निकाल काय सांगणार?

0
180

पणजी आणि वाळपई मतदारसंघांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बहुचर्चित पोटनिवडणुकांमध्ये, गेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या गोव्यातील सत्तापिपासू राजकीय घडामोडींप्रतीचा रोष मतदार व्यक्त करणार की, या मतदारसंघांना आजवर आपले बळकट बालेकिल्ले बनवणार्‍या मनोहर पर्रीकर आणि विश्वजित राणे यांचा वैयक्तिक करिष्मा त्यावर भारी ठरणार याचा कस या पोटनिवडणुकीत लागणार आहे. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपद त्यागून गोव्यात परतून पक्षाला बहुमत नसतानाही सरकार स्थापनेसाठी केलेले हट्टाचे प्रयत्न आणि विश्वजित राणे यांनी आपल्या कॉंग्रेस पक्षाला निर्णायक क्षणी रामराम ठोकून भाजपची धरलेली वाट यावरील मतदारांची प्रतिक्रिया खरोखरच मतांमधून व्यक्त होणार की नाही हे हा निकाल सांगणार आहे. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजपचे सरकार, वर मोदी आणि गोव्यात पर्रीकर यांची जनमानसातील लोकप्रियता कितपत टिकून आहे वा किती घसरली आहे तेही या निकालातून स्पष्ट होणार आहे. पर्रीकर आणि विश्‍वजित या दोन्ही उमेदवारांची आपापल्या मतदारसंघांवर प्रदीर्घ काळ पकड राहिली आहे. पर्रीकर १९९४ पासून गेली तेवीस वर्षे पणजीला आपला बालेकिल्ला बनवून राहिले आहेत. ९४ साली त्यांनी कॉंग्रेसच्या केशव प्रभूंवर मात करून पणजीत पाय रोवले, ते वर्षागणिक अधिकाधिक मजबूत करीत नेले. त्यांना मिळालेली मते दर निवडणुकीगणिक वाढत गेली. २०१२ च्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांनी अकरा हजारांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर संरक्षणमंत्री म्हणून त्यांना दिल्लीला जावे लागले तेव्हा आपला चेला सिद्धार्थ कुंकळकर याला उमेदवार म्हणून त्यांनी पणजीत उभे केले, तेव्हा पर्रीकरांच्या पुण्याईवर कुंकळ्येकरांनी ९९८० मते प्राप्त केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत सिद्धार्थची मते विरोधात बाबूश मोन्सेर्रात उभे ठाकल्याने ६८११ पर्यंत घसरली. आता बाबूश महोदय सत्ताधारी भाजपच्या पाठीशी व्हाया गोवा फॉरवर्ड उभे ठाकले आहेत आणि सिद्धार्थच्या जागी स्वतः पर्रीकर आपला जुना करिष्मा दाखवून देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पणजी मतदारसंघावर कॉंग्रेसची छाप गेल्या दोन दशकांत तर कधीच दिसली नाही. कॉंग्रेसच्या मतांची मजल पाच हजारांचा आकडाही क्वचितच गाठू शकली. रमेश सिलीमखान, दिनार तारकर आणि यतीन पारेख कॉंग्रेसच्या वतीने उभे होते, तेव्हा त्यांच्या मतांचा आकडा साडेचार – पाच हजारांच्या आसपास येऊन घोटाळला, परंतु गेल्या काही वर्षांत भाजपाचा वारू पणजीत दुपटीने पुढे दौडला आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंच भाजपाच्या मतांमध्ये खिंडार पाडायला सरसावला आहे, परंतु २०१७ च्या निवडणुकीत सगळी ताकद पणाला लावून आणि मगो साथीला असतानाही ही गोसुमं आपला प्रभाव दाखवू शकलेला नव्हता. कॉंग्रेसने यावेळी गिरीश चोडणकर यांना शेवटच्या क्षणी पर्रिकरांविरुद्ध उभे केले. कॉंग्रेसचे संघटन पणजीत अस्तित्वात नाही. बाबूश पर्रिकरांमागे आहेत. अशा परिस्थितीत पर्रीकर द्वेषावर आधारित मते गिरीश किती मिळवू शकतात यावर या कथित रोषाचे वास्तव रूप समोर येणार आहे. या निवडणुकीत जातीयवादही उकरून काढण्यात आला. बहुजनांची साडे नऊ हजार मते पणजीत आहेत, अल्पसंख्यकांची सात हजार आहेत वगैरे हिशेब काहींनी मांडले आहेत, परंतु हा जातीयवाद प्रत्यक्ष मतदानात कितपट टिकला तेही येणारा निकाल सांगेल. वाळपईमध्ये परिस्थिती यावेळी वेगळी आहे. विश्‍वजित राणे यांनी २००७ च्या निवडणुकीपासून पित्याच्या पावलांवर पावले टाकत राजकीय क्षितिजावर पदार्पण केले. त्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी भाजपच्या पुती गावकरांवर तब्बल ६१ टक्के मते मिळवून मात केली होती. २०१२ साली त्यांच्या मतांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आणि २०१७ च्या निवडणुकीत तर तो तेरा हजारांचा पल्ला पार करून गेला. मतदारसंघावरील ही पकड आता कॉंग्रेस त्यागून भाजपच्या गोटात शिरल्यानंतर कितपत टिकून उरेल हे ही निवडणूक सांगणार आहे. विश्‍वजित यांच्या भाजप प्रवेशामुळे नाराज झालेले दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आणि मतदार ही नाराजी मतांतून कितपत व्यक्त करतात तेही हा निकाल सांगेल. वाळपईत रॉय यांच्यापेक्षा वडील रवी नाईक यांची बहुजन समाजाचा प्रभावी नेता म्हणून असलेली प्रतिमा या निवडणुकीत आपल्या मुलाला कितपत फायदा मिळवून देते तेही दिसेल. या पोटनिवडणुकांचे येणारे निकाल एकतर्फी लागतील की तुल्यबळ लढत दिसेल आणि ते विद्यमान सरकारला अधिक सक्षम बनवतील की, त्यापुढे अनिश्‍चिततेची टांगती तलवार ठेवतील हे देखील सांगणार आहेत, त्यामुळेच या दोन्ही पोटनिवडणुका असल्या तरीही गोव्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणार्‍या ठरतील यात शंका नाही.