‘निपाह’ चे आव्हान

0
152

केरळमध्ये ‘निपाह’ विषाणु संसर्गामुळे झालेल्या काही मृत्युंमुळे सध्या देशात चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः केरळच्या ज्या कोझीकोडे (कोळ्ळीकोड) जिल्ह्यात हे मृत्यू ओढवले, त्या व आजूबाजूच्या परिसराशी संपर्क आलेल्या नागरिकांमध्ये भय निर्माण होणे स्वाभाविक आहे, परंतु या विषाणू संसर्गाविषयी प्रसारमाध्यमांतून व सोशल मीडियातून सुरू झालेल्या चर्चेमुळे, ज्यांचा त्या परिसराशी वा रुग्णांशी काही संंबंध नाही अशा आम लोकांमध्येही ‘निपाह’ विषयी नाहक भीती निर्माण होते आहे. हे केवळ ‘निपाह’ बाबतच घडते आहे असे नव्हे, आजवर देशात जेव्हा जेव्हा एखाद्या नव्या, अपरिचित आजाराविषयीच्या बातम्या आल्या, तेव्हा अशाच प्रकारचे गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘सार्स’ असो, ‘बर्ड फ्ल्यू’ असो किंवा गोव्यातील ‘माकडताप’ असो, त्याविषयी अशीच भीती निर्माण झाली होती. गोव्यात तर साधी सर्दी – पडसे झालेल्या एका रुग्णाला तो केवळ ‘सार्स’ बाधित देशातून आलेला असल्याने ‘सार्स’चा रुग्ण ठरवण्याचा प्रकार घडला होता. ‘बर्ड फ्ल्यू’ बाबतही चर्चांना ऊत आल्याने कोंबड्या आणि अंड्यांची विक्री बंद पडली होती. जनतेमध्ये भीती निर्माण होते ती चुकीची म्हणता येणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव प्यारा असतो. एखाद्या आजारावर उपचारच नाहीत असे जेव्हा सांगितले जाते आणि धडाधडा रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्या येतात, तेव्हा धास्ती ही वाटणारच. शिवाय ‘निपाह’ ची प्राथमिक लक्षणे ताप, डोकेदुखी, थकवा अशी सामान्य स्वरुपाची असल्याने साध्या वायरल तापालाही ‘निपाह’ ठरवले जाणे काही असंभव नाही. अशावेळी आरोग्य यंत्रणेने अधिक सक्रिय होऊन जागरुकता दर्शवणे गरजेचे आहे. केरळमध्ये ‘निपाह’ चे रुग्ण आढळताच तेथील आरोग्य यंत्रणेने कमालीच्या तत्परतेने पावले टाकल्याचे दिसून येईल. केंद्र सरकारही लागलीच सक्रिय झाले आणि दिल्लीच्या ‘एम्स’च्या तज्ज्ञांचे पथक केरळला रवाना करण्यात आले. केरळमधील पेरंब्राजवळच्या चांगारोथ पंचायतक्षेत्रातील सुप्पीकड्डा गावात नव्याने घर बांधलेल्या एका कुटुंबाने आपल्या आवारातील पडीक विहीर स्वच्छ करायचे ठरवले. कुटुंबातील दोघे भाऊ त्यासाठी त्या विहिरीत उतरले. तेथे वास्तव्य करून असलेल्या वटवाघुळांमुळे त्यांना या विषाणूचा संसर्ग झाला असा निष्कर्ष केरळच्या आरोग्य खात्याने काढलेला आहे. मलेशिया, बांगलादेशात यापूर्वी या विषाणूचा संसर्ग आढळून आलेला होता. मात्र, त्यावर अद्याप औषध नाही. त्यासंबंधीच्या संशोधनाला जागतिक आरोग्य संघटनेने प्राधान्यक्रम दिलेला आहे, त्यामुळे लवकरच त्यावर एखादी लस उपलब्ध होईल अशी आशा आहे. मुळात वटवाघुळांमध्ये हा विषाणू पसरण्यामागील कारणेही शोधली जात आहेत. रानेवने नष्ट होत चालल्याने या वटवाघुळांची राहण्याची ठिकाणे नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे ती शहरांकडे येऊ लागली आहेत. नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने तणावग्रस्त बनलेल्या आणि भुकेलेल्या अशा वटवाघुळांची प्रकृती क्षीण होत असल्याने त्यात विषाणू संसर्गाची शक्यता अधिक असते व हे विषाणू त्यांच्या मलमुत्राद्वारे बाहेर फेकले जातात. त्यांच्या संपर्कात माणूस आल्यास मग त्यालाही त्याची बाधा होते आणि मग संसर्ग पसरत जातो. म्हणजे मुळात या सगळ्याला माणूसच कारणीभूत आहे. माणसांनी पर्यावरणावर घातलेला घाला शेवटी माणसाच्याच मुळावर येत चालला आहे हा यातील महत्त्वाचा निष्कर्ष आहे. आपल्याकडील माकडतापाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. या विषाणूवर जोवर प्रभावी औषध नाही, तोवर त्याचा प्रसार होऊ नये याची काळजी घेणे एवढेच आपल्या हाती उरते. त्यासाठी संसर्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे, आवश्यक खबरदारी घेणे हे आत्यंतिक गरजेचे ठरते. सोशल मीडियावरून अशा आजाराविषयी भलत्यासलत्या अफवा पसरवणे, आपले अल्पस्वल्प ज्ञान पाजळणे, खोटे दावे करणे असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. केरळ सरकारने त्या दिशेने पावले टाकली आहेत. आपले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही भयभीत न होण्याचे आवाहन गोव्याच्या जनतेला केलेले आहे. किमान अफवा न पसरवण्याची काळजी तरी आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारची कोणतीही साथ ही खरे म्हणजे आरोग्य खात्याच्या कार्यक्षमतेची कसोटी असते. सरकारी यंत्रणेने मनात आणले तर अशक्य वाटणारी कामे ती करू शकते हे ‘पल्स पोलिओ’ किंवा ‘क्षयरोगा’सारख्या मोहिमांमध्ये दिसून आलेले आहे. ‘पल्स पोलिओ’ची मोहीम ज्या विलक्षण कार्यक्षमतेने आणि झपाट्याने देशभरात राबवली गेली, त्यातून आपण देश पोलिओमुक्त करू शकलो. आज पुन्हा एकवार देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या कसोटीचा क्षण आलेला आहे. ‘निपाह’ चा सक्षमपणे मुकाबला करून या जीवघेण्या आजाराचा प्रसार न होऊ देण्याचे आणि त्यावर नियंत्रण आणण्याचे हे आव्हान आपल्या आरोग्ययंत्रणेने पेलून दाखवावे. त्यासाठी अर्थातच जनतेची साथही तितकीच मोलाची असेल.