नारी… नारायणी..!

0
359

माणसांच्या गर्दीत हरवलेला माणूस वाट शोधत असतो नवीन वळणाची. कदाचित अशाच एका वळणावर पुन्हा दिसेल नवीन मार्ग नव्याने चालण्यासाठी. माणूस चालत असतो. चालतच असतो नव्या दिशेने जोपर्यंत भेटत नाही योग्य मार्ग. मग सांगा अशा स्थितीत अवघडलेली संवेदनशील नारी तिची काय असेल व्यथा. ती तर संघर्षाचा महामेरू पार करीत आपल्या जीवनाला योग्य वळत देते. नव्याने जगण्यासाठी. नारी, नारायणी… महाशक्तीचा अंश असते नारी.. हे उगीचच म्हटलं जात नाही. प्रसंगी तुफानालाही टक्कर देणारी ही नारी नारायणी इतरांना आदर्श बनून राहते. आज आपण ज्या देवीदेवतांना पुजतो, त्यांनीही अशीच मोठी कामगिरी बजावली आहे, नराधमांचा, दैत्य असुरांचा, त्यांच्या वृत्तींचा नाश केला आहे. म्हणूनच तर त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपण युगानुयुगे त्यांची थोरवी गात असतो. त्यांना पुजत असतो.
माणसांवर कधी आणि कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. त्यात अगदीच संवेदनशील अशा महिलेवर असे वाईट प्रसंग ओढवले तर काय होणार याची कल्पनाही करवत नाही. परंतु ती खचत नाही. त्याही परिस्थितीत आपली परीक्षा घेतली जाते आहे असे समजून ती उभी राहते. बिंदिया एमए झाल्या झाल्या एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाली. आत्तापर्यंत संघर्ष तिच्या कधी वाट्याला नव्हता. सधन नसली तरी खाऊन पिऊन सुखी अशा कुटुंबात वाढलेल्या बिंदियाचे तिच्या कॉलेज मित्रावर परागवर प्रेम जडले. त्यात तिला दिवस गेले. ही गोष्ट त्याला कळल्यावर त्याने तिला ऍबोर्शनचा सल्ला दिला. आपण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करू शकत नाही, असे त्याने तिला सरळ सांगितले. आभाळच कोसळले बिंदियावर. फार मनधरणी केली. आपण वेगळा संसार थाटू असेही तिने समजावले. परंतु परागने ते मूल आपलेच कशावरून असा खोचक प्रश्‍न तिला केला.. तेव्हा मात्र जखमी वाघिणीसारखी ती उभी राहिली. तिने आईवडिलांना विश्‍वासात घेऊन आपल्याला फसवल्याचे सांगितले. परंतु आपण अशा माणसाला आपल्या अपत्याचा बाप म्हणून स्वीकारणार नाही, असेही तिने सांगितले. आईवडिलांच्या पाठिंब्याने बिंदियाने मूल जन्माला घालण्याचे ठरविले. गरोदरपणात तिला फारच त्रास सहन करावा लागला. विद्यालयातून राजीनामा देण्याचा आदेश आला. अशा अवस्थेत मुलांना शिकवायला आली तर मुलांवर वाईट परिणाम होईल असा प्राचार्यांनी सल्ला दिला. तिच्या नव्या आयुष्यात आईवडील आणि भावंडांखेरीज आता कुणीच नव्हते. मैत्रिणीही दूर झालेल्या. परागने भिऊनच याच्यातून सुटण्यासाठी घाईघाईतच लग्न करून घेतले. बिंदिया तरीही खचली नाही. स्वतंत्र माता म्हणून मुलाला वाढवायचे असा ठाम निर्णय तिने घेतला. काळच सार्‍याला औषध असे मानून ती संघर्षास सामोरी गेली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी जराशी मोठी झाल्यावर तिने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. योगायोगाने कॉलेजचे प्राचार्य चांगले भेटले. तिची व्यथा समजून घेऊन त्याने तिला कामावर रुजू होण्यास सांगितले. सर्व काही ठीक चालले होते. मनासारखी नोकरीही होती. मुलीला आई बघायची. सर्व काही ठीक चालले असताना एका वेगळ्याच संघर्षाला तिला सामोरे जावे लागले. दोन-अडीच वर्षांनंतर डॉक्टरांच्या निदानानंतर समजले की तिची मुलगी मतिमंद आहे. उभं आयुष्य मुलीसाठी वाहायचं या पलीकडे तिला काहीच सुचत नव्हतं. पुरुष समाजावरचा विश्‍वास तर कधीच उडाला होता तिचा. नवरा म्हणून कुणाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचंच नाही, असा ठाम निर्णय तिने घेतला. म्हणतात ना, काळच औषध असतं सार्‍याला. या गोष्टीला आता वीस पंचवीस वर्षे उलटली. बिंदियाची मुलगी जगते तशीच आपल्या विश्‍वात आणि बिंदियाचा संघर्ष चालूच आहे. भावंडं लग्न होऊन वेगळी झाली. बिंदिया मात्र आईवडील आणि आपली मुलगी हेच आपलं सर्वस्व मानून संघर्ष करतेच आहे. किती शांत, सुस्वभावी होती बिंदिया. आता ती पोक्त झाली आहे. समाजाचे टोमणे, बोलणे झेलीत तिनेही आपल्या मनाला निगरगट्‌ट बनवलं आहे. जेव्हा गरज होती तेव्हा माणसं दूर झाली. आता ती मोठ्‌या हुद्यावर आहे तेव्हा माणसं सलाम ठोकतात याचा तिला तिटकारा वाटतो. तरीही ती जगते आहे केवळ जन्माला घातलेल्या जिवासाठी. बाई घडत असते, जसजशी तिच्या वाट्याला दु:खे येतात. ती पार करत जाते संकटांना. तिच्यातील आदिशक्तीचा अंश तिला जगण्याचे बळ देतो. खचून न जाता ती उभी राहते नवीन आयुष्य जगण्यासाठी. प्रेमात काय मिळालं बिंदियाला. केवळ धोकाच. चूक नव्हती तिची ती. तिने मनापासून प्रेम केलं होतं परागवर. हे आयुष्याचे भोग नाहीत. हा निव्वळ संघर्ष आहे… एका नारी नारायणीचा!
पुढे छोटी आणि मागे दोघी जुळ्या अशा मुलींना स्कूटरवरून माहिरा शाळेत पोचवायची. कधीतरीच चारचाकीतून निघायची सार्‍यांना घेऊन. तिचे ते धाडस पाहून नवल वाटायचे तेव्हा. अंथरुणावर खिळलेली सासू आणि कामानिमित्त अबूधाबीला असलेला नवरा. कसरत चाललेली असायची तिची. अचानक एके दिवशी मागे मुली आणि समोरच्या सीटवर बेबी कॅरिअर ठेवून गाडी चालवताना ती दिसली. त्यात एक तान्हुलं गोंडस बाळ. म्हणजे माहिराने चौथ्या अपत्याला जन्म दिलेला. संध्याकाळी वेळ काढून तिच्याकडे गेले तेव्हा तिची शौर्यगाथा समजली. सकाळी, काय ही बया. असे मनात येऊन गेलेले. संध्याकाळी मात्र तिच्या धाडसाचे नवल वाटून गेले. सासू गेल्यानंतर काही दिवसातच तिला दिवस गेलेले. नातेवाईक म्हणू लागले, ‘अमिना आयेगी|’ पण माहिराला तर मुलगा हवा होता. असो… प्रसंग समोर ठाकला की आपसूकच बळ येतं म्हणतात ना, तसंच माहिराच्या बाबतीत झालं. डिलीव्हरीची वेळ जवळ आली म्हणून आमिर सुट्‌टी घेऊन तिला भेटायला आला होता. परंतु अचानक कामावर रुजू होण्याचे कळल्यावर त्याचे तातडीने परत जायचे ठरले. सकाळी सारं काही ठीक होतं. त्यामुळे माहिरा अशा अवस्थेतही त्याला विमानतळावर सोडायला गेली. त्यानंतर परत येऊन मुलींना शाळेत सोडलं. घरात आता मदतनीस मुलींखेरीज कुणीच नव्हते. दुपार होेता होता तिला कळा सुरू झाल्या. ड्रायव्हर अर्ध्या दिवसाची सुट्‌टी घेऊन गेलेला. मैत्रिणीला मुलींना घरी आणण्याचे कळवून ती तशीच गाडी घेऊन इस्पितळात गेली. वेळेवर आणि सुखरूप पोचली म्हणून तिचा आणि बाळाचाही जीव वाचला. तिच्या या धाडसाचे सारेच कौतुक करतात. कुणालाच त्रास न देता, माहिराने धाडसी वृत्तीने इस्पितळ गाठलं होतं.
जगण्यासाठी मानसिक बळ महत्त्वाचे असते. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाताना योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. प्रत्येक बाईत ही तत्त्वे असल्यावर कसलीच भिती बाळगायची गरज नाही. कुठलीच बाई ही अबला नसते. वेळ आली तर झाशीची राणी बनण्याची क्षमता ती बाळगते. महिलांना कमकुवत समजणार्‍यांनी एवढे लक्षात घ्यायला हवे की, स्त्री ही आदिशक्तीचा अंश आहे. नारी नारायणी आहे.