निद्रानाश

0
212
  • वैदू भरत म. नाईक

सामान्यपणे पोटात वायू धरणार नाही किंवा उष्णता भडकणार नाही अशा स्वरूपाचा आहार व दैनंदिन वागणूक असावी. सात्त्विक आहार म्हणजे दूध, तूप, गहू, मूग, नारळाचे पाणी, कोथिंबीर, दुधी भोपळा, पडवळ असा सामान्य आहार असावा.

आयुर्वेदात औषधाचे वर्गीकरण करताना अनेक प्रकार केले आहेत. भूक लागणारी, जुलाब थांबवणारी, जुलाब करवणारी, खोकला थांबविणारी, तापावरील असे अनेक औषध गुण किंवा गट आहेत. मात्र झोपेवर म्हणून असा खास झोपेवरच्या औषधांचा वर्ग सांगितलेला नाही. याचे कारण फारच सोपे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याचप्रमाणे प्रत्येक रोगाप्रमाणे झोप न येण्याची, कमी येण्याची, खंडीत होण्याची वेगवेगळी कारणे, परंपरा व त्यानुसार उपचार, औषधे असतात. औषधी द्रव्ये आयुर्वेदात नाही असे नाही. केवळ झोपेकरीता औषध असा आयुर्वेद शास्त्र विचार करीत नाही. यापेक्षा सखोल विचार करून रोगाचे मूळ कारण कसे दूर करता येईल हे आपण पाहू.
कारणे ः-
१) मानसिक विकार ः * मन दुर्बळ होणे. त्यामुळे दैनंदिन साध्या-सोप्या प्रश्‍नापासून अवघड प्रश्‍न, संकटे यांच्या विचारांमुळे झोप न येणे.
* अपस्मार, भय या विकारांमुळे वेळीअवेळी गुंगीत असणे. त्यामुळे वेळच्या वेळी झोप न येणे.
२) अजीर्ण ः * रात्री खूप उशीरा जेवण. * रात्री नेहमीपेक्षा जास्त जेवण, जड पदार्थ खाणे, विशेषतः वायु पोटात धरणे… जसे शेव, भजी, चिवडा, मांसाहार, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, लस्सी, बर्फ इ. घेणे.
३) जखम ः निरनिराळ्या शस्त्रकर्मामुळे व आघातामुळे झालेल्या जखमेचा ठणका, पू, ताप यामुळे झोप न येणे, शय्याव्रण, प्रसूतीकळा, प्रसुतीनंतर झोप न येणे.
४) वातविकार ः अर्धांगवात, संधिवात, गृध्रसी, सायटिका, आमवात या विकारात झोप न येणे.
५) श्रम व दुबळेपणा ः शारीरिक श्रम अधिक झाल्यामुळे झोप न येणे, आहारामध्ये असंतुलन करणे, काही कारणांनी शरीरातून रक्त कमी होणे, रक्तस्राव होणे.
६) ज्वर व पित्तविकार ः तापामध्ये चढउतार असणे, डोळे, हातपाय, सर्वांग यांची आग होणे, इतर विकार, दमा, कावीळ, रक्तदाबवृद्धी.
शरीर परीक्षण –
डोळे, चेहरा ओढलेला आहे काय हे पहावे. डोळे निस्तेज आहेत काय? डोळ्यात लाली आहे काय? हे बघावे. डोक्याचा स्पर्श गरम आहे का हे पहावे. जीभ तपासून पहावी. त्यावरील कीटण, ठिपके बघून कृमी, मलावरोध या कारणांचा विचार करावा. या कारणांकरिता पोटात वायू आहे का हे ठरविण्याकरता आमाशय, पक्वाशय यांची तपासणी करावी. काविळीकरीता यकृताची सूज तपासावी.
पथ्यापथ्य –
१) सामान्यपणे पोटात वायू धरणार नाही किंवा उष्णता भडकणार नाही अशा स्वरूपाचा आहार व दैनंदिन वागणुक असावी.
२) सात्त्विक आहार म्हणजे दूध, तूप, गहू, मूग, नारळाचे पाणी, कोथिंबीर, दुधी भोपळा, पडवळ असा सामान्य आहार असावा.
३) म्हशीचे दूध रात्री झोपताना घ्यावे.
४) अंथरूण खूप जाड किंवा खूप कठीण नसावे.
५) हवा मोकळी पण वारा असलेली नसावी.
६) झोपण्याच्या खोलीत मंद वासाची उदबत्ती सावकाश जळू द्यावी.
७) श्रम खूप झाल्यामुळे लगेच झोपल्यास झोप येते. त्याऐवजी आंघोळ केली तर झोप उडून जाते.