नारायण राणेंचे सीमोल्लंघन घटस्थापनेदिवशी

0
216

>> कुडाळ येथील सभेत दिले स्पष्ट संकेत
>> कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन

भाजपच्या वाटेवर असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे २१ सप्टेंबर रोजी घटस्थापनेदिवशी आपली भविष्यातील राजकीय दिशा काय असेल, याची घोषणा करणार आहेत. काल कुडाळ येथे शक्तिप्रदर्शन सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी नव्या दिशेने जाण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. कॉंग्रेसपासून फारकत घेताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी पंचायत निवडणुका समर्थ विकास पॅनलच्या झेंड्याखाली लढाव्या असे आदेश कार्यकर्त्यांना दिले.

राणे म्हणाले, २१ रोजी आपण कोठे जाणार याचा निर्णय जाहीर करणार आहे. मग कोण कोणाला धक्का देतो हे पाहू! महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी मी आणि माझे दोन्ही पुत्र राजकारणात राहणार आहोत. फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता कोणाला घाबरत नाही. उघडपणे भूमिका घेणार, अशी गर्जना त्यांनी केली. यावेळी सौ. नीलम राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत, रेश्मा सावंत, रणजीत देसाई, संजू परब, विशाल परब, सुदन बांदीवडेकर, अशोक सावंत, संदीप कुडतरकर, प्रमोद कामत आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसमधून जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर काल येथे झालेल्या मेळाव्यात राणे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भाषणाच्या सुरवातीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत असा उल्लेख करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. जो पर्यंत मी सामंत यांना काढत नाही तो पर्यंत कॉंग्रेस काय कोणी काही करू शकत नाही. आजची गर्दी बघून वेगळा आवेश पाहायला मिळाला. राणेंना डिवचले म्हणजे काय होते ते त्यांना कळलेले नाही, अन्यथा त्यांनी असा निर्णय घेतला नसता. तीन महिने आपली चर्चा होती. पण कोणी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मला विचारले नाही. कोणाची हिम्मत झाली नाही. पण जिल्हाध्यक्षांना काढले. ही झालेली कारवाई चुकीची आहे असे सांगून त्यांना अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांच्या नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे, असे सांगून आपल्या ताब्यात असलेल्या सत्तास्थानाची लिस्ट वाचून दाखवत ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना बाजूला करून चव्हाण यांनी काय साधले? असा प्रश्न राणे यांनी केला.
यावेळी माजी खासदार नीलेश राणे म्हणाले, ‘२००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतरचा उत्साह आज पाहायला मिळाल्याचे सांगून विकास सावंत यांनी ग्रामपंचायत लढवून दाखवावी, असे आव्हान दिले. शिवसेना खासदार विनायक राऊत यांना घरी बसविल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.

ग्रामपंचायत निवडणुका
स्वतंत्रपणे लढणार
नारायण राणे यांनी काही झाले तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका समर्थ विकास पॅनल या नावावर लढणार असल्याची घोषणा केली. ३२५ ग्रामपंचायती जिंकून देऊन विरोधकांना जागा दाखवून द्या, असे सांगून पुढील निर्णय जाहीर करेपर्यंत तुमच्या कामाला लागा. कोणी आदेश दिला तर राणेंचा आदेश आहे, असे सांगा. कोणी पदावर दावा करीत असेल तर काय करायचे हे तुम्हांला सांगायला नको, असा इशारा त्यांनी दिला.

..तर शिवसेना सत्तेतून बाहेर!
कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे शक्तिप्रदर्शन करत भाजपात जाण्याचे संकेत दिले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार व सेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक घेतली. नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सरकारचे काय करायचे? याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत आणि ती वेळ जवळ आली आहे’, असे सूचक ट्विट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, वाढती महागाई आणि विझत चाललेल्या गरिबांच्या चुली या पापाचे धनी शिवसेनेला व्हायचे नाही, असे कारणही राऊत यांनी पुढे केले आहे. मात्र, प्रत्यक्षात नारायण राणे यांनी दसर्‍याआधी सीमोल्लंघन करण्याचे दिलेले संकेत हे शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीमागचे खरे कारण असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राणे यांना विश्वासात न घेता कॉंग्रेस नेतृत्वाने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याने राणे टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.