नियोजन आयोग रद्द करणार : पंतप्रधान

0
271
स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नियोजन आयोगाची स्थापना तत्कालीन परिस्थितीला अनुसरून करण्यात आली होती. मात्र वर्तमान स्थितीत या आयोगाची गरज राहिलेली नाही. त्यामुळे नियोजन आयोग रद्द करून त्या जागी वेगळी संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावर प्रथमच ध्वजारोहण केल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात केली.
नियोजन आयोगाची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिस्थितीत बदल झाला आहे.त्यामुळे हा आयोग रद्द करून त्याची जागा घेण्यासाठी नव्या संस्थेची निर्मिती केली जाणार आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
कोट्यवधी नागरिकांच्या अथक परिश्रमांमधून भारत देश घडला असून त्यासाठी तमाम देशवासियांचे आपण अभिनंदन करीत असल्याचे मोदी म्हणाले. भारतीय राज घटनेचे हे एक आगळे सामर्थ्य असल्याचे त्यांनी सांगितले. बुलेट प्रूफ कक्षात उभे न राहता त्यांनी लिखित भाषणाऐवजी उत्स्फूर्त भाषण केले.
भारताच्या विकासात प्रत्येक सरकारचे आणि नेत्यांचेही योगदान आहे. देशाच्या विकासासाठी मेहनत करणार्‍या प्रत्येक नागरिकांचे आपण अभिनंदन करतो. त्याचवेळी आपण पंतप्रधानांच्या रुपाने नव्हे तर प्रधानसेवकाच्या रुपात आपणसमोर उभा आहे असे वक्तव्य मोदी यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष व त्याग केला असून त्या सर्वांना आपण मानवंदना देतो. गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते अशी ताकद भारतीय घटनेत आहे. आपण सर्वजण एकसंध झालो तरच देश प्रगतीपथावर जाऊ शकले असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले की सगळ्याच गोष्टी आत्मकेंद्रीत असून चालणार नाहीत. काही आपल्या देशासाठीही असतात. आत्मकेंद्री वृत्तीचा आपण त्याग करावा लागेल. देशाच्या विकासाठी पुढे यावे लागेल. हिंसाचारातून काहीच साध्य होणार नाही.
प्रधानमंत्री जनधन योजना
गरिबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जाहीर केली. या योजनेखाली गरिबांना बँक खाते खोलून देण्यात येईल. तसेच सोबत डेबिट कार्ड दिले जाणार असून त्यात प्रत्येकी एक लाख रुपयांचे विमा कवच दिले जाणार आहे.
भारत आता डिजिटल इंडिया
भारत आता डिजिटल इंडिया बनला आहे असे सांगून इंटरनेट केवळ श्रीमंतांचे राहिलेले नाही असे मोदी म्हणाले. इंटरनेटचा वापर आता ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्हायला हवा असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील १२५ कोटी लोकांनी आपला देश स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला पाहिजे असे मोदी म्हणाले. महात्मा गांधी यांची २०१९ साली १५० वी जयंती साजरी केली जाणार असून तोपर्यंत देश पूर्णत: घाणमुक्त करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. या देशातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली, प्रत्येक मंदिर, प्रत्येक शाळा, हॉस्पिटल स्वच्छ असायला हवे असे प्रतिपादन त्यांनी केले. मात्र आज आपल्या देशात लाखो महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते ही लज्जास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर कंपनी सामाजिक जबाबदारी या नात्याने शाळांमध्ये मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचे आवाहन त्यांनी केले. अशी स्वतंत्र शौचालये नसलेली एकही शाळा भारतात असू नये अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.