नामदेवनगरी घुमानमध्ये घुमला बहुभाषांचा गजर!

0
364

– विष्णू सुर्या वाघ

 

गेल्या आठवड्यात पंजाबमध्ये जाण्याचा योग आला. अमृतसरनजीक असलेल्या घुमान गावामध्ये सरहद, पुणे या संस्थेच्या वतीने एक बहुभाषा साहित्यसंमेलन भरवण्यात आले होते. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, आसाम, पश्चिम बंगाल, ओडीशा, नवी दिल्ली, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांतले लेखक या संमेलनासाठी आले होते. गोव्यातला लेखक म्हणून मलाही आमंत्रित करण्यात आले होते.
अमृतसर शहरापासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर असलेला घुमान हा छोटासा गाव. लोकवस्ती जेमतेम पंधरा-वीस हजार. २०१५ च्या आधी हा गाव फारसा कुणाला माहीतही नव्हता. पण मागच्या वर्षा एप्रिल महिन्यात घुमानमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं आणि या गावाचं नाव राज्याच्या नकाशावर चमकलं. प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनासाठी पंजाबचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाब- महाराष्ट्र- त्रिपुरा- बिहार या राज्यांचे राज्यपाल, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासारखे सहा-सात केंद्रीय मंत्री आणि अधिकार्‍यांचा ताफाच घुमानला येऊन थडकला. रस्ते नव्हते तिथे रस्ते बांधण्यात आले. अरुंद सडकांचं रुंदीकरण झालं. पाणीपुरवठा सुरळीत झाला. गावात दोन-दोन हेलीपॅड्‌स बांधण्यात आली. घुमानचा चेहरामोहराच बदलण्यात आला. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी खास घुमानवासीयांकरिता कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालय बांधून देण्याची घोषणा केली. नुसतीच घोषणा करून मुख्यमंत्री थांबले नाहीत, त्यांनी तात्काळ भूसंपादन प्रक्रियाही चालू करून कॉलेजच्या बांधकामाचा प्रारंभही सुरू केला. येत्या मे महिन्यापर्यंत हे कॉलेज बांधून पूर्ण होणार आहे.

नामदेवनगरी घुमान

घुमानमध्ये असं काय होतं म्हणून या गावाला एवढं महत्त्व प्राप्त झालं? संपूर्ण पंजाबमध्ये घुमान हा गाव ‘नामदेवबाबा की नगरी’ म्हणून ओळखला जातो. भागवत धर्माच्या मांदियाळीतील संतशिरोमणी नामदेव महाराजांनी जिथे समाधी घेतली तोच हा गाव. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात विसेक वर्षं नामदेव महाराजांनी याच गावात वास्तव्य केलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या साक्षात्कारी भावंडांसह आयुष्याचा पूर्वार्ध व्यतीत केल्यानंतर व ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नामदेवांनी महाराष्ट्र भूमी सोडली आणि तीर्थाटन करीत ते उत्तर भारतात आले. गुजरात, राजस्थानात भ्रमण करीत ते पंजाबमधल्या गुरदासपूर जिल्ह्यात पोचले आणि शेवटी घुमानला जाऊन राहिले. मराठीतून अभंगरचना करणार्‍या नामदेवांनी पंजाबमधील लोकवाणी शिकून घेतली आणि त्या वाणीतही आपले अभंग रचले. हे सर्व अभंग घुमान व आसपासच्या खेड्यांतील लोकांच्या ओठांवर खेळू लागले. अवघ्या काही वर्षांत नामदेव महाराज यांचे लाखो अनुयायी पंजाबच्या भूमीत तयार झाले. अर्थात त्यावेळी शीख धर्माचा जन्मही झाला नव्हता. नामदेवांनंतर जवळजवळ दोनशे वर्षांनी गुरू नानक देवांचा उदय झाला. पण असं म्हणतात की नानकदेवांवर नामदेवांच्या शिकवणुकीचा प्रचंड प्रभाव होता. शिखांच्या गुरुबाणीत नामदेवांचे सव्वाशे अभंग नानकदेवांनी समाविष्ट केले होते. कालांतराने शिखांचे गुरुपद विसर्जित करून ‘गुरुग्रंथसाहिबा’ची गुरुपदावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात नामदेवांचे ‘शबद’ही घेण्यात आले. पंजाबबाहेरच्या कोणत्याही अन्य संताला हा मान अद्याप मिळालेला नाही. भागवत-वारकरी संप्रदायाचे लोक नामदेवांना जितके मानतात त्याहून अधिक श्रद्धेने पंजाबचे लोक बाबा नामदेवांना भजतात हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातला एक संत पंजाबमध्ये जातो. तिथे लोकांना त्यांच्या भाषेत उपदेश करतो आणि त्याची अमृतवाणी पवित्र ग्रंथ गुरुग्रंथसाहिबाचा एक भाग बनते हा तसं पाहिलं तर केवढा मोठा चमत्कार!

संजय नाहर यांची चिकाटी

गेल्या वर्षी तीन दिवस घुमानमध्ये अखिल भारतीय संमेलन झाले. ‘सरहद’ या संस्थेचे प्रवर्तक संजय नाहर आणि स्वागताध्यक्ष भारत देरुडला यांनी या संमेलनाच्या आयोजनात मोठा वाटा उचलला होता. त्या संमेलनाची आठवण कायम राहण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सारखं वाटत असे. यानिमित्ताने वर्षातून एकदा का होईना पण घुमानला जाणं होईल आणि नामदेवांशी जुळलेले अनुबंध अधिक दृढ करता येतील ही त्यामागची धारणा होती. विचार करता करता बहुभाषा साहित्यसंमेलनाचा प्रस्ताव पुढं आला. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी-रविवारी असं बहुभाषा संमेलन भरवावं या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. मंडळी कामाला लागली. नाशिकचे हरहुन्नरी उद्योजक अरुण नेवासकर यांना स्वागताध्यक्ष तर प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांना निमंत्रक बनवण्यात आलं. भारत देरुडला आणि संजय नाहर आयोजकांच्या मुख्य भूमिकेत राहिले. त्याशिवाय घुमानच्या श्रीनामदेवबाबा गुरुद्वारा दरबार समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांनाही त्यांनी विश्‍वासात घेतलं आणि एप्रिलच्या ३ व ४ रोजी हे दोन दिवसांचं संमेलन या सर्वांनी मिळून यशस्वी करून दाखवलं.
संमेलनाच्या एकूण आयोजनात मराठी व पंजाबी माणसांचा भरणा अधिक असल्यानं या दोन राज्यांतल्या साहित्यिकांची संख्याही अर्थातच लक्षणीय होती. पण इतर राज्यांतल्या लेखकांनाही आवर्जून बोलावण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला होता प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांना. त्याशिवाय विद्वान संस्कृत लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. सत्यव्रत शास्त्री यांचीही लक्षणीय उपस्थिती या संमेलनाला लाभली. पंजाबचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. दलजित सिंग चिमा यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. त्याशिवाय मागच्या तीन अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षही आवर्जून आले. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सदानंद मोरे आणि वसंत आबाजी डहाके यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाची शोभा वाढली. त्याशिवाय साहित्य व पत्रकारितेच्या क्षेत्रातील महेश म्हात्रे, विजय बाविस्कर, राजीव खांडेकर, अभिनंदन थोरात, रामदास फुटाणे, सुरेश भटेवरा, अरुण नाखडे हे बुजूर्गही उत्साहाने सहभागी झाले. पंजाबचे लोकप्रिय लेखक पद्मश्री सुरजित सिंग पाथेर हेसुद्धा दोन्ही दिवस उपस्थित राहिले.

लांबलेला उद्घाटन सोहळा

३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार होतं, पण अडीच वाजता सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आलेलं उधाण पाच वाजेपर्यंत ओसरलंच नाही. त्यामुळं उद्घाटनसोहळा दोन तास उशिरानंच सुरू झाला, तो तब्बल आठ वाजेपर्यंत चालला. आगत-स्वागत, सत्कार सोहळे आणि निमंत्रितांची लांबलचक भाषणे एवढी झाली की उद्घाटनसोहळा अखेरच्या टप्प्यात पोचला त्यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. देवी यांच्यासाठी वेळच राहिला नसल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. डॉ. देवी यांनीही खिलाडूवृत्तीने या अपरिहार्यतेचा स्वीकार करीत आपलं लिखित भाषण बाजूला ठेवून छोटेखानी उत्स्फूर्त भाषणावर वेळ निभावून नेली. संयोजकांपैकी संजय नाहर, अरुण नेवासकर, भारत देरुडला हे सर्वच बोलले. डॉ. सबनीस यांनी तर मूळ विषयाला बगल देत आपल्या लांबलचक भाषणात कोणतीच गरज नसतानाही नेहरू, कॉंग्रेस, भाजप, मोदी यांच्यावरही टीका-टिप्पणी केली. डॉ. सत्यव्रत शास्त्री आणि सुरजितसिंग पाथेर यांनी मात्र साहित्य आणि समाज यांच्याविषयी गंभीरपणे काही मुद्दे मांडले.
डॉ. देवी यांनी समयोचितता राखून केलेलं भाषण छोटंसंच पण विचारप्रवर्तक होतं. जगात काही वर्षांपूर्वी हजारो भाषा अस्तित्वात होत्या. त्यातल्या बर्‍याच भाषा आज नामशेष होऊन गेल्या आहेत. अजून बर्‍याच मृतप्राय अवस्थेत आहेत. आपण काहीच केलं नाही तर या भाषादेखील नष्ट होऊन जातील. यामुळं माणसांच्या जगातली प्रत्येक बोली सांभाळली पाहिजे. तिच्यामधून संवादांचं आदान-प्रदान झालं पाहिजे आणि जे निर्मितीशील आहेत त्यांनी साहित्याचीही निर्मिती केली पाहिजे, तरच आपल्या भाषा टिकतील असं आग्रही प्रतिपादन डॉ. देवी यांनी केलं.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘झिरो अवर’ हा अभिनव कार्यक्रम झाला. परप्रांतातून आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीला या कार्यक्रमात आपली ओळख करून देतादेताच आपलं मनोगतही व्यक्त करायची संधी होती. अनेकजणांनी या संधीचा बर्‍यापैकी लाभ उठवला.

रंगलेलं कविसंमेलन

रात्रीच्या चमचमीत जेवणानंतर सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या भोजनोत्तर कविसंमेलनाकडे. कविसंमेलन रात्री दहाच्या आसपास सुरू झालं तरी बर्‍यापैकी रसिकांची गर्दी होती. पद्मश्री आलमजितसिंग आणि गुरुभजन सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचं सूत्रसंचालन केलं मराठी कवी महेश म्हात्रे आणि पंजाबी कवी जसवंत जाफर यांनी. वसंत आबाजी डहाके, विष्णू सुर्या वाघ, सुरजितसिंग पाथर, रामदास फुटाणे, सुखविंदर अमित, रविंदर भट्टल, त्रिलोचन लोची, मजिंदर धनोसा, एस. के. पन्नू, सिमरत सुमेरा, सिद्धेश्‍वर सिंग, गोवर्धन शर्मा, हनुमंत जाधवार, माधव हुंडेकरी, नंदन राहाणे, पियुष नाशिककर, सुकीता पॉल कुमार अशा मान्यवर कवींचा सहभाग असलेलं हे संमेलन रंगलं नसतं तरच नवल. रात्री १२ उलटून गेले तरी रसिक कानात प्राण आणून बसले होते. मराठी कवितांबरोबरच घुमानमध्ये ‘दरिया रेऽ’ या माझ्या कवितेतून कोकणीचे सूर घुमले आणि रसिकांनी तिला मनापासून दाद दिली. ‘गात्रांत जनीचे जाते, गरगरगरगर फिरते- नामाचे भरडीत दाणे, हे पीठ विठूचे पडते’ या ओळींवरही अनेकजण फिदा झाल्याचे रसिकांच्या प्रतिक्रियांवरून समजले.

अहमदियांची मक्का-कादियॉं

घुमानमध्ये हॉटेल्स म्हणावी तशी काही नव्हतीच. बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था दहा-बारा कि.मी. अंतरावर असलेल्या कादियॉं गावात करण्यात आली होती. कादियॉं नावाचं नाव आज जगभर पोचलं आहे. मुस्लीम धर्मातलाच एक पंथ असलेल्या सद्र अंजुमान अहमदिया (ऑल इंडिया अहमदिया मुस्लीम कम्युनिटी) या पंथाचं हे हेडक्वार्टर. अहमदिया पंत हा इतर मुसलमानांपेक्षा वेगळा गणला जातो. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या पंथाची सुरुवात हजरत मिर्झा गुलाम अहमद यांनी याच कादियॉंमधून केली. अहमदिया पंथाचे ते पहिले खलिफा. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी पाकिस्तानात गेले व नंतर लंडनला स्थायिक झाले. विद्यमान पाचवे खलिफा व अहमदियांचे धर्मप्रमुख हजरत मिर्झा मसरूद अहमद हे सध्या लंडनला वास्तव्य करून असतात. सुमारे २१० देशांत या पंथाच्या शाखा आहेत. अहमदिया लोक मक्का-मदिनेला जाण्याऐवजी दरवर्षी कादियॉंला येतात. कादियॉंमध्ये त्यानी अतिभव्य अशी मशीद बांधली आहे. त्याशिवाय हजार-बाराशे लोकांची राहण्या-जेवण्याची सोय करता येईल अशी सुसज्ज, आधुनिक अतिथिगृहे आहेत. आमची सोय अशाच एका अतिथिगृहात करण्यात आली होती.
४ मार्चला सकाळी मी कादियॉंमध्ये फेरफटका मारून आलो. हेडक्वार्टरमध्ये जाऊन तिथले सेक्रेटरी जनरल मोहम्मद नसीम खान यांनाही भेटून आलो. अहमदियांविषयी थोडी अधिक माहिती जाणून घेतली. उर्वरित मुसलमानांप्रमाणे हा पंथ जिहाद आणि काफिरीयत मानत नाही. त्यांची शिकवण प्रेम व सहिष्णुता यांवर आधारलेली आहे. कोणाचाही द्वेष करू नका, सर्वांवरच माया करा हा त्यांचा संदेश आहे. अहमदियांच्या मशिदीत केवळ कुराणाचे पठण केले जात नाही तर गीता, बायबल, बुद्ध सूक्ते यांचेही वाचन व पठण केले जात होते. कँपसमध्ये फिरताना एक बारा वर्षांचा अहमदिया मुलगा भेटला- अख्खी भगवद्गीता त्याला तोंडपाठ होती! प्रा. सत्यव्रत शास्त्री यांच्याशी तब्बल एक तास या मुलाने चक्क संस्कृतमधून वार्तालाप केला.
अहमदिया आपल्या मौलवींना मौलवी म्हणत नाहीत. शिखांप्रमाणेच ते त्यांना ‘ग्यानी’ म्हणून संबोधतात. दारू-सिग्रेट यांना ते स्पर्शही करीत नाहीत. अतिथिगृहातही शराब-सिग्रेटला पूर्ण बंदी आहे. मुस्लिमांचे इतर पंथ अहमदियांशी फटकून वागतात. पण अहमदिया आपल्या धारणांशी ठाम आहेत. महंमद पैगंबरानं दिलेली शिकवण मानवाच्या उद्धाराची होती. पण स्वतःला पैगंबरांचे अनुयायी म्हणणार्‍यांनी या शिकवणुकीचा बट्‌ट्याबोळ केला. यामुळेच इस्लामचं नाव आज बदनाम झालंय. इसिससारख्या संघटना म्हणजे मानवतेला काळिमा आहेत. इस्लाममध्ये हिंसेला स्थान नाही. तलवारीच्या बळावर धर्माचा प्रसार करायला मान्यता नाही. हे जग प्रेमाने जिंका. मानवतेच्या उद्घोषाने जिंका, हाच संदेश घेऊन आम्ही चाललो आहोत… मोहम्मद नझीम खान सांगत होते आणि मी भारावून ऐकत होतो. क्षणभर वाटले- इस्लामचा दडून राहिलेला खरा अर्थ आज जगभर पोचला तर किती बरे होईल!

अर्थपूर्ण परिसंवाद

कादियॉंचा फेरफटका मारून पुन्हा संमेलनस्थळाकडं आलो. स्थानिक युवक-युवतींचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते. त्यानंतर काही अर्थपूर्ण परिसंवाद झाले. वेळेच्या अभावामुळे परिसंवाद आटोपते घ्यावे लागले तरी त्यात सहभागी झालेले लेखक विविध भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व करणारे होते. पहिला परिसंवाद ‘भाषांमधील परस्पर संवाद’ हा वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यात सतनाम सिंग मानक (पंजाबी), अरुण जाखडे (मराठी), सिद्धेश्‍वर सिंह (सिंधी), अमरज्योती महंतो (आसामी), इंग्रनील आचार्य (ओडिया) या मान्यवरांनी भाग घेतला. त्याला लागूनच डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सामाजिक विसंवादाचा साहित्यावर परिणाम’ हा परिसंवाद झाला. त्यात प्रा. अशोक चरण आलमगीर (पंजाबी), मनीषी जानी (सिंधी), गीतांजली चटर्जी (बंगाली), शिरीष नाईक (मराठी), तेहमीना बुखारी (उर्दू), डॉ. विनोद कालरा (हिंदी) व विजय बाविस्कर (मराठी) यांचा सहभाग होता. ‘अनुवादाचे महत्त्व’ (अध्यक्ष- डॉ. राजेंद्र पांडे), ‘भारतीय भाषांचे भवितव्य आणि साहित्य’ (अध्यक्ष- शाहिद सिद्दिकी), ‘बोलीभाषांचे जतन व संवर्धन’ (अध्यक्ष- डॉ. गणेश देवी) आणि ‘माझी भाषा व वर्तमान साहित्य’ (अध्यक्ष- डॉ. श्रीपाल सबनीस) या परिसंवादातही विविध वक्त्यांनी रंग भरला.

संध्याकाळी समारोपाच्या सत्रात मी आणि डॉ. गणेश देवी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. यावेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना सानेगुरुजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याशिवाय संमेलनाला हातभार लावणार्‍या सर्वांचे सत्कार करण्यात आले.
भाषा ही संस्कृतीचे वाहन आहे. संस्कृती ही धर्माच्याही पलीकडची आहे. त्यामुळे मानवतेची जपणूक करण्याचे काम भाषाच पार पाडू शकेल. मात्र, आपली भाषा जगवायची असल्यास जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तिची अपरिहार्यता निर्माण करण्याचे काम आपण करायला हवे, असे आग्रही मत मी माझ्या भाषणातून मांडले. डॉ. देवी यांच्या अध्यक्षीय मतप्रदर्शनानंतर संमेलनाचा अधिकृत समारोप झाला.
दुसर्‍या दिवशी सकाळी कादियॉंमधून निघालो तेव्हा अतिथिगृहाच्या बगिच्यात विविधरंगी शोभिवंत फुले फुललेली दिसली. माझ्या मनातही अशीच वेगवेगळ्या भाषांची, बोलींची सुवासिक फुले उमलली होती. नामदेवाच्या गाथेपासून गुरुग्रंथसाहिबच्या शबदपर्यंत आणि गुरुद्वारापासून अहमदियांच्या मशिदीपर्यंत त्या शब्दफुलांचा दरवळ घमघमत होता.