निर्भयाप्रकरणी आरोपींना २२ रोजी फाशी

0
116

>> दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाचा निर्णय

निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने काल मंगळवारी या प्रकरणातील चारही संशयितांना फाशीची शिक्षा कायम केली आहे. त्यांना आता दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

या प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हे चौघेही तिहार तुरुंगात होते. काल त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीवेळी आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. निर्भयाच्या कुटुंबीयांनी चारही दोषींच्या विरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली. सरकारी वकिलांनीही आरोपींच्यावतीने सादर करण्यात आलेल्या याचिकेला विरोध केला. दरम्यान, ही सुनावणी सुरू असताना निर्भयाची आणि आरोपी मुकेशची आई दोघीही न्यायालयात रडल्या.
दि. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत निर्भया नामक तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. यामुळे गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

कायद्यात विशेष सुधारणा
हवी ः उज्वल निकम
या निकालाच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने आरोपींना जारी केलेल्या ब्लॅक वॉरंटचे मी स्वागत करतो. कारण, आरोपींनी ज्या क्रूरतेने निर्भयाची बलात्कार करून हत्या केली होती. ती बघता हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. परंतु, डेथ वॉरंट हे २२ जानेवारीचे आहे, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. या अनुषंगाने सरकारला ही खबरदारी घ्यावी लागेल, की पुन्हा या दरम्यान आरोपीच्यावतीने डेथ वॉरंटला स्थगिती देण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. म्हणून आपल्याला आता यापुढे कायद्यात काही विशेष सुधारणा देखील करावी लागणार आहे. कारण, निर्भयाच्या खटल्याचा निकालाला जवळजवळ चार ते पाच वर्षे उलटलेली आहेत. मात्र, अद्यापर्यंत त्यांना फाशी दिली गेली नाही.

१४ दिवसांचा अवधी
या चारही आरोपींची फाशी कायम ठेवल्यानंतर न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला आहे. या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या काळात तुरुंग प्रशासन फाशीची पूर्ण तयारी करणार आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने तिहार तुरुंगाला दोषींना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले होते.

निर्भयाच्या गावी जल्लोष
निर्भयाच्या चारही दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी झाल्याची खबर मिळताच उत्तर प्रदेशातील बलिया येथील तिच्या गावी एकच जल्लोष झाला. गेली सात वर्षे हे गावकरी निर्भयाच्या दोषींना फाशी व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. निर्भयाच्या गावासोबतच जिल्ह्यात न्यायालयाच्या मंगळवारच्या निकालामुळे आनंद साजरा केला जात आहे. ज्या दिवशी या चौघांना फाशी दिली जाईल त्या दिवशी गावात दिवाळी साजरी केली जाणार आहे.