निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

0
109

>> सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांनी दिली माहिती

लोकसभेसाठीच्या दोन जागा व विधानसभेसाठीच्या तीन पोटनिवडणुका आठ दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील १६५२ मतदान केंद्रे सज्ज करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काल राज्याचे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली. मतदानासाठी येणार्‍या लोकांना ऊनात उभे रहावे लागू नये यासाठी यावेळी सर्व १६५२ मतदान केंद्रांवर मंडप घालण्यात येणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

दर एका मतदान केंद्रावर एक व्हिलचेअर ठेवण्यात येणार आहे. ज्या इमारतीत दोन अथवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील तेथे दोन व्हिल चेअर ठेवण्यात येणार आहेत. विशेष व्यक्ती, आजारी व्यक्ती व चालू न शकणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसाठी या व्हिल चेअर्सची सोय असेल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. यासाठी सरकारने १३०० व्हिल चेअर्सची खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

खराब होणारी मतदान यंत्रे ताबडतोब दुरुस्त करता यावीत मतदान केंद्रांवर तंत्रज्ञ असतील. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी निम लष्करी दलाच्या १२ तुकड्या आणण्यात येणार आहेत. दर एका विधानसभा मतदारसंघात एका भरारी पथकाची सोय करण्यात येणार आहे. यंदा २९३०७ नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेले हे मतदार आहेत. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने २१ रोजी संध्याकाळी ६ वा. प्रचाराची सांगता होणार आहे.

आचारसंहिता भंगाच्या २१५ तक्रारी राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात वर्ग करण्यात आलेल्या असल्या तरी त्यांपैकी दखल घेण्यासारख्या केवळ १७ तक्रारी असून त्या विविध राजकीय पक्षांवर करण्यात आलेल्या आहेत. त्यांपैकी ६ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. तर दोन प्रकरणे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत. तर अन्य प्रकरणी चौकशी चालू असल्याची माहिती सावंत यांनी दिली.