नेतृत्वबदल नाही, मुख्यमंत्रीपदी पर्रीकरच!

0
102
पत्रकार परिषदेत बोलताना विनय तेंडुलकर. सोबत सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल व दयानंद सोपटे.

पणजी (न. प्र.)
सरकार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आपला उर्वरीत कार्यकाळ पूर्ण करणार असून नेतृत्व बदलाचा प्रश्‍नच त्यामुळे उद्भवत नसल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. सरकारमधील गोवा फॉरवर्ड या घटक पक्षाचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी नेतृत्वबदल प्रश्‍नावर केंद्रीय नेते गंभीर असल्याचे केलेले विधान त्यांचे वैयक्तिक होते असे त्यांनी म्हटले आहे.
हल्लीच पक्षात प्रवेश देण्यात आलेले कॉंग्रेसचे शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर व मांद्रेचे दयानंद सोपटे हे तळागाळातील नेते असून त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. लोकांशी मिळून मिसळून राहणारे ते नेते असल्याचा दावा करून तेंडुलकर यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाची पाठराखण केली.
सरदेसाईंच्या विधानामागे
स्वार्थ ः काब्राल
राज्यात नेतृत्व बदलाचा प्रश्‍न कधीच निर्माण झाला नव्हता, असे यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. नेतृत्वबदल संबंधीच्या प्रश्‍नावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेले वक्तव्य हे त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी होते, असे त्यासंबंधी विचारले असता काब्राल यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त खात्यांचे
कोणत्याही क्षणी वाटप
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांचे आता कधीही वाटप होऊ शकते, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मात्र, खात्यांचे वाटप नक्की कधी करायचे याचा निर्णय आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच घेणार असल्याचे ते म्हणाले. पितृपक्ष झाला आणि दसर्‍याचा शुभमुहूर्तही झाला. आता खात्यांचे वाटप कधी करायचे हे पर्रीकर यांना ठरवावे लागणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.
महिनाभरात नोकरभरती
राज्यात तीन हजार सरकारी पदे रिक्त असून ती भरण्यासाठीची प्रक्रिया महिनाभरात सुरू होणार असल्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी काल सांगितले. ही पदे भरण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू होणार होती. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर हे अचानक आजारी पडल्याने ती अडून पडली. भरती प्रक्रियेला विलंब होऊ नये यासाठी पर्रीकर यांनी ही प्रक्रिया आता सुटसुटीत केली असल्याची माहितीही गुदिन्हो यांनी दिली.
खाणी लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न
गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकर सुरू व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असून त्यासाठी पुढील मंत्रीमंडळ बैठकीत खाणी व खनिज (विकास आणि नियमन) कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. जनतेने आणखी थोडा वेळ संयम बाळगावा, असे ते म्हणाले.
सोपटे, शिरोडकर
विकासासाठी भाजपात
दरम्यान, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात आलेले माजी आमदार दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा काल केला. मतदारसंघाचा विकास हेच लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून भाजपवासी झाल्याचे शिरोडकर म्हणाले.