नेहराला टीम इंडियाचा विजयी निरोप

0
125

>> पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ५३ धावांनी मात

>> रोहित-धवनची १५८ धावांची भागीदारी

टी-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडीत करताना भारताने बुधवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ५३ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०२ धावा कुटल्यानंतर भारताने किवीज संघाचा डाव १४९ धावांपर्यंत मर्यादित ठेवला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या आशिष नेहराने ४ षटकांत २९ धावा देत निरोप घेतला.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर रोहित व धवन यांनी भारताला १५८ धावांची मोठी सलामी दिली. याच सलामीच्या बळावर भारताने द्विशतकी वेस ओलांडली. ईश सोधी वगळता न्यूझीलंडचे इतर गोलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा डावाच्या सुरुवातीपासून आवश्यक धावगती राखणे शक्य झाले नाही. अक्षर पटेलने आपल्या ४ षटकांत २० धावा देताना २ गडी बाद करत आपल्या गोलंदाजीवर एकाही चौकाराची नोंद होऊ दिली नाही. चहलने २६ धावांत २ फलंदाजांना माघारी धाडत प्रभाव पाडला. नेहराला गडी बाद करता आला नसला तरी सामन्यात खेळलेल्या वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची इकॉनॉमी सर्वोत्तम ठरली.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. लेथम गो. बोल्ट ८० (५५ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार), शिखर धवन झे. लेथम गो. सोधी ८० (५२ चेंडू, १० चौकार, २ षटकार), हार्दिक पंड्या झे. लेथम गो. सोधी ०, विराट कोहली नाबाद २६ (११ चेंडू, ३ षटकार), महेंद्रसिंग धोनी नाबाद ७ (२ चेंडू, १ षटकार), अवांतर ९, एकूण २० षटकांत ३ बाद २०२
गोलंदाजी ः मिचेल सेंटनर ४-०-३०-०, ट्रेंट बोल्ट ४-०-४९-१, टिम साऊथी ४-०-४४-०, कॉलिन डी ग्रँडहोम ३-०-३४-०, ईश सोधी ४-०-२५-२, कॉलिन मन्रो १-०-१४-०
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. पंड्या गो. चहल ४, कॉलिन मन्रो त्रि. गो. भुवनेश्‍वर ७, केन विल्यमसन झे. धोनी गो. पंड्या २८ (२४ चेंडू, १ चौकार, १ षटकार), टॉम लेथम यष्टिचीत धोनी गो. चहल ३९ (३६ चेंडू, ३ चौकार, १ षटकार), टॉम ब्रूस झे. शर्मा गो. पटेल १०, कॉलिन डी ग्रँडहोम झे. धवन गो. पटेल ०, हेन्री निकोल्स धावबाद ६, मिचेल सेंटनर नाबाद २७ (१४ चेंडू, २ चौकार, २ षटकार), टिम साऊथी झे. धोनी गो. बुमराह ८, ईश सोधी नाबाद ११, अवांतर ९, एकूण २० षटकांत ८ बाद १४९
गोलंदाजी ः आशिष नेहरा ४-०-२९-०, युजवेंद्र चहल ४-०-२६-२, भुवनेश्‍वर कुमार ३-०-२३-१, जसप्रीत बुमराह ४-०-३७-१, अक्षर पटेल ४-०-२०-२, हार्दिक पंड्या १-०-११-१

अनिल चौधरींची वादग्रस्त निर्णय
भारत व न्यूझीलंड सामन्यासाठी तिसरे पंच म्हणून भूमिका बजावलेले अनिल चौधरी नवीन वादात सापडले आहे. रोहित शर्मा ८० धावांवर खेळत असताना किवीज गोलंदाज बोल्टने त्याच्याविरुद्ध झेलबादचे जोरदार अपील केले. यानंतर मैदानी पंचांनी निर्णय तिसर्‍या पंचांकडे सोपविला. तिसरे पंच चौधरी यांनी बॅट जमिनीवर आदळल्याचे सांगून चेंडूचा बॅटला स्पर्श झाला नसल्याचे सांगत मैदानी पंचांना आपला ‘नाबाद’ निर्णय कळवला. परंतु, ‘स्निको’मध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसताच न्यूझीलंडने ‘रिव्ह्यू’ मागत चौधरी यांना आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले.