नामुष्कीचे पाऊल

0
237

नाही नाही म्हणता राज्य सरकारने शुक्रवारपासून तीन दिवसांचे लॉकडाऊन आणि थेट १० ऑगस्टपर्यंत रात्रीचा ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला आहे. हे तेच सरकार आहे जे राज्यातील ग्रामपंचायती जेव्हा आपल्या नागरिकांच्या काळजीने स्वयंप्रेरणेने लॉकडाऊन करायला निघाल्या तेव्हा कायद्याकडे बोट दाखवत दमदाटी करीत होते. मांगूरहिल प्रकरणाने हादरलेल्या वास्कोवासीयांनी लॉकडाऊनची एकमुखी मागणी करूनही ती फेटाळणारे हेच आणि परिणामी राज्य असुरक्षित बनलेले असूनही पर्यटकांसाठी अकाली पायघड्या अंथरणारेही हेच.
राज्यामध्ये सध्या कोरोनाचा कहर नव्हे, नुसते थैमान चालले आहे. सध्याची रुग्णसंख्याच हजाराचा आकडा पार करून गेली आहे, एकूण रुग्णसंख्या तीन हजारांच्या दिशेने चालली आहे. बघता बघता कालपावेतो अठरा जणांचा बळी गेला, नव्या रुग्णांची संख्या दिवसागणिक शेकडा पार करून नवनवे विक्रम प्रस्थापित करू लागली आहे. हे जे सारे चालले आहे त्याबाबत नुसती बघ्याची भूमिका न घेता राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हादई प्रश्नाप्रमाणे पुन्हा एकवार आपली सक्रियता दर्शवीत सरकारचे कान उपटले. शिवाय सत्ताधारी आमदार मंडळीही आपापल्या मतदारसंघामध्ये जी भीषण परिस्थिती सध्या ओढवली आहे ती पाहून पार धास्तावलेली आहे. या सगळ्याची परिणती म्हणूनच सरकारने जवळजवळ निरुपायाने लॉकडाऊनची ही घोषणा केली आहे.
कोरोनाला अटकाव करणे आपल्याला झेपणारे नाही हे एव्हाना सरकारला पुरेपूर उमगलेले दिसते. म्हणूनच लॉकडाऊनचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे. चमत्कारिक बाब म्हणजे ‘राज्यात लॉकडाऊन होणार नाही’ असे परवा परवापर्यंत हेच नेते सांगत होते. मग अचानक ही लॉकडाऊनची खुमखुमी कशी काय उपजली? अर्थातच, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या थैमानाने अस्वस्थ झालेले राज्यपाल सूत्रे आपल्या हाती घ्यायला पुढे सरसावल्याने नामुष्की टाळण्याखातर हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला दिसतो.
मंत्रिमंडळाने निर्णय तर घेतला, परंतु या तथाकथित लॉकडाऊनचे नेमके स्वरूप काय असेल? यावेळी आंतरराज्य विमानसेवा, रेलसेवा, बससेवा सुरू आहे. पर्यटकांना आमंत्रणे गेल्याने राज्यात पर्यटक डेरेदाखल झालेले आहेत, सर्व उद्योग व्यवसाय, कार्यालये खुली आहेत. जनतेने तीन दिवस घरातच राहावे असे सांगणारे सरकार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली असतील असेही सांगते आहे. म्हणजे लोक भाजीपाला, दूध, मासळीच्या निमित्ताने घराबाहेर पडणारच. हे असले तीन दिवसांचे भंपक लॉकडाऊन केल्याने काय साध्य होणार आहे? कोरोनाची जी साखळी तोडायची आहे ती या तीन दिवसांत तुटेल काय?
लॉकडाऊनचे फर्मान निघताच काल नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. जनतेमध्ये अचानक अशी घबराट निर्माण करण्याची हुक्की सरकारला अधूनमधून का येते कळत नाही. लॉकडाऊनपर्यंत जर जायचेच होेते, तर आतापर्यंत लॉकडाऊन नको, लॉकडाऊन नको असे का सांगत होता? स्वतःच्याच मतांवर हे सरकार कधी ठाम नसते म्हणून त्याला पोरखेळाचे स्वरूप आलेले आहे अशी जनभावना सतत व्यक्त होत असते ती यामुळेच.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, तसतसे राज्य सरकारचेही वस्त्रहरण होत चालले आहे. रुग्ण वाढले आणि आरोग्यविषयक सज्जतेचा फुगा फुटला, कोरोनाला क्षुल्लक ठरवण्याचा प्रयत्न अंगलट आला, सरकारी कर्मचार्‍यांच्याच बेफिकिरीमुळे कोरोना गोव्याच्या गावोगावी पसरला. आता तर तो औद्योगिक क्षेत्रामध्येही हातपाय पसरत चालला आहे. वेर्ण्याच्या एका कारखान्यातील सात युनिटस्‌मधील तब्बल १३६ कामगार कोरोनाबाधित कसे काय होऊ शकतात? आणि ही म्हणे आयएसओ प्रमाणित कंपनी आहे!
कोरोना रुग्णांचे नीट व्यवस्थापनही सरकारला करता येत नाही. मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता येत नाहीत. कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना न्यायला रुग्णवाहिका यायला देखील दिवस उलटावा लागतो ही बेफिकिरी अक्षम्य आहे. कोरोनाने मृत पावलेल्यांच्या मृतदेहांना न्यायला शववाहिका मिळत नाहीत. हे राज्यात काय चालले आहे?? कोरोना असो वा ऑनलाईन शिक्षण, स्वतःचे ताळतंत्र नसलेले गचाळ आणि गलथान प्रशासन आज घडीघडी प्रत्ययाला येते आहे. हे चित्र बदलले नाही तर सरकारच्या अपयशाची लक्तरे वेशीवर लटकायला वेळ लागणार नाही!