निरोपाचे शब्द

0
130

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल आपल्या शहरात – शिकागोत निरोपाचे पहिले भाषण केले. आणखी दहा दिवसांनी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सोडतील आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांची जागा घेतील. पद सोडतानाही ओबामांची व्यक्तिगत लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही हे विशेष आहे. बराक, त्यांची पत्नी मिशेल यांनी आपला आब सदैव राखला. बिल क्लिंटन किंवा बुश यांच्याप्रमाणे आपल्या पदाला काळीमा येऊ दिला नाही. क्लिंटन त्यांच्या कारकिर्दीत मोनिका लुइन्स्की प्रकरण घडले आणि अमेरिकी अध्यक्षाची प्रतिमा मातीमोल झाली. बुश यांच्या कारकिर्दीलाही फसलेल्या इराक नीतीचा कलंक लागला होता. तसे काही ओबामांच्या कारकिर्दीत घडले नाही. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षपदाचे दोन कार्यकाळ ते पूर्ण करू शकले. ज्या प्रेमाने आणि विश्वासाने अमेरिकी जनतेने त्यांची निवड केली होती, ती सार्थ ठरवत ते सन्मानाने पुढील आठवड्यात त्या पदावरून पायउतार होणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांनी ‘येस, व्ही कॅन!’’ चा नारा दिला होता. आता हे पद सोडताना ‘येस, व्ही डीड’ असे सांगत ते पद सोडतील. ओबामांचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा काळ हा खडतर जरूर होता, परंतु एकेका आव्हानांना ते ठामपणे सामोरे जात राहिले. पहिल्यांदा जेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा अमेरिका दहशतवादाच्या दाट सावटाखाली होती. ओसामा बिन लादेनचा खात्मा करून त्यांनी देशाला त्या सावटाखालून बाहेर काढले. दुसर्‍या कार्यकाळाला आर्थिक संकटांच्या घेर्‍यात तो देश होता. जागतिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या अमेरिकेला त्यातूनही त्यांनी बाहेर काढले. आयएसआयएसविरुद्ध पावले उचलली, इराकच्या आण्विक कार्यक्रमावर एकही गोळी न झाडता निर्बंध आणले, क्युबाशी नवे संबंध प्रस्थापित केले. ही यादी अशी वाढवत नेता येईल. एका जागतिक महासत्तेचे अध्यक्षपद पेलणे हे काही ऐर्‍यागैर्‍याचे काम नव्हे. बराक ओबामा नावाचा कृष्णवर्णीय तरुण हे पद कसे पेलेल अशी जी धास्ती जगात व्यक्त होत होती, तिला नेस्तनाबूत करीत आपल्या कारकिर्दीविषयीचा विश्वास त्यांनी जगभरात निर्माण केला हे त्यांचे मोठे यश मानले पाहिजे. आज पद सोडतानाही ‘‘अमेरिकेला धमकावणारा कोणीही कधी सुरक्षित राहणार नाही’’ असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. आपल्यानंतर या महासत्तेचे सुकाणू ज्याच्या हाती येणार आहे, त्या डोनाल्ड ट्रम्पच्या एकूण नीतीमुळे उद्भवणार असलेल्या धोक्यांचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. विशेषतः अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांप्रती ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या विद्वेषाच्या पार्श्वभूमीवर या निर्वासितांमुळे अमेरिका कमकुवत झालेली नाही, तर त्यांनी हा देश स्वीकारल्याने अधिक बळकट झाली आहे अशी भूमिका बराक यांनी मांडली आहे. आपली राष्ट्रीय मूल्ये कमकुवत होण्याचा आणि भेदभावाचे पर्व येण्याचा जो धोका त्यांनी व्यक्त केला, तो सरळसरळ ट्रम्प यांच्या येणार्‍या कारकिर्दीकडेच अंगुलीनिर्देश करतो. ‘‘जेव्हा जनता भीतीला बळी पडते तेव्हाच लोकशाही कमकुवत होत असते. लोकशाहीला जेव्हा गृहित धरले जाते तेव्हाच धोका निर्माण होत असतो’’ असे सांगत ओबामांनी आपल्या जनतेला सावध केले आहे. अमेरिकेत येऊ घातलेल्या ट्रम्प पर्वाविषयीची ही साशंकता आहे. ओबामांची कारकीर्द सर्वार्थाने परिपूर्ण होती असे मुळीच नव्हे. अनेक आघाड्यांवर तेही अपयशी ठरले. अफगाणिस्तानमधून दहशतवादाचा नायनाट करणे असो वा आयएसआयएसचा खात्मा करणे असो त्यांना जमले नाही. अमेरिकी युवकांना नवे रोजगार निर्माण करण्यात, वाढती हिंसा रोखण्यात त्यांना अपयश आले. पण तरीही त्यांचे पारडे जड होते. एक उमदा, कर्तबगार नेता म्हणून अवघे जग त्यांची आठवण नक्कीच ठेवील.