निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती

0
124

>> एडीआरची पत्रकार परिषदेत माहिती

लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणूक रिंगणात असलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांच्या नजरेस ही बाब आणून देण्यात आलेली आहे, अशी माहिती एडीआरचे गोवा राज्य समन्वयक भास्कर असोल्डेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

निवडणूक अधिकार्‍यांकडे काही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रातील पाने सुध्दा क्रमांकानुसार दिली जातात. उमेदवारांनी आयकराबाबत पाच वर्षांची माहिती देणे क्रमप्राप्त असते. मात्र, अनेक उमेदवारांनी केवळ वर्ष २०१७-२०१८ ची माहिती दिली आहे. प्रतिज्ञापत्रातून मालमत्तेचे मूल्य योग्य प्रकारे दिले जात नाही, असेही असोल्डेकर यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणूक रिंगणातील ज्या उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत त्यांनी निवडणुकीपूर्वी तीन वेळा वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रातून आपल्या विरोधातील गुन्ह्याबाबत माहिती प्रसारित केली पाहिजे. तसेच राजकीय पक्षाच्या वेबसाइटवर सुध्दा यासंबंधी माहिती प्रसिद्ध केली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत तीन आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीत तीन उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत. त्यांनी आत्तापर्यंत एकदाही आपल्यावरील गुन्ह्याबाबत माहिती प्रसारित केलेली नाही. ही गोष्ट मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे, असेही असोल्डेकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उमेदवारांना गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे. लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ऐश्‍वर्या साळगावकर, दक्षिण गोवा मतदारसंघातील आपचे उमेदवार एल्विस गोम्स आणि शिवसेनेच्या उमेदवार राखी नाईक यांनी आपल्या विरोधात खटले असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. विधानसभेच्या पोट निवडणुकीतील म्हापसा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय बर्डे, आपचे उमेदवार शेखर नाईक आणि शिरोडा मतदारसंघातील आपचे उमेदवार योगेश खांडेपारकर यांच्याविरोधात गुन्हे असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली आहे, असे असोल्डेकर यांनी सांगितले.