निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी कर्मचार्‍यांना कामाचा आदेश

0
101

>> मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन ः ‘आप’चा दावा

राज्यात दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी दि. २३ रोजी ड्युटीवर असलेल्या व सलग सुमारे ३० तास काम केलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना २४ रोजी सुटी न देता कामावर रुजू होण्याचा जो आदेश काढण्यात आला त्याबाबत राज्यातील मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी खुलासा करावा, अशी मागणी काल आम आदमी पार्टीने केली.

यासंबंधी माहिती देताना आम आदमी पार्टीने सांगितले की शाळा व महाविद्यालयातील जे शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर होते त्यांना निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २४ रोजी कामावर रुजू होण्याचा आदेश त्यांच्या व्यवस्थापनाने काढला. त्यामुळे सलग सुमारे ३० तास काम केलेल्या या कर्मचार्‍यांना ड्युटीवर रुजू व्हावे लागल्याने त्यांची दमछाक झाली असे ‘आप’ने म्हटले आहे.

निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी सुटी देण्यात यावी असे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद केलेले आहे. मात्र, यावेळी त्याचा भंग करण्यात आल्याचे पक्षाचे नेते प्रदीप पाडगांवकर यांनी म्हटले आहे. राज्याचा मुख्य निवडणूक अधिकार्‍याने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी पाडगांवकर यांनी केली आहे.