निवडणूक तारखेची आज घोषणा?

0
93

गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी यांची त्या अनुषंगाने उत्सुकता वाढली आहे. काल संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयातील फाईल्स हातावेगळ्या करण्याचे काम केले.

आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही महत्वाची कामे करणे शक्य होणार नसल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या कामाच्या फाईल्सवर मंत्र्यांच्या सह्या व्हाव्या म्हणून अनेकजण प्रयत्नशील होते. मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक निवडणूक कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांची बर्‍याच दिवसांपासून धावपळ सुरू होती.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही प्राधान्य असलेल्या कामाच्या फाईल्स वगळता अन्य कोणतीही कामे आपल्यासमोर आणू नयेत असे संबंधित अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. काही राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराचे काम गेल्या दोन महिन्यापूर्वीच सुरू केले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवरून जोरदारपणे विविध प्रचारे प्रचारकार्यही सुरू केले आहे. अशा इच्छुकांनी आपल्या परीने दबावतंत्रही सुरू केले आहे.