नियोजन सुटीचे!                                                         

0
402

 – प्रा. रामदास केळकर

सुट्टी म्हणजे धमाल, मज्जा असली तरी लवकर उठण्यावर भर द्यावा आणि व्यायामाची सवय लावून घ्यावी. सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी. एक म्हणजे ह्याला काही पैसे पडत नाहीत, शिवाय घरच्याघरी तुम्ही हे करू शकता. लहानपणी शरीर लवचीक असले तर ही लवचिकता आयुष्यभर टिकण्यासाठी व्यायामाची सवय आवश्यक असते.

ह्या जगात आपण सर्वजण एका बाबतीत भाग्यवान आहोत ती एक बाब म्हणजे सर्वाना मिळालेला समान वेळ. रात्र असो वा दिवस आम्हा सर्वांच्या वाट्याला २४ तास हमखास असतात. आता त्याचे वाटप कसे करावे? त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करावा? ह्यामध्ये मात्र शहाणपणा असतो किंवा स्मार्टपणा असतो. ज्यांना हे जमले ते अंबानी, टाटा यांच्यासारखे यशस्वी बनतात. आपल्याला आपला वेळ फुकट गेला हे उशिरा समजते. काहीजण मात्र आपली चूक वेळीच जाणतात आणि चुकीची दुरुस्ती करून यशस्वी होतात. मित्रांनो, तुम्हांला यशस्वी व्हायचे आहे ना? मग मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायची नामी संधी हाताशी आलेली आहे. लक्षात आलं का? तुम्हांला १६ तारखेपासून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे ना! खरे तर शनिवार १४ पासूनच तुमची सुट्टी सुरू होते आहे. मग सुट्टी कशी घालवायची? हा प्रश्‍न पडला असेल ना? रोजच्या टीव्ही, मोबाइलच्या नजरकैदेतून जरा वेगळे करण्यासाठी सुटी घालवा. चला तर तुम्हांला ह्याचे नियोजन करायला ह्या लेखातून मदत करायचा प्रयत्न. अलीकडच्या शहरीकरणाच्या, धकाधकीच्या मोबाइल खेळांच्या, व्यसनाकडे ओढले जाण्याच्या काळात आजोळ, नातेवाइकांचा गोतावळा सोडाच पालकांपासून मुले दूर होत गेली आहेत, एकाकी बनत चालली आहेत. आपुलकी, माया, प्रेमाचा ओलावा दुर्मीळ होत चालला आहे. अशात सुट्टीचा दीर्घ काळ म्हणजे पालकांना भेडसावणारी एक चिंताच. सुट्टी चांगल्या तर्‍हेने जावी ह्यासाठी उपक्रम सुचविले असले तरी मुले स्वत:हून ते उपक्रम करण्याची शक्यता तशी कमीच.

आपल्या मुलांचा अमूल्य वेळ अनुत्पादक गोष्टीत जाऊ नये यासाठी पालकांनाच हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. आपल्या मुलांनी चांगल्या गोष्टी कराव्यात असे प्रत्येक पालकांना वाटणे साहजिकच. त्याची सुरुवात त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना विश्वासात घेऊनच करावी लागेल. तरच ती आनंददायी वाटेल… पालकांना आणि मुलांना देखील!जीवनचरित्रे वाचा…  एरव्ही तुम्ही कुठलेतरी पुस्तक वाचायला घेत असता, पण सुट्टीत मात्र थोडे वेगळेपण असू द्या. एरव्ही तुम्ही हाताला लागेल ते किंवा छान कव्हर असलेले पुस्तक निवडत असाल. सुट्टीत मात्र असे करायचे नाही. विविध विषयांची पुस्तके असतात. ऐतिहासिक, सामाजिक, चरित्र, आत्मचरित्र, कथा संग्रह, कादंबरी, नाटक इ. यांपैकी तुम्ही चरित्र किंवा आत्मचरित्रावर जास्त भर द्या. तुमच्या आवडीची व्यक्ती निवडा. डॉ. कलाम असतील, स्वामी विवेकानंद असतील. आठवड्यात जास्तीत जास्त पुस्तके वाचायचा सपाटाच लावा. कुठल्याही भाषेतील पुस्तके निवडा आणि मग सुट्टी संपल्यानंतर जेव्हा शाळेत परत जाल तेव्हा तुमच्या बोलण्या-वागण्यात, विचार करण्यात आलेला फरक तुमच्या मित्रांना कळू लागेल, शिक्षकांना समजेल. अगदी लहान गटातील विद्यार्थ्यांनी अनंत भावे यांची बडबडगीते, जोडाक्षरांविरहित इसापनीती, चित्रमय रामायण, हेंस एंडरसनच्या परीकथा अशा पुस्तकातून वाचनाला सुरुवात करावी. मध्यम गटातील विद्यार्थ्यांनी श्यामची आई, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, चिमणरावाचे चर्‍हाट, टारझन, पंचतंत्र तर वयात येणार्‍या विद्यार्थ्यांनी वनवास-प्रकाश संत, उष:काळ- ह.ना. आपटे, शेरलोक होम्स, गोतावळा-आनंद यादव, उपेक्षितांचे अंतरंग- श्री. म. माटे आदी पुस्तकातून वाचनाचा ओनामा सुरू करावा. यासाठी शेजारील ग्रंथालयाचे सदस्य बना. जे पुस्तक तुम्ही वाचलेत त्याबद्दल तुमच्या नोंदवहीत टिपण लिहा. यातील एखादे वाक्य, घटना, नवे शब्द, अपरिचित शब्द लिहून ठेवायला विसरू नका.

छंद जोपासा…आपल्या आसपास अनेक कार्यक्रम होत असतात यात एखादे व्याख्यान असू शकते, चित्रांचे प्रदर्शन असू शकते किंवा एखाद्या छायाचित्र कला, स्वयंपाकाविषयी नवनवीन पदार्थ शिकणे… आदी छंदांविषयी कार्यशाळा, वर्ग ह्याबद्दल माहिती असू शकते. ही माहिती आपल्या वृत्तपत्रातून येत असते. त्यानुसार अशा कार्यक्रमाला जायला विसरू नका. एखादा छंद जोपासायला सुट्टीसारखा दुसरा पर्याय नाही. आपल्याला आवडणारा छंद शिकण्यासाठी सुट्टीचा जरूर उपयोग करा. समजा तुम्हांला नवीन भाषा शिकायची असेल किंवा इंग्रजी भाषा सुधारायची असेल तर त्यासाठी सुट्टीचा वेळ देऊ शकता. हस्ताक्षर सुधारणे तर घरबसल्या तुम्ही करू शकता अर्थात यामध्ये विशेष प्रावीण्य मिळविण्यासाठी तुम्हांला मार्गदर्शन घ्यावे लागेल. ते मिळत नसेल तर निदान अक्षर सुधारण्यासाठी पुस्तकांची मदत घेऊ शकता. ह्यासाठी सुंदर कविता लिहिणे, सुविचार लिहिणे, आपण वाचलेला परिच्छेद लिहून काढणे. तसेच वृत्तपत्रात वाचकीय सदर असते, संपादकीय असते त्यातील उतारा माहितीही देतो ज्याचा संदर्भ म्हणूनही वापर तुम्ही करू शकता. चित्रकलेसारखा आनंद देणारा छंद तुम्हांला वेळच नव्हे तर तुमची रंगाविषयी ओळख वाढवितो. शिवाय निसर्गातील रंगांची आठवण करून देतो, तुम्हांला तुमच्या दृष्टीत परिपक्वता आणायला मदत करतो. याच काळात शिबिरे आयोजित केली जातात ज्यामध्ये खेळापासून भटकंतीपर्यंत आदी प्रकार असतात. ट्रेकिंगसारखे निसर्गाशी जवळीक साधणारे उपक्रम गोव्यातही आयोजित केले जातात. त्यांच्या कार्यक्रमाची तारीख, वेळ वृत्तपत्रातून येत असते त्याकडे नजर ठेवून त्यात सहभागी व्हावे. तुमच्याकडे संगणक असेल व त्याला इंटरनेटची जोडणी असेल तर युट्यूबवरुन कित्येक गोष्टी तुम्ही शिकू शकता, अगदी जादूपासून छायाचित्रण कलेपर्यंत. मोठमोठ्या व्यक्तींची भाषणे तुम्ही घरबसल्या ऐकू शकता.

वैज्ञानिक प्रयोग शिकू शकता.शाळेत जाणार्‍या माध्यमिक गटातील तसेच उच्च माध्यमिक गटातील मुलांना मधल्या वेळेत खाऊचा डबा द्यावा लागत असेल तर ते पदार्थ करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. घरच्या खाण्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच बाजारी खाण्याने काय अपाय होऊ शकतो ह्याची नीट कल्पना मुलांना जरूर द्यावी. पाणी पिण्याचे महत्व आणि नेहमी बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत न्यायची सवय मुलांना शाळेत जातानाही उपयोगी पडेल.संगीताशी परिचय करून देणे… हाही छंद मुलांना फारच उपयुक्त पडेल. ह्यातून वेळही कारणी लागतो शिवाय एखाद्याला यातही आपल्या करिअरचा मार्ग सापडू शकतो.सुट्टी म्हणजे धमाल, मज्जा असली तरी लवकर उठण्यावर भर द्यावा आणि व्यायामाची सवय लावून घ्यावी. सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी. एक म्हणजे ह्याला काही पैसे पडत नाहीत शिवाय घरच्याघरी तुम्ही हे करू शकता. लहानपणी शरीर लवचीक असल्याने ही लवचिकता आयुष्यभर टिकण्यासाठी व्यायामाची सवय आवश्यक असते. ह्याला भर म्हणून योगासने शिका. आता तर शालेय स्तरावर योगासने शिकविली जाणार आहेत. शरीराच्या सुदृढतेसाठी दोरीवरच्या उड्या हा आणखी एक सोपा प्रकार सुचविला जातो ज्यामुळे समन्वय क्षमता वाढते. अशा उड्या इतर खेळांसाठी पूरक व्यायामासारखे काम करतात. ह्याशिवाय जोर, बैठका, पुश-अप्स आदींमुळे शारीरिक ताकद वाढविण्यास मदत होते हे घरबसल्या आणि पैसा खर्च न करता करावयाचे व्यायाम प्रकार आहेत… ह्यासाठी मार्गदर्शन जरूर घ्यावे. तुम्हांला शक्य असेल तर पोहण्यासाठी सुट्टी खर्च करू शकता. आपल्या गोव्याला १०५ की.मी.चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येकाला पोहायला येणे अपेक्षित आणि आवश्यक गोष्ट मानली जाते. माणसाला उपजतच पाण्याचे आकर्षण असते. शिवाय नियमित पोहण्यामुळे शरीरस्वास्थ्य उत्तम राहते. अनेक दिग्गज खेळाडू फिटनेससाठी व्यायामाला महत्त्व देतात. ह्या नैसर्गिक वरदानाचा आम्ही लाभ का घेऊ नये? जलतरणपटू म्हणूनही पुढे तुम्ही नाव करू शकता. आज ह्या प्रकारात मुली देखील प्रावीण्य दाखवू लागलेल्या आहेत.

आसपासच्या समस्या जाणून घ्या… अनेकदा आपल्या आसपास आपल्याला समस्या आढळतात. ह्यात कचर्‍याची समस्या असू शकते, रहदारीची किंवा रस्त्यावरच्या खड्‌ड्यांची असू शकते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झुडपे ज्यामुळे रहदारीला अडचण येते. अशी एखादी समस्या लक्षात घेऊन एक प्रकल्प तुम्ही तयार करू शकता. ह्यासाठी परिसरातील नागरिकांच्या सूचना घेऊन त्यावर तुम्ही एक छान शोधनिबंध तयार करू शकता. आजकाल समस्यांचे रडगाणे गाणारे पावलोपावली भेटतात. तुम्ही मात्र निवडलेल्या समस्येवर उपाय देण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच. त्यासाठी वेगळा विचार करण्याची मानसिकता अशातून पुढे येऊ शकते. काही रस्त्यालगत असलेल्या घरांच्या कुंपणालगत दगड ठेवलेले आढळतात. वास्तविक हे दगड चक्क रहदारीला अडचण आणणारे असतात. आपल्या कुंपणाला असलेला रंग खराब होऊ नये हे त्यामागचे खरे कारण. अशा घरांच्या मालकांना तुम्ही पर्याय सुचवायचा प्रयत्न करावा. एक पर्याय म्हणजे रंगाची निवड करताना तो खराब झालेला लक्षात येणार नाही असा असू शकतो. पण रंगापेक्षा एखाद्याला अपघात झाला तर…! आपल्या मंडळातर्फे श्रमदानाने खड्‌ड्यांची डागडुजी, वाढलेली झुडपे छाटणे असा प्रयत्न होऊ शकेल काय? ह्याचा विचार आपण करू शकता. समस्या असतील पण त्यावर आपण काही तोडगा सुचवू शकतो का? ह्याचा विचार आपण करण्यासाठी पावले उचलावी. ह्यासाठी आपल्या मित्रमंडळींना घेऊन विचार-विनिमय करावा.सुट्टी आणि प्रवास याचा जवळचा संबंध.

आपला देश समजण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा विषय नाही. आता रेल्वेमुळे प्रवास सहजपणे आवाक्यात आलेला आहे. जवळच्या प्रमुख शहरात जाऊन तेथील प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देऊ शकता. तेथील समस्यांना स्थानिकांनी कसे काय सोडविले आहे ते समजून घ्या. प्रश्‍न पडणे, अडचणी जाणवणे, समस्या समोर येणे ही आपण जागे असण्याची लक्षणे आहेत. तुम्ही तर शिकणारे विद्यार्थी आहात, तुमच्यात हे गुण विकसित व्हायलाच हवेत. आज सर्वत्र कचर्‍याच्या समस्येने घेरलेले आहे. आपले माननीय पंतप्रधान स्वच्छतेची महती वारंवार सांगत आहेत. अशा प्रश्‍नावर नुसता विचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृती हवी. शेजारील वेंगुर्ला शहरात शक्य असेल तर जरूर जाऊन या. तिथे रेल्वेने जाता येणार नाही. आपली कदंब सेवा त्या शहरात जाण्यासाठी उपलब्ध आहे. तिथले नगरपालिका अधिकारी श्री. कोकरे यांनी या शहराला स्वच्छतेचे वेगळेच रूप दिलेले दिसेल. आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कचर्‍याचे २३ प्रकारे वर्गीकरण करण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबविली आहे.

राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे वेंगुर्ला शहराचे नाव स्वच्छतेसाठी आदराने घेतले जाते. आपल्या परिसरात जमणार्‍या कचर्‍याचे नेमके काय होते? ह्यावर तुम्ही तुमची निरीक्षणे नोंदवा.मित्रहो, वरील सुचविलेले उपक्रमच तुम्ही सुट्टीत करावे असा आग्रह नाही. एक दिशा मिळावी म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे. तुम्हांला वेगळा उपक्रम करावासा वाटेल तर पालकांच्या, ज्येष्ठांच्या, अनुभवी मंडळीच्या मार्गदर्शनाने जरूर राबवा, जेणेकरून ह्यातून सुट्टी तर कामी येईलच शिवाय तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासात बदल व्हायला त्याने मदत होईल. सुट्टी हा आपल्या आयुष्याचा भाग आहे तो संपन्न करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. हेच प्रयत्न तुमच्या सवयीचा भाग बनतील जे तुम्हांला यशस्वी करायला लाभदायक ठरतील.