नेतृत्वबदल ः भाजपचे केंद्रीय नेते गंभीर

0
132

पणजी (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे भाजप केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेतृत्वबदल करून स्थिर प्रशासन देण्यावर गंभीरपणे विचार करीत आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर जारी केलेल्या संदेशातून काल दिली आहे. मात्र, मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे चर्चेवेळी अमित शहांना सांगितले असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील मुख्यमंत्री बदलू नये, मुख्यमंत्र्याकडील काही खाती इतर मंत्र्याकडे द्यावी. त्याचबरोबर नेतृत्व बदलण्याचा निर्णय घटक पक्षांना विश्‍वासात घेऊन घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याकडे केल्याची माहिती मगोचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.
पर्रीकर यांच्या आजारपणामुळे राज्यातील नेतृत्व बदलण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली जात आहे. नेतेपदासाठी प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
राज्यातील नेतृत्व बदलावर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांनी घटक पक्षाच्या नेत्यांची नवी दिल्लीत काल बैठक घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याशी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी प्रथम चर्चा केली. शहा यांच्याशी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यांच्यासमोर गोमंतकीय जनतेच्या भावना मांडल्या आहेत. भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेतृत्व बदल आणि स्थिर प्रशासन देण्यावर गंभीरपणे विचार करीत आहे, अशी माहिती अध्यक्ष सरदेसाई यांनी जारी केलेल्या संदेशातून दिली आहे.
भाजपप्रणीत आघाडी सरकार पाच वर्षे कायम ठेवण्याच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली आहे. शहा यांनी नेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजपच्या काही नेत्यांच्या नावांवर सरदेसाई यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नेतृत्वबदल ढवळीकरांना नको
सरदेसाई यांच्यानंतर मगोचे नेते ढवळीकर यांनी स्वतंत्रपणे अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्याकडील काही खाती इतर मंत्र्यांकडे देऊन प्रशासनाला गती देण्यावर चर्चा करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्षांना सन्मानाची वागणूक देत असल्याचा संदेश मतदारांमध्ये पोचविण्याची विनंती केली, असे ढवळीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत भविष्यकाळात घटक पक्षातील ज्येष्ठ नेत्याला नेतृत्व करण्याची संधी द्यावी. भाजपने नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेताना घटक पक्षांना विश्‍वासात घ्यावे, अशी मागणी केल्याचे ढवळीकरांनी सांगितले.