निवडणुकांचे एकूण चित्र आज होणार स्पष्ट

0
239

>> उमेदवारी मागे घेण्याचा आज अंतिम दिवस

लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ८ एप्रिल ही अंतिम तारीख असून आजच निवडणुकीचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येक ६ उमेदवारी अर्ज ग्राह्य झाले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक, कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर, आपचे दत्तात्रय पाडगावकर, आरपीआयचे अमित कोरगावकर, अपक्ष ऐश्‍वर्या साळगावकर आणि भगवंत कामत यांचा समावेश आहे. तर दक्षिण गोव्यातून भाजपचे नरेंद्र सावईकर, कॉंग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन, आपचे एल्वीस गोम्स, शिवसेनेच्या राखी नाईक, अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर आणि मयूर काणकोणकर यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीतून केवळ अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे. प्रमुख पक्षांकडून माघारीची शक्यता कमीच आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर दिला आहे. शिवसेनेने दोन्ही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. परंतु, केवळ दक्षिण गोव्यातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. उत्तर गोव्यातून शिवसेनेचे राज्य प्रमुख जितेश कामत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी म्हापसा मतदारसंघात सात, मांद्रे मतदारसंघात पाच आणि शिरोडा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेमुळे उमेदवारांच्या थंडावलेल्या प्रचाराला पुन्हा एकदा जोरात प्रारंभ झाला आहे. विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला आहे. उमेदवारांच्या समवेत कार्यकर्ते सुध्दा प्रचारात गुंतले आहेत.