निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् …

0
674

– प्रा. रमेश सप्रे
भगवंतानं अर्जुनाला केलेल्या समुपदेशनातील एक अमर सूत्र – ‘निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्’ अर्जुनाला प्रसंगानुरूप अनेक नावांनी संबोधित केलं गेलंय, त्या त्या संदर्भात ती सारी नावं अर्थपूर्ण आहेत. ‘सव्यसाची’ म्हणजे दोन्ही हातांनी शरसंधान करू शकणारा. उजव्या-डाव्या दोन्ही हातांनी बाण मारण्याचं कौशल्य ज्याच्या अंगी असतं त्याला ‘सव्यसाची’ म्हणतात. दोन्ही हातात पिस्तूल घेऊन चारी बाजूंना घेरून राहिलेल्या शत्रूला नेस्तनाबूद करणारा जेम्स बॉंड हा अलीकडचा अर्जुनच!
अत्यंत पराक्रमी असूनही अर्जुनाची अशी दयनीय अवस्था का झाली? आपणही माणूस म्हणून जन्माला येऊनही सतत स्वतःला बंधनात ठेवतो, मुक्तीचा प्रयत्न करत नाही. अर्जुन सव्यसाची तर आपण बुद्धिमान! तरीही अखंड आनंदात राहण्याऐवजी खचवणार्‍या दुःखाच्या चिखलात का असतो? समुपदेशक संतसद्गुरुंना याचं आश्‍चर्य व दुःख वाटतं. अनेक कारणं आपल्या बद्ध अवस्थेला आहेत. काम-क्रोध-मोह-दंभ-मद-मत्सर या सहा शत्रूंच्या अधीन असतो आपण. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं कर्तेपण आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं कारण आहे ‘हवेनको’पण! या दोन्हींचा त्याग झाला तर आणि तरच आपल्याला शांती लाभणार आहे. मुक्तीचा आनंद मिळणार आहे. हे सारं म्हटलं तर सोपं आहे अन् म्हटलं तर कठीण आहे. का व कसं? हे कळण्यासाठी काही प्रसंग पाहू या.
* नेव्हीतले निवृत्त कर्नल. यांना सकाळी उठण्याची सवय. उठल्यावर स्वतःसाठी चहा बनवणं हा नित्यक्रम! एकदा सहज त्यांच्याकडे पोहोचल्यावर उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘यावं – यावं! हाऊ आर वुई?’ ही त्यांची खासियत होती. ‘हाऊ आर यू’ कधीही म्हणायचे नाहीत. नेहमी ‘हाऊ आर वुई?’ या प्रश्‍नात एक आतला अर्थ असायचा तो त्यांचं सैनिकी चैतन्य (आर्मी स्पिरिट) व्यक्त करायचा. ‘तुम्ही ठीक तर मी ठीक. आपण दोघं ठीक.. बोथ ओके!’ याउलट जर दुसरा कुणीही दुःखी असेल तर हे कर्नलसाहेब दुःखी व्हायचे. असो. तर त्या दिवशी पहाटे चहाचा वाफाळता कप माझ्या हातात देताना नेहमीप्रमाणे विचारते झाले-
‘आता तुमच्यासमोर केलेला हा चहा तरी मी केलाय ना? या चहाचा ‘कर्ता’ आहे ना मी?’ ‘कर्ता’ शब्द अगदी ढेचात म्हणाले. त्यांना विरोध करायची इच्छा नव्हती तरीही सांगितलं, ‘नाही. तुम्ही फक्त निमित्त आहात. हा चहा तुम्ही ‘केला’ नाहीत तर फक्त ‘बनवलात!’ पुढच्या प्रश्‍नोत्तरांतून त्यांच्या लक्षात आलं की खरंच आपण खरे कर्ता नसतोच. कधीही ‘तो’ (परमेश्‍वर) किंवा ‘ती’ (शक्ती) किंवा ‘ते’ (चैतन्य) असतं. ‘करविता’ही तोच असतो. आपल्या माध्यमातून तो निरनिराळ्या घटना घडवतो एवढंच. आपण सारे निमित्तमात्र! चहा करायला लागणारं पाणी, दूध, साखर, चहापावडर, गॅस हे सारं काय मी बनवलं? मग चहाचा कर्ता मी कसा? – विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
* आता ही गोष्ट पाहू. एक कुशल मूर्तिकार. दगड, धातू, लाकूड, काच अनेक माध्यमातून जिवंत वाटाव्यात अशा मूर्ती साकारणं त्याला सहज जमायचं. अशा मूर्तींचं एक भव्य प्रदर्शन त्यानं भरवलं. एका नवयौवना सुंदरीची त्यानं बनवलेली हुबेहूब मूर्ती त्याची त्यालाच खूप आवडायची. त्या मूर्तीला त्यानं दर्शनी भागात सर्वांना आल्या आल्या दिसेल अशा रीतीनं ठेवलं व कुणाच्याही लक्षात येणार अशा पद्धतीनं जवळच उभा राहिला. त्यानं मनातल्या मनात ठरवलं होतं की जी व्यक्ती या मूर्तीचं सुंदर रसग्रहण (ऍप्रिसिएशन) करील त्याला नमस्कार करायचा व पुरस्कार द्यायचा. सुरुवातीला काही तरुण मंडळी आली. मूर्ती पाहताच सर्वांच्या तोंडून एकदम उद्गार- ‘हाऊ ब्यूटिफुल!’ इतक्या कमी वयात कलेची एवढी जाण आलेली पाहून त्यांना पुरस्कार देण्यासाठी मूर्तिकार पुढे सरणार इतक्यात ती मुलं आपापसात बोलू लागली – ‘मूर्तीच चर एवढी सुंदर आहे तर जिच्यावरून ही बनवली ती ‘मॉडेल’ किती सुंदर असेल! आजूबाजूला मूर्तिकार असेल तर आपण त्याला तिचा मोबाइल नंबर विचारूया! एक पाऊल पुढे सरकलेला मूर्तिकार दोन पावलं मागे सरला.
नंतर एक व्यक्ती आली व मूर्ती पाहून उद्गारली- ‘अतिसुंदर! सर्व बाजूंनी ती मूर्ती न्याहाळून तो आपल्या बरोबरच्या माणसाला सांगतो ‘जरा मूर्तिकार जवळ असेल तर त्याला मूर्तीसाठी हा संगमरवरी (मार्बल) दगड कुठे मिळाला हे विचारलं पाहिजे. ‘हा माणूस अर्थातच दगडांचा व्यापारी होता. त्याला दगडात रुची होती. मूर्तीत नव्हती.
शेवटी डुलत डुलत एक शेतकर्‍यासारखा दिसणारा माणूस आला. तोही ती देखणी मूर्ती पाहून थक्क झाला. तिला प्रदक्षिणा घालून झाल्यावर गुडघे टेकून बसला. आकाशाच्या दिशेनं हात उभारून म्हणाला, ‘देवा तू महान आहेस! इतकी सुंदर मूर्ती तुझ्याशिवाय कशी बनू शकेल?’ हे ऐकून काहीसं रागावूनच तो मूर्तिकार म्हणाला, ‘मूर्ती मी बनवलीय!’ यावर तो शेतकरी म्हणाला, ‘अहो असं कसं म्हणता? मूर्ती ज्या दगडातून साकारली तो काय तुम्ही बनवला होता? आणि ज्या लोखंडाची ती छिन्नी नि हातोडी ती काय तुम्ही बनवलीत की तुमच्यापासून बनली? आणि ज्या कलेतून ही अप्रतिम मूर्ती घडली ती कला तुम्हाला कोणीतरी शिकवलीच ना? तुमचे गुरू, त्या गुरूंचे गुरू, त्या गुरूंचेही गुरू असणारच. मला सांगा असा कोणीतरी पहिला शिल्पकार – मूर्तिकार असेलच ना ज्याला ही कला आतल्या शक्तीच्या प्रेरणेनेच शिकवली असेल. त्यालाच मी देव म्हणतो. म्हणून सार्‍याचा कर्ता तो महान परमेश्‍वरच!’… हे अगदी सत्य असे उद्गार ऐकून मूर्तिकारानं त्याचे पाय धरले.
** साधा एका कुटुंबानं वाढवलेल्या केळीच्या झाडाला आलेला भरघोस घड. आपण लावलेल्या व वाढवलेल्या केळीचा तो घड पाहून घरातला कर्ता पुरुष म्हणतो, ‘आपला घड आपण उद्या कापू हं. कुणाला किती किती केळी वाटायची त्याची यादी बनवा. अर्थात पहिली केळी देवाला हं!’ दुसरे दिवशी सकाळी उठून पाहतो तो घड चोरीला गेलेला. हा कर्ता पुरुष एवढा हळहळला की मटकन् खालीच बसला. ‘काय झालं बाबा?’ म्हणत जवळ आलेल्या मुलाला दूर ढकलून म्हणाला, ‘मी लावलेल्या केळीचा घड गेला रे! कोणा दुष्टानं तो कापून नेला.’ मुलालाही वाईट वाटलं पण कसं कुणास ठाऊक तो बोलून गेला- ‘बाबा, तुम्ही चुकताय.. ज्या जमिनीत ते रोप लावलं ती जमीन काय आपण बनवली होती? अन् त्या रोपाला घातलेलं पाणी, खत, मिळालेला सूर्यप्रकाश आणि ते रोपटं ज्यात वाढलं ते आकाश.. अन् मुख्य म्हणजे ते केळीचं रोप, यातलं आपण स्वतः काय बनवलं होतं? आपण फक्त कष्ट केले, काळजी घेतली. बस्!’ यावर बाबा डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहात उद्गारले, ‘खरंय तुझं. आपण खरे कर्ते नाहीच. आपण फक्त निमित्तमात्र!’
*** याहूनही मार्मिक उद्गार रामकृष्ण परमहंसांचे आहेत. ते म्हणायचे- ‘देव दोनदा हसतो!’ यासाठी ते एक प्रसंग सांगायचे. ‘एका गावाकडच्या कुटुंबातले वडील वारले. उरले तिघेजण. आई नि तिची दोन मुलं. तशी मुलं मोठी होती. वडील गेल्यावर आईच्या विरोधाला न जुमानता दोघांनी जमिनीची वाटणी केली. पण मधला बांध(कुंपण) घालताना एकाच्या हद्दीत बांधला गेला. माझ्या हद्दीत का बांधलास तू बांध? यावरून दोघे भाऊ हमरीतुमरीवर आले. त्यांचं भांडण एवढ्या थराला पोचलं की दोघांनी हातातल्या कुर्‍हाडींनी एकमेकांवर जीवघेणे वार केले. एक जागच्या जागीच मेला. दुसरा रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होऊन पडला. त्याला डॉक्टरकडे नेलं. त्या खेड्याच्या परिसरात हे एकच डॉक्टर. त्यांच्याकडे या बेशुद्ध मुलाला नेल्यावर त्याला ऑपरेशनसाठी नेताना डॉक्टर त्याच्या दुःखात बुडालेल्या मातेला म्हणाले, ‘चिंता करू नकोस. मी आहे ना?’ यावर ती म्हणाली, ‘डॉक्टर खरंच सांगताय की मला म्हातारीला खोटा धीर देताय?’ डॉक्टर अति अहंकारानं म्हणाले, ‘मी खरंच सांगतोय. मी असल्यावर तुझ्या मुलाला यमसुद्धा काही करू शकणार नाही.’ .. म्हातारी आई काही बोलली नाही पण एक भीती तिच्या मनात उभी राहिली कारण अपघातात सापडलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाला हेच डॉक्टर वाचवू शकले नव्हते. एवढं सांगून रामकृष्ण म्हणायचे, ‘देव दोनदा हसला. एकदा – ‘माझ्या हद्दीत तू बांध का उभा केलास?’ असं त्या भावानं म्हटल्यावर व दुसर्‍यांदा ‘मी वाचवतो याला’. असं डॉक्टर म्हणाले तेव्हा!’ खरंच आहे. मी-मला-माझं-माझ्यासाठी इ.इ. आपण जे बोलतो व त्याप्रमाणे वागतो तेव्हा देव हसत असतो कारण सारं काही त्याचंच आहे ही वस्तुस्थिती असताना – तो परमेश्‍वरच किंवा ती अव्यक्त शक्ती कारण असताना मध्ये मी-माझा हा चोर कुठून आला? हा ‘मी’ फक्त निमित्तमात्र आहे. प्रत्यक्षात सारं तोच आहे. त्याचंच आहे!
म्हणून भगवान समरप्रसंगी अर्जुनाला जे सांगताहेत ते आपल्या जीवनात सदैव उपयोगी आहे. कारण तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे – ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जग आणि मन॥ आपलं जीवन युद्धापेक्षा कमी संघर्षमय नाही.
एकदा का आपण स्वतःला ‘कर्ता’ मानायला लागलो की अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. उदाहरणार्थ –
* मनावर सतत ताण, दडपण राहतं की आपल्या हातून हे काम होईल ना? आपल्याला ते जमेल ना? .. मनावरचा ताण (स्ट्रेस) आपला फार मोठा शत्रू आहे. हृदयावरचा ताण किंवा अडथळे (ब्लॉकेजेस) समजण्यासाठी जी ‘स्ट्रेस टेस्ट’ घेतली जाते तीही पूर्ण विश्‍वसनीय नसते. मन मनावरचा ताण तर अतिसूक्ष्म! तो समजण्यासाठी, हाताळण्यासाठी, त्याचं व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट) करण्यासाठी करावयाची उपाययोजना किती अवघड असेल!
* दडपणाखाली केलेलं काम कधीही मुक्त मनाबुद्धीनं केलेल्या कामाइतकं उत्कृष्ट होऊ शकत नाही. आपले आपण स्वतःला पूर्ण व्यक्त(एक्स्प्रेस) करू शकत नाही. शिक्षकाचं अध्यापन; खेळाडूचा खेळ; गायकाचं गायन; नटाचा अभिनय; लेखकाचं लेखन दडपणाखाली कधीही सर्वोत्तम (द बेस्ट) होऊ शकणार नाही.
* मुख्य म्हणजे सतत मी हे केलं, मी ते करीन असं ‘मी-मी’ केल्यामुळे खोटा अहंकार बळावतो. नम्रता अंगी बाणली जात नाही. एकूणच जीवन व आपण जगमित्र होण्याऐवजी जगत्‌शत्रू बनून जातो. पैसा-प्रतिष्ठा-सत्ता-उपभोग हे अधिकाधिक मिळवावसं वाटतं व त्यासाठी केलेल्या जीवघेण्या प्रयत्नात आपण ‘अमानुष’ बनण्याची शक्यता असते. पुराणातील वसिष्ठ-विश्‍वामित्र यांचा संघर्ष असाच आहे. ‘ब्रह्मर्षी’ म्हणवून घेण्याच्या ईर्षेने विश्‍वामित्र पछाडले जातात. वसिष्ठांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. पण शांतपणे वसिष्ठ त्यांना सुचवतात – विश्‍वामित्र (म्हणजे विश्‍व अमित्र – विश्‍वाचा शत्रू) बनण्याऐवजी ‘विश्‍वमित्र’ बना. ब्रह्मर्षिपद तुमच्याकडे चालत येईल. यानंतर त्यांच्यातील एकतर्फी संघर्ष संपला. आणि विश्‍वामित्रांची खूप आध्यात्मिक उन्नती झाली. इतकी की गायत्री मंत्र त्यांच्या तोंडून प्रकटला.
हे टाळण्यासाठी आपण काही गोष्टी अगदी जीवनात उतरवल्या पाहिजेत-
* विश्‍वरूपदर्शन प्रसंगी अर्जुनाला भगवंतांनी हा उपदेश केलाय. ‘निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्’| अर्जुनानं नक्की भगवंताच्या या सांगण्यावर विचार केला असेल. ‘मी युद्ध करणार नाही.’ किंवा ‘मी युद्ध करीन’ हे दोन्ही म्हणायला मी पात्र नाही कारण ज्यांच्या आधारे मी युद्ध करीन त्या गोष्टी माझ्या कुठेयत? – माझा रथ, गांडीव धनुष्य – बाण सारं अग्नीनं दिलंय; मी वापरत असलेली अस्त्रं, मंत्र, शक्ती हे तरी मी द्रोणाचार्य, कृपाचार्य, शंकर (पाशुपतास्त्र), इंद्र (वासवी शक्ती) हे सारं मी केलेलं कुठंय – कर्ते तर दुसरेच आहेत. – मुख्य म्हणजे माझा रथ रणांगणावर कोण चालवतोय? एक म्हणजे अश्‍व (घोडे) आणि श्रीकृष्ण भगवान! – आपणही असाच विचार केला पाहिजे.
– संसारात जमवलेल्या, वापरण्यात येणार्‍या गोष्टी आपण निर्माण केलेल्या नसतात. उगीचच उपभोगाची मालकी आपण सांगतो. एका कुटुंबात ‘माझी निळी बादली तू का वापरलीस?’ या बाबांच्या क्रोधयुक्त प्रश्‍नाला आईचं उत्तर, ‘कारण काल तुम्ही माझी लाल बादली वापरली होती.’ हे तू तू मै मै खूप वाढत जाण्याची चिन्हं पाहून घरातला छोटू म्हणाला, ‘आईबाबा भांडण बंद करा पाहू! आई बादली तुझीही नाही नि बाबांचीही नाही. ती आहे प्लास्टिकची!’
खरंच, मुळात जाऊन पाहिलं तर आपलं काय आहे? आपण काय बनवलंय?
आपण ज्याला आपलं आपलं – माझं माझं म्हणतो ते असतं दुसर्‍याचंच नि कर्ता करविताही दुसराच असतो. त्याला शरण जाऊन, त्याची इच्छा आपल्या हिताची मानण्यातच आपला खरा आनंद असतो. त्याची वस्तूच त्याला अर्पण करायची ती अर्पण करतानाचा आनंद व समर्पण भावना आपली असते- ‘त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयेत|’ – ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ असं म्हणून सर्व कर्मांचं कर्तेपण सोडून निमित्तमात्र बनायला शिकलं पाहिजे.
* आपण सतत दृश्य वस्तू, व्यक्तींचं स्मरण करत असतो. त्यांच्याशी सारे व्यवहार करत असतो. सृष्टीला जाणतो – अनुभवतो – उपभोगतो पण सृष्टिनिर्मात्याला विसरतो. म्हणून आपल्याला निखळ आनंद उपभोगता येत नाही. सर्वांशी समरस होता येत नाही. सर्वांशी कृतज्ञ बनून जीवन कृतार्थ होता येत नाही.
आपलं कसं होतं माहितै? – एका गुरूनं आपल्या दोन शिष्यांना विचारलं, ‘आत्ता तुम्हाला काय ऐकू येतंय?’ एक शिष्य म्हणाला, ‘मला पक्ष्याचं गोड गाणं ऐकू येतेय.’ – दुसरा म्हणाला, ‘मी गोड गाणारा पक्षी ऐकतोय!’ गुरूनं दुसर्‍याला शाबासकी दिली कारण तो निर्मात्याला (क्रिएटर) अनुभवत होता तर दुसरा निर्मितीला (क्रिएशन).
आपणही गाणी ऐकता ऐकता गाणार्‍याला, नव्हे गाववणार्‍या धन्याला ऐकू या… सर्वांच्या कर्त्याकरवित्याचं स्मरण ठेवायला शिकू या.