नायक!

0
177

आजवर अवघे समाजसमर्पित जीवन जगत आलेले आदरणीय रामकृष्ण नायक आज वयाच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सामान्य माणसाच्या आयुष्यातील वर्षांमागून वर्षे प्रापंचिक जबाबदार्‍या पेलता पेलता मागे पडत असतात, परंतु अशा एखाद्या समाज समर्पित माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मात्र स्वतःपेक्षा समाजासाठी काही तरी देणारा ठरत असतो. त्याच्या धडाडीतूनच समाजात भव्य दिव्य असे काही काम उभे राहते आणि त्यातून इतिहास घडत असतो. रामकृष्ण नायक यांनी आपल्या आजवरच्या आयुष्यात अशीच भव्य दिव्य कामे गोव्यात आणि गोव्याबाहेर उभी केली. शतकोत्तरी संस्थांची जबाबदारी पेलली, नवे उपक्रम राबवले, वास्तू उभ्या केल्या आणि एवढे सगळे करूनही ‘इदं न मम्’ म्हणत त्या सर्वांपासून ते अलिप्त राहिले आहेत. रामकृष्ण नायक यांचा मोठेपणा या त्यांच्या निरलस, निर्मोही वृत्तीमध्ये आहे. चिमूटभर कार्यासाठी हातभर प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍यांच्या आजच्या युगात स्वतः पडद्यामागे राहून समाजकार्य करणार्‍यांची नेहमीच वानवा असते. परंतु अशी काही वेगळी माणसेही असतात, जी आपल्या घरादाराची चिंता न करता समाजाचा प्रपंच करायला पुढे सरसावलेली असतात. निःस्वार्थता, शूचिता, साधेपणा यांचा त्याला स्पर्श झालेला असेल तर अशी व्यक्तिमत्त्वे अधिकच उजळून निघतात. रामकृष्ण नायक हे एक असे रसायन आहे. धी गोवा हिंदू असोसिएशन, गोमंत विद्या निकेतन यासारख्या मातब्बर संस्थांशी निगडित राहून त्यांच्या कार्याला नवनव्या समाजाभिमुख दिशा दाखविणारे रामकृष्णबाब वयाच्या नव्वदीमध्येही समाजसमर्पित भावनेनेच यापुढे शताब्दीकडे वाटचाल करतील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. एकेकाळी गोव्याची सांस्कृतिक राजधानी गणल्या गेलेल्या मठग्रामाने मुक्तिपूर्व काळामध्ये अनेक सामाजिक कामांचा पाया घातला. तेथल्या मातब्बर घराण्यांतल्या कर्तबगार पुरुषांनी आपल्या गर्भश्रीमंतीचा बडेजाव न मिरवता आपण समाजाला काही देणे लागतो, या भावनेतून निरपेक्ष सामाजिक कार्य केले. संस्था उभ्या केल्या, शाळा चालवल्या, उत्सव साजरे केले. त्याच परंपरेचे पाईक असलेले रामकृष्णबाब यांचे वडील केशव अनंत नायक हे सारस्वत ब्राह्मण समाजाच्या संस्थापकांपैकी एक. हीच संस्था पुढे ‘गोमंत विद्या निकेतन’ हे नामाभिधान स्वीकारून आजही गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपली उज्ज्वल मुद्रा उमटवून राहिलेली आहे. रामकृष्ण नायक यांची छत्रछाया विद्या निकेतनवर सदैव राहिली. तिच्या उपक्रमांना विविधांगी पैलूंची जोड देण्याचा प्रयत्न ज्या ज्या आधारस्तंभांनी केला, त्यामध्ये त्यांचेे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महानगरी मुंबईमध्ये मराठी माणसाच्या सांस्कृतिक पाऊलखुणा जपण्याचे अजोड कार्य करणार्‍या धि गोवा हिंदू असोसिएशनच्या वाटचालीत तर त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. गोमंतकीयांना अभिमान वाटावा अशी ही संस्था लवकरच आपली शताब्दी साजरी करणार आहे. या संंस्थेशी गेली चार दशके निगडित राहताना विविध क्षेत्रांतील मोठमोठ्या व्यक्तींशी त्यांचे अनुबंध जुळले. गोव्यात जेव्हा ‘स्नेहमंदिर’चा प्रकल्प या संस्थेेमार्फत उभा करायचे ठरले, तेव्हा त्याच्या स्थापनेवेळी पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज असे मराठी साहित्यविश्वातील चंद्र – सूर्य एकत्र आणण्याचा अपूर्व योग त्यामुळेच ते जुळवून आणू शकले. गोवा हिंदू असोसिएशनचे ‘स्नेहमंदिर’ आज बांदोड्यात दिमाखात उभे आहे. उपेक्षितांचे केवळ आश्रयस्थान बनून राहिलेले नाही, तर त्यांच्यावर अकृत्रिम स्नेहाचा वर्षाव करते आहे. समाजात कोणी खरोखरच निःस्वार्थपणे काही चांगले काम करीत असेल तर समाज त्याच्या पाठीशी नक्कीच उभा राहतो, हा विश्वास नायक यांनी आपल्या कामातून धडपडणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन माणसे कामाला भिडली आणि हाती घेतलेली कामे यशस्वी करून दाखवली. आज चौफेर सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा आदर्श गोमंतकीय समाजाला दाखविणार्‍या रामकृष्णबाबनी एकेकाळी गोवा मुक्तीसाठी पेट्रोल बॉम्ब बनवले होते अशी नोंद विश्वचरित्रकोशामध्ये आहे. नॅशनल कॉंग्रेस, गोवाचे ते खजिनदारही होते. पीटर आल्वारिस, डॉ. पुंडलिक गायतोंडे अशा झुंजार सेनानींच्या मार्गदर्शनाखाली ते तेव्हा वावरले. जुलमी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध पेट्रोल बॉम्ब हाती घेणार्‍या रामकृष्णबाबनी मुक्तीच्या मंगल क्षणानंतरच्या आपल्या पुढील आयुष्यात संस्कृतीचा कलश हाती घेतला आणि त्याची अविरत जोपासना केली आणि ते अभिजात संस्कार गोव्याच्या उगवत्या नव्या पिढीवर करण्याचीही धडपड केली. गोव्यात नुसत्या नावाचे नायक अनेक असतील, परंतु आपल्या कार्याने सदैव समाजाचे नायक बनून आजवर वावरलेल्या अशा या सच्च्या समाजकार्यकर्त्यास आजच्या त्यांच्या वाढदिनी तमाम गोमंतकीयांच्या वतीने मानाचा मुजरा!