नाफ्तावाहू जहाजामुळे मोठी दुर्घटना शक्य : कॉंग्रेस

0
210

>> १४ दिवसांनंतरही तोडग्याबाबत मुख्यमंत्र्यांना अपयशाचा दावा

‘नुशी नलिनी’ या नाफ्तावाहू जहाजामुळे गोव्यात भोपाळसारखी प्रचंड मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केली व या प्रकरणी गेल्या १४ दिवसांत कोणतीही उपाययोजना करण्यास अथवा तोडगा काढण्यास मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याचा दावा केला.
गेल्या दि. २२ ऑक्टोबर रोजी नुसी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज भरकटत येऊन दोनापावल येथे समुद्रात अडकून पडल्यापासून मुख्यमंत्री सावंत या जहाजातील नाफ्ता काढून तो अन्य बोटीत हलवण्यात येणार असल्याचे केवळ सांगत आहेत. या प्रकरणी ‘हे करू’, ‘ते करू’ असे सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी गेले १४ दिवस काहीही केले नसून त्यामुळे पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, कुठ्ठाळी, मुरगाव, दाबोळीसह कित्येक गावांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. या बोटीतून नाफ्ताची जर गळती झाली तर लाखो लोकांच्या जीवाला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होण्याची भीती असल्याचे चोडणकर म्हणाले.

‘हे करणार’ ‘ते करणार’ असे सांगून झाल्यावर आता मुख्यमंत्री या जहाजातील नाफ्ता काढून दुसर्‍या जहाजात हलवण्यासाठी सिंगापुरस्थित एका कंपनीची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगू लागले असल्याचे चोडणकर म्हणाले. त्यासाठी आणखी १५ दिवस लागणार असल्याने गोव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे चोडणकर म्हणाले.

नाफ्ता प्रकरणी सत्ताधार्‍यांची
गुपिते एमपीटी चेअरमनना माहीत
नाफ्ता जहाजाद्वारे लोकांचा जीव धोक्यात घालणार्‍या एमपीटीच्या चेअरमनना तसेच सदर जहाजाच्या मालकाला अटक करायला हवी होती, असेही चोडणकर म्हणाले. मात्र, अटक करायचे तर सोडाच एमपीटीच्या चेअरमनना आपल्या केबिनमध्ये चर्चेसाठी बोलावून घेण्याऐवजी मुख्यमंत्री स्वत: त्यांना भेटायला जात असल्याचे सांगून ते त्यांना घाबरत असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला. नाफ्ता जहाज प्रकरणातील सत्ताधार्‍यांची गुपीते एमपीटीच्या चेअरमनना माहित असल्यानेच मुख्यमंत्री त्यांना घाबरत असल्याचा दावा चोडणकर यांनी केला.

नव्या राज्यपालांचाही मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास नाही
नवे राज्यपाल सत्यपाल मलीक यांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर विश्‍वास नसल्याचे सांगून त्यासाठीच पुढील सहा महिने राजभवनवर लोकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.