नार्वे येथे सापडले जैन मंदिराचे अवशेष

0
115

डिचोली तालुक्यातील नार्वे ग्रामस्थांनी विस्मृतीत गेलेले कदंबकालीन जैन मंदिर प्रकाशात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. काल या मंदिराचे जीर्ण अवशेष इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीस पडले. देऊळवाडा, नार्वे येथील सदानंद चोडणकर, प्रकाश भाटे, सत्यवान चोडणकर यांनी खरूप या ठिकाणी उद्ध्वस्त जैन मंदिराचे लहान मोठे २० च्या आसपास अवशेष अभ्यासकांना दाखविले. नार्वे येथील सिद्धेश्वर मंदिरापासून ५०० मीटरच्या अंतरावर सागवानी व काजूच्या लागवडीत कदंबकालीन जैन मंदिराचे अवशेष विखुरलेले सापडले.

१९८१ मध्ये गोवा सरकारच्या पुरातत्व, पुराभिलेख व वस्तुसंग्रहालय खात्याला या ठिकाणी मस्तक विरहीत पार्श्‍वनाथ आढळला होता. २००१ मध्ये सुरेश वेरेकर यांना हिंदोळेवाडा येथे पार्श्‍वनाथाची मूर्ती सापडली होती. सदर मूर्ती इतिहास संशोधक व अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी राज्य वस्तू संग्रहालयाला देण्यास भाग पाडली होती.
१९८१ साली या ठिकाणी गोवा पुरातत्व, पुराभिलेख, वस्तुसंग्रहालय खात्याच्या अभ्यासकांनी भेट दिली होती. त्यावेळी जैन धर्म आणि संस्कृतीशी निगडीत खाणाखुणा असलेले पाषाणी अवशेष प्रकाशात आणले होते. परंतु इथून काही अंतरावर जैन मंदिराचे अवशेष कुणाला ज्ञात नव्हते. मंदिराचे बांधकाम त्या परिसरात आढळणार्‍या जांभ्या दगडाने केले असले तरी मंदिराचे छप्पर, खांब आदी काळ्या पाषाणांचे आहेत. छप्पर आणि खांबावरती जी कलाकुसर आहे ती गोवा कदंब राजवटीतील मूर्ती आणि स्थापत्य कलेची आठवण देणारी आहे, असे राजेंद्र केरकर यांनी सांगितले. सदानंद चोडणकर यांच्या मते जैन कोट येथील जैन मंदिरातील देवता आणि गुर्जर समाजाच्या लक्ष्मीनारायण या दोन्ही मंदिरांचे बांधकाम या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या गुजरात समाजाने केले असून लक्ष्मीनारायण व जैन देवता यांच्यात बंधुत्वाचे नाते होते. पूर्वजांनी दिलेल्या माहितीनुसार जैन मंदिरातील देवता सागर तळ्यात पूर्वीच्या काळी मिरवणुकीने आंघोळीसाठी येत, असे सत्यवान चोडणकर यांनी सांगितले. जैन धर्म आणि संस्कृतीच्या वारशावर प्रकाशझोत टाकणारे मंदिराचे हे जीर्ण अवशेष सुरक्षित ठेवण्यासाठी पुरातत्व खात्याने हा परिसर आरक्षित करण्याची मागणी होत आहे.