नॉर्ते, सेकंड, मुथूसामीचा समावेश

0
70

>> भारत दौर्‍यासाठी आफ्रिकेचा कसोटी संघ जाहीर

दक्षिण आफ्रिकेने आपल्या टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याच्याकडे सोपविले आहे. द. आफ्रिकेच्या भारत दौर्‍यात तो संघाचे नेतृत्व करेल. जलदगती गोलंदाज ऍन्रिक नॉर्ते, फलंदाज तेंबा बवुमा व ब्यॉर्न फॉच्युईन या तीन नव्या चेहर्‍यांना टी-ट्वेंटी संघात निवडण्यात आले आहे. फाफ ड्युप्लेसीचा टी-ट्वेंटी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

टी-ट्वेंटीसाठी आपली उपलब्धता कळवूनही डेल स्टेनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. टी-ट्वेंटीनंतर होणार्‍या कसोटी मालिकेसाठी तेंबा बवुमा याला उपकर्णधार करण्यात आले आहे, असे क्रिकेट साऊथ आफ्रिकाचे कार्यवाहू क्रिकेट संचालक कॉरी व्हॅन झिल यांनी सांगितले. कसोटी संघात ऍन्रिक नॉर्तेसह यष्टिरक्षक फलंदाज रुडी सेकंड व डावखुरा संथगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू सेनुरन मुथूसामी याची निवड करण्यात आली. देशांतर्गत चारदिवसीय क्रिकेटमधील स्पर्धेत ५४ बळी घेतलेला ऑफस्पिनर डॅन पिद संघात परतला आहे.

फ्रेंचायझी चारदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलेल्या झुबेर हमझा यालादेखील निवडण्यात आले आहे. टी-ट्वेंटी सामने १५,१८ व २२ सप्टेंबर रोजी खेळविले जाणार आहेत. यानंतर २ ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

कसोटी संघ ः फाफ ड्युप्लेसी, तेंबा बवुमा, थ्युनिस डी ब्रुईन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबेर हमझा, केशव महाराज, ऐडन मार्करम, सेनुरम मुथूसामी, लुंगी एन्गिडी, ऍन्रिक नॉर्ते, व्हर्नोन फिलेंडर, डॅन पिद, कगिसो रबाडा व रुडी सेकंड.

टी-ट्वेंटी संघ ः क्विंटन डी कॉक, रस्सी वेंडर दुसेन, तेंबा बवुमा, ज्युनियर डाला, ब्यॉर्न फॉच्युईन, ब्युरन हेंड्रिक्स, रिझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ऍन्रिक नॉर्ते, आंदिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी व जॉन जॉन स्मट्‌स.