निराशेतून हल्ला

0
108

काश्मीरमध्ये शुक्रवारी झालेले चार दहशतवादी हल्ले हे केवळ सुरक्षा दलांवरील हल्ले नाहीत, तर सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊ नये यासाठी त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा हा निकराचा प्रयत्न आहे. सुरक्षा दलेही सुरक्षित नाहीत, तेथे तुमची काय कथा, अशी धमकीच जणू हे पाकसमर्थित दहशतवादी देऊ पाहात आहेत. खरे तर जम्मू व काश्मीर विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत मतदारांनी जो अत्यंत उत्साही व भरघोस प्रतिसाद पहिल्या दोन्ही टप्प्यांना दिलेला आहे, त्याने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांची आणि त्यांच्या सीमेपलीकडील पाठिराख्यांची झोप उडवलेली आहे. यच्चयावत फुटिरतावादी शक्तींनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची हाक काश्मिरी जनतेला दिलेली असताना झारखंडपेक्षाही काश्मीरमध्ये अधिक मतदान होणे हे तेथील जनतेचा या फुटिरांवरचा विश्वास उडत चालल्याचेच द्योतक आहे. त्या निराशेतूनच हा हल्ला झालेला आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊनच आपला विकास साधता येईल याची जाणीव हळूहळू का होईना, परंतु आम काश्मिरींमध्ये वाढू लागली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काश्मीरवर खास लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. काश्मीरबाबत उर्वरित देशात बरेच गैरसमज आहेत. प्रत्येक काश्मिरी हा फुटीर नाही. पण अहोरात्र लष्कराच्या कडव्या नजरेखाली राहावे लागत असल्याने आणि सदैव संशयित नजरेनेच पाहिले जात असल्याने तरूण काश्मिरींमध्ये तीव्र नाराजी आहे आणि त्या रोषाचे रूपांतर भारतविरोधामध्ये करण्याच्या संधी हे फुटिरतावादी शोधत असतात. त्यांना धर्मांधतेचे बाळकडू पाजून चिथावणी देत असतात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये काश्मीरला वेढून राहिलेल्या फुटिरतावादामुळे तेथील विकास ठप्प झाला. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत. केवळ पर्यटनाच्या भरवशावर राहावे म्हटले तरीही दहशतवादाची टांगती तलवार त्या व्यवसायावरही आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या रोजीरोटीची चिंता आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरकडे विशेष लक्ष पुरवले आहे. विशेषतः श्रीनगरमधील पुरानंतर दिलेले भरघोस पॅकेज, त्यानंतरही काश्मीरला वारंवार दिलेल्या भेटी यातून जनतेच्या केंद्रातील नव्या सरकारकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या जनभावनेला मतांमध्ये परिवर्तित करण्याचा चंग यावेळी भाजपाने बांधलेला आहे आणि काश्मीर पादाक्रांत करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. कधी नव्हे ते दल सरोवरामध्ये शिकार्‍यांवर भाजपचे झेंडे फडकू लागले आहेत. मोदींची मोठमोठी होर्डिंग रस्त्यांवर झळकू लागली आहेत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांच्या सत्तेला सुरूंग लागलेले आहेत. मेहबुबा मुफ्तींचा पीडीपी सत्तारूढ होण्यासाठी जंग जंग पछाडतो आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाचे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत उतरणे नवी समिकरणे निर्माण करून गेलेले आहे. जम्मू आणि लडाखवर भाजपाच्या आशा लागल्या आहेत आणि खुद्द काश्मीर खोर्‍यासंदर्भात पक्षाने काही चाली आखलेल्या आहेत. गरज भासल्यास सज्जाद लोणसारख्यांशी हातमिळवणी करण्याची भाजपची तयारी असेल असे दिसते. कधी नव्हे ते मतदार उत्साहाने मतदानाला बाहेर पडले आहेत हे फुटिरांना आणि पाकिस्तानमधील काश्मीर राग आळवत बसलेल्या भारतद्वेष्ट्यांना कसे सोसावे? ज्या चार ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले चढवले, त्या उरी, श्रीनगर, त्राल आणि शोपियॉं या चारही ठिकाणी पुढील दोन टप्प्यांत निवडणूक व्हायची आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हल्ल्यामागील उद्देश स्पष्ट होतो. शिवाय पंतप्रधान मोदींची आज सोमवारी जाहीर सभा व्हायची आहे. त्यामुळे अत्यंत निकराचे हल्ले या पाकिस्तानी हस्तकांनी चढवले, पण ते फसले असेच म्हणावे लागेल कारण ज्या प्रमाणात त्यांना घातपात घडवायचा होता, तेवढा ते घडवू शकले नाहीत असे त्यांच्याजवळ आढळलेल्या शस्त्रास्त्रांवरून दिसून येते. नऊ वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांच्या हस्ते श्रीनगर – मुजफ्फराबाद बस सुरू व्हायची होती, तेव्हा दोन दहशतवाद्यांनी असाच हल्ला चढवला होता आणि त्याची तमा न बाळगता डॉ. सिंग श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. मोदीही आज हेच करतील. काश्मिरींनी भयमुक्त होऊन मतदान करण्याची आजच्या घडीस जरूरी आहे. सरकार कोणाचेही येवो, लोकशाही जिंकायलाच हवी!