नितीन गडकरींची भूमिका दुटप्पी

0
184

>> मगोकडून गडकरींच्या वक्तव्याचा निषेध

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मगोपचे नेते ढवळीकर बंधूंवर केलेली टीका अनाठायी आहे. गडकरी महाराष्ट्रातील प्रचार सभेत पक्ष बदलूंना धडा शिकवण्याचे आवाहन करतात. तर, गोव्यात पक्ष बदलू राजकारण्याला पाठिंबा देतात. त्यांची ही भूमिका दुटप्पी असल्याचे टीका मगो पक्षाचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी ‘मगो पक्षाला हद्दपार करा’ या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या प्रचार सभेत केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

मगो पक्ष हा या मातीतील बहुजन समाजाचा पक्ष आहे. हा पक्ष संपविण्याचा आत्तापर्यंत अनेकांनी अयशस्वी प्रयत्न केला. परंतु, मगो पक्ष गेल्या काही वर्षांत फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत आहे, असे सावंत यांनी सांगितले.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. परंतु, मगो पक्षासारख्या एका प्रादेशिक पक्षाला का घाबरतात हे कळत नाही? असा प्रश्‍न सावंत यांनी केला. मगो पक्ष मतदारांच्या बळावर जिवंत असून यापुढेही कायम राहणार आहे. मगो पक्ष हा बहुजन समाजाचे व्यासपीठ आहे. मगो पक्षाचा अवमान हा बहुजन समाजाचा अवमान आहे, असे ते म्हणाले.
मगो पक्षाने भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी मगो पक्षाच्या कार्याचे कौतुक केले जात होते. मगो पक्षाचे दोन आमदार रात्रीच्या वेळी फोडल्याने मगो पक्ष दुखावला आहे. त्यामुळे मगो पक्षाला भाजप विरोधात कठोर निर्णय घ्यावा लागला, असेही सावंत यांनी सांगितले.
मगो पक्षाने भाजप आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेणारा ठराव संमत केलेला आहे. लवकरच ठरावाची माहिती राज्यपालांना दिली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.