निष्पापांचा बळी

0
144

मलेशियन एअरलाइन्सचे विमान युक्रेनमध्ये दुर्घटनाग्रस्त होऊन परवा २९५ प्रवाशांचा बळी गेला. हे विमान स्वतःहून दुर्घटनाग्रस्त झाले नसून ते क्षेपणास्त्र डागून पाडले गेले असे दिसते. अर्थात ते कोणी पाडले यासंदर्भात युक्रेनमधील रशियावादी बंडखोर आणि युक्रेन सरकार यांनी एकमेकांवर खापर फोडायला सुरूवात केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारायची कोणाची तयारी नाही, कारण बहुधा लढाऊ विमान समजून हे नागरी विमान पाडले गेले असावे. या दुर्घटनेच्या एक दिवस आधी युक्रेनचे एक लढाऊ विमान रशियन विमानातून हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागून पाडले गेले होते. त्याचा सूड म्हणून युक्रेनी फौजेनेच हे विमान पाडल्याचा रशियावादी बंडखोरांचा दावा असला, तरी प्रत्यक्षात हे विमान बंडखोरांच्या प्रभावाखालील परिसरातच कोसळले असल्याने त्यामागे त्यांचाच हात असल्याचे स्पष्ट होते. रशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याआधीच पूर्व युक्रेनमध्ये या विमानावर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे आणि जेथे ते कोसळले तो सारा टापू रशियावादी बंडखोरांच्या ताब्यात आहे. गेले अनेक महिने तेथे संघर्ष सुरू आहे. मलेशियन एअरलाइन्सचे हे विमान जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या बक या रडार नियंत्रित क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करून पाडले गेले. ही क्षेपणास्त्र प्रणाली युक्रेनमधील रशियावादी बंडखोरांपाशी कशी आणि कुठून आली हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. सत्तरच्या दशकात वापरली जाणारी ही क्षेपणास्त्रे रशियाकडूनच या बंडखोरांना पुरवली गेली आहेत का असा सवाल आता उपस्थित होईल. युक्रेनी बंडखोरांनी एक तर ही क्षेपणास्त्रे रशियाकडून मिळवलेली आहेत नपेक्षा युक्रेनच्या फौजांकडून हस्तगत केली आहेत. युक्रेनी बंडखोरांपाशी अशा प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत याची बित्तंबातमी एपी या वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराने नुकतीच जगाला दिली होती. मात्र, त्या क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनमधील संघर्षाशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्या त्रयस्थ देशाच्या विमानावर अशा प्रकारचा हल्ला होईल हे कोणी स्वप्नातही चिंतिले नसेल. क्षेपणास्त्र हल्ला झाला त्यावेळी मलेशियन विमान सुरक्षित हवाई मार्गावरून ३३ हजार फुटांवरून उड्डाण करीत होते. दुर्दैवाने क्षेपणास्त्र हल्ल्याचे ते लक्ष्य ठरले. काही महिन्यांपूर्वीच याच विमान कंपनीचे बेपत्ता झालेले विमान अद्यापही सापडू शकलेले नसतानाच हा दुसरा घाला तिच्यावर बसला आहे. यातून ती कंपनी दिवाळखोरीतही जाऊ शकते. दुर्घटनाग्रस्त झालेले विमान ऍमस्टरडॅमहून क्वालालंपूरकडे चालले होते आणि मारले गेलेले बहुसंख्य प्रवासी डच म्हणजे नेदरलँडचे नागरिक आहेत. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आदी देशांच्या नागरिकांचाही बळी गेला आहे. विमान प्रवाशांपैकी अनेकजण एड्‌ससंबंधित चळवळीचे कार्यकर्ते आणि अभ्यासक होते. एका परिषदेसाठी ते चालले होते. आणखी एक बाब उल्लेखनीय आहे ती म्हणजे मलेशियन विमानावर क्षेपणास्र हल्ला झाला तेव्हाच आजूबाजूच्या हवाई मार्गांवरून जी इतर विमान कंपन्यांची विमाने प्रवास करीत होती, त्यामध्ये आपल्या एअर इंडियाच्या विमानाचाही समावेश होता. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षात आता अमेरिकेबरोबरच युरोपीय महासंघालाही लक्ष घालावे लागेल असे दिसते. अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंध यापूर्वीच लागू केलेले आहेत. रशियाच्या तेल, नैसर्गिक वायू उत्पादक कंपन्यांवर हे निर्बंध घातले गेले आहेत आणि त्याचा फटकाही त्यांना बसला आहे. युरोपीय महासंघालाही आता अमेरिकेच्या पावलांवर पाऊल टाकून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या दिशेने पावले टाकावी लागतील. युक्रेनमधील रशियावादी बंडखोरांना आजवर रशियाकडून सक्रिय साथ मिळत आली. जनमत कौलाद्वारे युक्रेनमधील नागरिकांचे मत विलिनीकरणाच्या बाजूने आहे असे जगाला ठसवण्याचा प्रयत्नही यापूर्वी झाला. मात्र, युक्रेन आणि रशियामधील या मामल्याला मलेशियन विमानावरील क्षेपणास्त्र हल्ल्याने प्रथमच गंभीर आंतरराष्ट्रीय आयाम प्राप्त झाला आहे. एकीकडे इस्रायलने गाझापट्टीतील हमास बंडखोरांविरुद्ध जबर हवाई हल्ले चालवलेले आहेत, इराकमध्ये आयएसआयएस बंडखोरांनी इराक आणि सिरियातील शहरे कब्जात घेण्याचा सपाट लावलेला आहे. उर्वरित जगाला या या अशा घटनांकडे अलिप्त नजरेने पाहता येणार नाही. कळत नकळत या प्रश्नांमध्ये इतर राष्ट्रेही ओढली जात आहेत आणि ही गंभीर बाब आहे.