्न अपयशी ठरविला.
वेन वाझ याने होलीचरण नर्झारीला पाडल्यामुळे ब्लास्टर्सला ही संधी मिळाली होती. त्यावेळी वाझला यलो कार्डला सामोरे जावे लागले होते.

ब्लास्टर्सने १५व्या मिनिटालाही एक प्रयत्न केला होता. त्यावेळी बचाव फळीतील जेसील कार्नेरीओ याने घेतलेल्या कॉर्नरवर मध्य फळीतील सैत्यसेन सिंगने चेंडू मारला, पण अचूकतेअभावी हा प्रयत्न वाया गेला.

दुसर्‍या सत्रातील उल्लेखनीय क्षण प्रारंभीच आला. ४९व्या मिनिटाला फेडेरीको गॅलेगोच्या पासवर निखील कदम याने केलेला प्रयत्न ब्लास्टर्सचा नवा गोलरक्षक बिलाल हुसेन खान याने रोखला.