निर्भयाच्या दोषींना ३ रोजी फाशी

0
103

निर्भया बलात्कारप्रकरणी चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वा. फासावर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पटियाला हाऊस न्यायालयाकडून दोषींबाबत डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दि. ११ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती.

यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती.
दिल्लीतील मुनारिकाजवळ १६ डिसेंबर २०१२ रोजी राजी ९ वाजल्याच्या सुमारास चालत्या बसमध्ये पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या निर्भयावर क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तर दि. २९ डिसेंबर रोजी सिंगापूरच्या माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात निर्भयाचे निधन झाले होते.

या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उठले होते. १७ डिसेंबर रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या राम सिंहसह इतर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये चालक राम सिंहचा भाऊ मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता, अक्षयकुमार सिंह आणि एक अल्पवयीन या आरोपींचा समावेश होता.

निर्भयाच्या दोषींपैकी राम सिंह याने ११ मार्च २०१३ ला तुरुंगातच आत्महत्या केली. तर, अल्पवयीन दोषीला ३१ ऑगस्ट २०१३ रोजी जुवेनाईल जस्टिस बोर्डाने दोषी ठरवून तीन वर्षांसाठी त्याला बालसुधारगृहात धाडण्यात आले. त्यानंतर, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला एनजीओच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले.