नेमाडे

0
550

– डॉ. वासुदेव सावंत
सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्याला रा. रा. भालचंद्र नेमाडे यांच्या नावाने मिळाल्याची बातमी ऐकताच मराठी साहित्याचा एक अभ्यासक आणि नेमाडे यांच्या साहित्याचा निस्सीम प्रेमी म्हणून व्यक्तिश: मला खूप आनंद झाला. माझ्यासारख्या अनेक नेमाडेप्रेमी मित्रांनी ङ्गोनवरून त्यांच्या आनंदात मलाही सहभागी करून घेतले. नेमाडेंना पुरस्कार मिळाल्याचे ऐकल्यावर ते गोव्यात असताना लाभलेला त्यांचा सहवास, त्यांच्याशी केलेल्या (केलेल्या म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकलेल्या) साहित्यविषयक चर्चा, त्यांच्याबरोबर मी, डॉ. कोमरपंत, कधी लेखक चंद्रकांत गवस यांनी केलेली गोव्यातली भटकंती-भ्रमंती, एक ज्येष्ठ मित्र या नात्याने त्यांनी दाखविलेली आपुलकी, त्यांच्या बोलण्यातला मार्मिक मिस्किलपणा अशा अनेक गोष्टींच्या आठवणींचा एक पटच मनात तरळून गेला.त्यावेळी मी नेमाडे यांच्याच ‘कोसला’ कादंबरीवर पीएच.डी.साठी संशोधनात्मक अभ्यास करीत होतो. पण मी ‘कोसला’चा अभ्यास करतोय हे त्यांना कधी सांगितले नाही आणि कुठल्या विषयावर संशोधन करतो आहेस हे त्यांनीही मला कधी विचारले नाही. एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतीचा अभ्यास करताना त्या लेखकालाच त्या साहित्यकृतीबद्दल विचारावे आणि माहिती मिळवावी हे नेमाडेसरांच्या बाबतीत शक्यच नव्हते. कारण नेमाडेसर साहित्य विषयावर आमच्याशी कितीही बोलत असले तरी स्वतःच्या कादंबरी-कवितेबद्दल एकही वाक्य ते बोलल्याचे मला आठवत नाही. मी आडमार्गाने ‘कोसला’बद्दल एखादा प्रश्‍न विचारला तर ते शक्यतो टाळत असत. त्यामुळे एक लेखक म्हणून त्यांचे वेगळेपण मनावर अधिकच ठसत गेले. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने मी काहीसा नेमाडे यांच्या आठवणीत रमलो असलो तरी या आठवणींच्या आणि व्यक्तिगत आनंदाच्या पलीकडे जाऊन भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या या पुरस्काराने केवळ एका लेखकाचाच नव्हे तर मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेचाच भारतीय पातळीवर सर्वोच्च पुरस्काराने सन्मान झालेला आहे, याचा कोणत्याही मराठीप्रेमीला अभिमानच वाटेल. यापूर्वी साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कारासारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार नेमाडे यांना प्राप्त झालेले असले तरी ज्ञानपीठ पुरस्कारामुळे केवळ मराठीतीलच नव्हे तर भारतातील एक श्रेष्ठ लेखक म्हणून त्यांचे नाव अधोरेखित झालेले आहे.
भालचंद्र नेमाडे यांची वाङ्‌मयीन कारकीर्द अर्धशतकाहून अधिक काळाची असली तरी त्यांनी या प्रदीर्घ काळात निर्माण केलेले साहित्य भरघोस म्हणता येईल असे नाही. ‘कोसला’, ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’, ‘झूल’, ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ अशा सहा कादंबर्‍या (खरे तर मुळात पाचच कादंबर्‍या, कारण ‘बिढार’चेच दोन भाग पुढे ‘बिढार’ आणि ‘हूल’ अशा दोन स्वतंत्र कादंबर्‍या म्हणून प्रकाशित झालेले आहेत), ‘मेलडी’ आणि ‘देखणी’ हे दोन काव्यसंग्रह, ‘टीकास्वयंवर’ हा समीक्षाग्रंथ, साहित्याची भाषा, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण ही पुस्तिका, संत चोखामेळा यांच्या अभंगांचे आणि तुकाराम गाथेतील निवडक अभंगांचे संपादन ही मराठी आणि ‘द इन्फ्ल्‌युएन्स ऑङ्ग इंग्लिश ऑन मराठी’, ‘इंडो-अंग्लियन रायटिंग्ज’ ही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली व्याख्याने आणि सिमल्याच्या आयआयएसने प्रकाशित केलेले ‘नेटिव्हीझम’ ही इंग्रजी पुस्तके अशी नेमाडे यांची ग्रंथसंपदा.
इंग्रजीचे प्रोङ्गेसर असूनही मराठी माध्यमाचा व मराठी लेखनाचा सातत्याने पुरस्कार करणार्‍या नेमाडे यांनी मराठी कादंबरी आणि साहित्यविचार या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविलेली आहे. १९६० नंतरचा काळ मराठी साहित्यात मूलभूत परिवर्तने घडविणारा आहे. या परिवर्तनाच्या प्रेरणा केवळ वाङ्‌मयीन नसून त्या प्रामुख्याने सामाजिक आहेत. मराठीत साठोत्तर साहित्य अशी संज्ञाच रूढ झालेली आहे. एक लेखक म्हणून भालचंद्र नेमाडे या परिवर्तनाच्या अग्रभागी आहेत. साठनंतर मराठी साहित्यात दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, लघु-अनियतकालिकाची चळवळ, पुढे स्त्रीवादी साहित्य असे जे नवे साहित्यप्रवाह चळवळींच्या स्वरूपात निर्माण झाले ते सर्व साहित्यप्रवाह प्रस्थापित साहित्यव्यवस्थेच्या विरोधात उभे राहिलेले होते. नेमाडे लघुअनियतकालिक चळवळीतले एक अध्वर्यू. मराठी साहित्यात प्रस्थापित झालेली- विशेषत सत्यकथा संप्रदायाने रुजविलेली आणि जोपासलेली वाङ्‌मयीन प्रमाणके नाकारून साहित्याला जगण्याचाच एक भाग मानणे ही या चळवळीची मुख्य भूमिका होती. लेखक म्हणून नेमाडे यांची घडण या प्रस्थापितविरोधी विचारातच झालेली असल्यामुळे मराठी साहित्यक्षेत्रात ते सतत वादग्रस्त राहिलेले आहेत.
पण वादग्रस्त ठरलेले असले तरी केशवसुत, बा. सी. मर्ढेकर यांच्याप्रमाणेच ते नवप्रवाहाचे प्रवर्तन करणारे लेखक आहेत. साहित्याला नवी दिशा देऊन समकालीन व पुढच्या पिढीतील लेखकांवर आणि वाचकांवरही मोठा प्रभाव पाडणारा लेखक त्या भाषेतला मोठा लेखक असतो. नेमाडे मराठीतले असे मोठे लेखक आहेत. नेमाडे यांनी नवप्रवर्तन केले ते मराठी कादंबरीच्या आणि मराठी साहित्यविचाराच्या- समीक्षेच्या क्षेत्रात. १९६० नंतर मराठीत जो नवकादंबरीचा प्रवाह जोमदारपणे सुरू झाला तो निर्माण करण्यात इतर कादंबरीकरांपेक्षा ‘कोसला’कार नेमाडे यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. प्रस्थापित लेखकांवर टीका करण्यापेक्षा तुला वाटते तसे वेगळे काही लिहून दाखव हे आव्हान स्वीकारून अवघ्या चौदा दिवसांत लिहून काढलेल्या ‘कोसला’ कादंबरीने मराठी साहित्यविश्‍वात खळबळ उडवून दिली. कादंबरी म्हणजे काय याबद्दलच्या समीक्षक-वाचकांच्या सगळ्या संकल्पना आणि मोजपट्ट्या ‘कोसला’ने धुडकावून लावल्या. विशेषत: ङ्गडके-खांडेकरयुगात रूढ झालेली कादंबरी या वाङ्‌मयप्रकाराबद्दलची परंपरा ‘कोसला’ने मोडीत काढली. ‘कोसला’चे त्या काळात दै. ‘सकाळ’मध्ये आलेल्या एका परीक्षणात ‘कोसला’चा उल्लेख परीक्षणकाराने ‘कादंबरी नावाचे चोपडे’ असा केलेला होता. कथानक, व्यक्तिचित्रण, निवेदन, भाषा या सर्वच बाबतीत ‘कोसला’ने मराठीतील कादंबरीची सर्व प्रमाणके बदलून टाकली.
कादंबरी या वाङ्‌मयप्रकाराचा एक नवाच आकृतिबंघ नेमाडे यांच्या ‘कोसला’ने मराठीत निर्माण केला. पण नवा आकृतिबंध निर्माण करणारी म्हणूनच केवळ ‘कोसला’ मराठीतील श्रेष्ठ कादंबरी ठरत नाही. पांडुरंग सांगवीसारखा एक तरुण नायक (ज्याला समीक्षकांनी प्रतिनायक म्हटले) आणि त्याची विद्यार्थिदशा अशा साध्या चित्रणविषयातून नेमाडे यांनी जीवनाविषयीचे जे आकलन कधी मिस्किल, विनोदी भाष्यातून तर कधी गंभीर आणि संवेदनशील काव्यात्म शैलीतून मांडले ते जाणकारांना अंतर्मुख करणारे आहे. खानदेशातील एका गावातून पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात शिकून मोठे होण्यासाठी आलेल्या पांडुरंगला शहरी संस्कृतीचा आणि तिथल्या शिक्षणव्यवस्थेचा ङ्गोलपणा जाणवतो आणि त्या कृत्रिम, खोट्या वास्तवाला सामोरे जाताना निरागस मनाचा पांडुरंग एकाकी, परात्म होत आपल्या कोशात जातो. मानवी परात्मभावाचे असे प्रभावी चित्रण करणारी ‘कोसला’ ही मराठीतील पहिलीच कादंबरी आहे. या पहिल्याच कादंबरीतून मराठीच्या अस्सल देशी रूपाची नेमाडेंनी व्यक्त केलेली जाण मराठी वाचकाला स्तिमित करणारी आहे.
‘बिढार’पासून ‘झूल’पर्यंतच्या कादंबर्‍या हा चांगदेवच्या जगण्याचा प्रवास आहे. म्हणूनच या चार कादंबर्‍यांना चांगदेवचतुष्ट्य म्हणून ओळखले जाते. ‘कोसला’सारखी कादंबरी लिहिल्यानंतर तशा दर्जाचं पुन्हा काही लेखकाला लिहिता येईल का? असा प्रश्‍न अनेक समीक्षकांच्या मनात असताना ‘कोसला’नंतर १२ वर्षांनी ‘बिढार’ आल्यावर लेखक ‘कोसला’च्या चाकोरीतच अडकलेला नाही हे वाचक-समीक्षकांच्या लक्षात आले. पण काही मूठभर समीक्षकांना मात्र ‘कोसला’नंतर चांगदेवचतुष्ट्य हा नेमाडेंचा लेखप्रवास उतरत्या भाजणीचा वाटला. नंतर ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही बृहत्कादंबरी आल्यावर काहीजणांना या कादंबरीला कसे सामोरे जावे, काय प्रतिसाद द्यावा हेच कळेना तर काही समीक्षकांना तिचे हिंदू हे नावच खटकले. ‘कोसला’नंतरच्या नेमाडे यांच्या सगळ्या कादंबर्‍या एका बाजूने असा टीकेचा विषय ठरल्या तर दुसरीकडे मराठी समाजाच्या विविध स्तरातील वाचकांना आणि पुणे-मुंबईच्या बाहेर नव्याने उदयाला आलेल्या अनेक लेखकांना नेमाडेंच्या या कादंबर्‍यांनी प्रभावित केलेले आहे.
नेमाडे यांच्या या सगळ्या कादंबर्‍या वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्या कादंबर्‍या एका निश्चित नैतिकदृष्टीतून समाजवास्तवाला थेट भिडणार्‍या आहेत. केवळ त्यांच्या कादंबर्‍यांची नावे घेतली की कादंबर्‍यांच्या कथानकापेक्षा पांडुरंग, चांगदेव, नामदेव, खंडेराव ही नायकांची नावेच मनात उभी राहतात. असे असले तरी या कादंबर्‍या केवळ व्यक्तिकेंद्रित नाहीत, तशाच त्या केवळ व्यक्तीचं आंतरिक असणं, आत्मभान विसरून केवळ समाजवास्तवाचं बाह्यदर्शन घडवणार्‍याही नाहीत. व्यक्तीविरुद्ध समाज असं टोकाचं द्वैत मानणे ही युरोपीयन संकल्पना नेमाडेंना मान्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या कादंबर्‍या व्यक्ती आणि समाज यांचा एकात्मभाव गृहित धरून एका व्यक्तीच्या नजरेतून समाजवास्तवाचा वेध घेतात. त्यामुळे चांगदेवचं आत्मभान एका टोकाला जातेय असं वाटताच, नामदेव भोळेसारखा ङ्गुलेवादी नायक उभा राहतो. नेमाडे यांच्या कादंबर्‍यांतील समाजवास्तवाचं आकलन कोणत्याही एका निश्चित वैचारिक वादावर आधारलेलं नाही. खरे तर महाराष्ट्रात महात्मा ङ्गुले यांच्यापासून विकसित झालेली पुरोगामी, मानवतावादी आणि व्यवस्थाविरोधी सामाजिक दृष्टी हाच नेमाडे यांच्या वास्तवाच्या आकलनाचा आधार आहे. त्यामुळे कादंबरीला हिंदू असे शीर्षक दिल्याने नेमाडे परंपरावादी किंवा प्रतिगामी ठरत नाहीत. हिंदू हा एक विशिष्ट धर्म म्हणून नेमाडे मानतच नाहीत; तर अङ्गगाणिस्तान, सिंधूनदीपासूनच्या भूप्रदेशातील विविध धर्म, जाती आणि पोटसंस्कृतीनी बनलेली एक सर्वसमावेशक बृहत्संस्कृती म्हणजे हिंदू असे नेमाडे यांना वाटते.