निर्मला सीतारामन नव्या संरक्षणमंत्री

0
141
India Prime Minister Narendra Modi (7L) and President Ramnath Kovind (8L) pose with the newly sworn-in ministers after a ceremony at the Presidential Palace in New Delhi on September 3, 2017. Prime Minister Narendra Modi named a female legislator as India's new defence minister on September 3, the first time a woman has been appointed to the key portfolio overseeing border tensions with China and Pakistan. / AFP PHOTO / Prakash SINGH

>> मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार

>> पियुष गोयल रेल्वेमंत्री

>> ९ नव्या चेहर्‍यांना संधी

केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप अखेर काल झाले. या मंत्रिमंडळात ९ नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली असून चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याचा कारभार निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांची या पदासाठी निवड अनपेक्षित ठरली असून आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणार्‍या त्या दुसर्‍या महिला ठरणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण १३ जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणारे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.
पियुष गोयल यांना केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी बढती देण्यात आली आहे. याआधी ते राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे ऊर्जा व कोळसा खात्याचा स्वतंत्र कार्यभार होता. या खात्यात त्यांनी मोठ्या सुधारणा घडवून आणल्या होत्या. मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पेट्रोलियममंत्री म्हणून उल्लेखनीय कागगिरी करणारे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कौशल्य व उद्योजकता विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
माजी आयएएस अल्फोन्स कन्ननथाथम, खासदार आणि माजी आयपीएस सत्यपाल सिंह, राजस्थानचे खासदार गजेंद्र सिंह चौहान, माजी आयएफएस अधिकारी हरदीप पुरी, माजी आयएएस राजकुमार सिंह, अनंत कुमार हेगडे, वीरेंद्र कुमार, अश्‍विनी कुमार चौबे व शिवप्रताप शुक्ल यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार करताना सुरेश प्रभू यांना वाणिज्य व उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाची जबाबदारी राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे जल संपदा व गंगा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. वस्त्रद्योगमंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या विस्तारात एकाही मित्रपक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या घटक पक्षांनाही सामावून घेतले जाईल, ही चर्चा फोल ठरली आहे. राज्यमंत्री म्हणून चार सनदी अधिकार्‍यांना संधी देण्यात आली असून हे या विस्ताराचे वैशिष्ट्य ठरले आहे.

दुसर्‍या महिला संरक्षणमंत्री
केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर खासदार निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे देशाला आता पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर सीतारामन या दुसर्‍या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. सीतारामन यांची भारताच्या संरक्षणमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांचा आता जगभरातील महिला संरक्षणमंत्र्यांच्या छोट्या गटामध्ये समावेश झाला आहे. भारताबरोबर सध्या जर्मनी, नॉर्वे आणि नेदरलँड या देशांच्या संरक्षणमंत्रीपदी महिला कार्यरत आहेत.