निजामुद्दिनमधील कार्यक्रमामुळे अनेक राज्यांत कोरोनाचा फैलाव

0
192

दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमामुळे देशातील जवळ जवळ १५ राज्यांत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी जवळजवळ ४४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हजारो नागरिक विविध राज्यांतून आले होते. ते आपापल्या राज्यात परत गेल्यामुळे त्या त्या राज्यांत कोरोना विषाणू पसरला आहे. यात तेलंगणा, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल यासह १५ राज्यांतील नागरिकांचा सहभाग आहे.  त्याचप्रमाणे या कायक्रमात विदेशातूनही बर्‍याच संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, निजामुद्दीन येथे झालेल्या या एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाच इमारतीतील २४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सध्या परिसरातील अनेकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून निजामुद्दीनमधील हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच शेकडो लोकांच्या चाचण्या केल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मौलानाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मरकजच्या मौलानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.