नाती जपताना….

0
481

मनोहर द. कोरगांवकर (पर्वरी)

 

दुर्दैवाने या वगळलेल्या यादीत आपले नातेवाईकच जास्त असतात. दुसरा एक भाग म्हणजे अशा समारंभाला हजेरी लावणे हा एक सोपस्कार असल्याप्रमाणे उरकून टाकला जातो. अशावेळी दोन्ही घटकांनी दुसरा काही विचार करता येईल का हे पाहणे आजच्या काळात अधिक जरूरीचे वाटते. आपल्या घरचा हा समारंभ ही एक सर्व नात्यांना अधिक मजबूत करण्याची सुसंधी आहे असा विचार जर आपल्या मनात दृढ झाला तर खूप काही करता येईल.

गेल्या वर्षी आमच्या एका नातेवाईक मुलीचे लग्न झाले. काही दिवसापूर्वीच त्या नातेवाईकाच्या घरी गेलो असता ती माहेरी आलेली असल्यामुळे भेट झाली. तिला पाहताच तिच्या चेहर्‍यावर एक समाधान असल्याचे मला स्पष्टपणे जाणवले. ही गोष्ट माझ्या मनालाही समाधानच देणारी होती. अधिक जाणून घेण्यासाठी तिला बोलती करण्यासाठी सुरुवातीस काही इकडच्या तिकडच्या काही गप्पा मारल्यावर नकळत तिच्या सासरबद्दल काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. तिच्या बोलण्यातून समजले ते म्हणजे तिचे सासर म्हणजे एक मोठे आठ-दहा माणसाचे कुटुंब असून घरची शेतीवाडी व एक कुळागर आहे. तिचा नवरा व एक दीर जवळच्या शहरात नोकरी जाऊन- येऊन करतात तर सासरे सरकारी नोकरीतील निवृतीनंतर घरच्या शेतीचे काम व इतर सर्व कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. बाजूलाच त्यांच्या दोन भावांची स्वतंत्र घरे असून सणावाराला मात्र सर्व कुटुंबीयच या मूळ घरी येतात. शिवाय सर्वाचेच एकमेकांशी अगदी चांगले संबंध असल्यामुळे एकमेकांच्या घरी ये-जा असतेच. शिवाय एका घरात शिजलेला खास पदार्थ दुसर्‍या घरी अगदी न चुकता पोचतो.

‘‘तू यात रमली आहे ना? मला वाटले तुमचा दोघांचा राजाराणीचा संसार शहरात चालला असेल. पण तू जे काय सांगतेस, ते सर्व मला नवीनच वाटते.’’ हे सर्व ऐकल्यावर मी सहजपणे तिचे मन जाणून घेण्यासठी एक म्हटले.

‘‘हो काका, लग्नापूर्वी व नंतरही काही काळ माझ्या स्वप्नात तुम्ही म्हणता तशाच संसाराचे स्वप्न होते. पण आता सर्व काही बदलले आहे. तसा विचार चुकूनही कधी मनात येत नाही’’.

‘‘म्हणजे? मी नाही समजलो!’’

‘‘काका, मी या छोट्याशा चौकोनी कुटुंबात वाढलेली. आई, बाबा व भाऊ यांच्याशिवाय अन्य नात्यांचा संबंध अगदी नावापुरताच. लग्नानंतर बरेच दिवस हे सर्वांत मिळून मिसळून राहणे खूप कठीणच होत होते. पण काही काळातच सासू-सासरे म्हणजे माझे दुसरे आई-बाबाच बनले. त्यांच्या मनात मला सुनेपेक्षाही मुलीचे स्थान आहे, याची जाणीव त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मला व्हायला लागली, माझा नवरा, लग्न झाल्यावर सासरी नांदणार्‍या बहिणी, दीर यांची एकमेकांशी तसेच घरातील प्रत्येकाचे एकमेकांशी वागणे हे मला एक कोडेच वाटायला लागले. आणि मीही त्या प्रवाहात कधी एकजीव झाले, त्यांच्यातीलच एक कधी बनले ते मला समजलेच नाही. काका, हे सर्व मला शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही बाबांबरोबर चार दिवस आमच्या घरी राहायलाच या, म्हणजे या कौटुंबिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभवच घेता येईल. काका, मला माहेरी येऊन आठ दिवस झाले. आईबाबांपाशी चार दिवस रमले मी, पण तुम्ही थट्टा कराल, आता मात्र सासरचीच आठवण बेचैन करते आहे. पण आईबाबांची मने दुखतील म्हणून सांगत नाही त्यांना.’’

तिच्याशी गप्पा मारताना एक तास कसा निघून गेला हे समजलेच नाही आणि त्या एका तासात मला मात्र तिच्या त्या कौटुंबिक नात्याच्या भावनेतून ङ्गार मोठा दिलासा मिळून गेला.

तिच्या त्या विचाराने माझे मन संभ्रमितच झाले. आपल्या अवती भोवती असलेल्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या उदाहरणाने माझे मन विचारत गुरङ्गटून गेले.

हल्लीच्या दिवसात माणसाचे जीवन सुखी झाल्याचे सगळीकडेच बोलले जाते. अनेक सुखे, साधने अगदी आपल्या हाताशी आहेत. ङ्गक्त मध्यस्थ म्हणून संगणक, मोबाईल हाताशी असला पाहिजे व त्याच्याकडून आपली कामे करून घेता आली पाहिजेत. पूर्वी पैशाच्या बाबतीत असे म्हटले जायचे, पण आज पैसा ही बाब काहीशी गौण ठरली आहे. निसर्गाचा एक नियम सांगितला जातो, जेव्हा एखादी नवी गोष्ट जन्म घेते त्यावेळी दुसर्‍या एखाद्या गोष्टीची जागा कमी होऊन जाते. आजच्या माणसाच्या तसेच समाज जीवनात हाच नियम लावला तर आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीने आपले अंग काढून घेतले आहे याचा विचार करावाच लागेल. तसे पाहिले तर सर्वच घटकांना हा नियम लावून पाहावा लागेल व मग आपल्याला अनेक गोष्टी आपल्या हातून अगदी सहजपणे, नकळत सुटून गेल्या आहेत याचे प्रत्यंतर येईल. त्याचबरोबर आपल्या असे लक्षात येईल की आपल्या जीवनातील अनेक गोष्टीना आपणच दूर केले आहे.

हा सगळा विचार आपण आपले कुटुंब व आपण त्याचे एक घटक म्हणून करता येईल. पूर्वीची कुटुंब ही संस्था, तिचे स्वरूप, कार्य, महत्व, प्रत्येकाचे कुटुंबातील स्थान व त्यानुसार आलेली जबाबदारी या सर्व बाजूंचा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की, आज वरीलपैकी प्रत्येक बाबीची संकल्पना, महत्व, गरज यात खूपच बदल झाला आहे. हा बदल होण्याला तशी कारणेही खूपच आहेत. त्यापैकी मोठ्या कुटुंबाकडून छोट्या कुटुंबाकडे वळणारी मानसिकता, बदलल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या गरजा, शहरी जीवनाची ओढ, आर्थिक बाजू, वेळेची मर्यादा, सहजीवन-सामाजिकता यांचा अभाव अशी काही प्रमुख कारणे पुढे केली जातात. त्याचबरोबर छोटी छोटी कारणेसुद्धा खूप आहेत. या सर्व कारणांचा विचार केला तर यातील काही कारणे कुटुंबातील व्यक्तीनी निर्माण केली आहेत, तर काही बदलत्या सामाजिक रचनेतून निर्माण झाली आहेत.

शहरी जीवनाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर सर्वच बाबतीत झालेला दिसून येतो. घरातील वर्तन, राहणीमान, खाण्याच्या वेळा, पद्धती, आहार, कपडे, भाषा, शिस्त, टापटीपपणा, वेळेच्या बाबतीत सावधानता अशा कितीतरी गोष्टी आपल्या अंगी अगदी सहजपणे बाणवून घेतल्या जातात. साहजिकच ग्रामीण जीवनात कधीही न जपलेल्या, न पाहिलेल्या अनेक गोष्टी आपल्या अंगी बाणविल्या जातात. एका दृष्टीने हा एक चांगला भाग म्हणावा लागेल. कदाचित यालाच प्रगती, सुधारणा अशी गोंडस नावे दिली जात असतात. पण याचबरोबर व्यक्ती, कुटुंब या बाबतीत अनेक नकारार्थी बाजूही अगदी सहजपणे घडत असतात, जाणून बुजून, मनाविरुद्ध का होईना स्वीकार करावा लागतो. त्याचबरोबर समाजाचा एक घटक म्हणून ज्या गोष्टीची मानवी जीवनात अपेक्षा असते, त्याच गोष्टी हद्दपार केल्या जातात, त्या गोष्टीचा विचारही मनात येत नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावी पिढीमध्ये या विचारांचे, गोष्टींचे पार उच्चाटणच झालेले असते. यातील बर्‍याच गोष्टी केवळ परिस्थिती म्हणून स्वीकाराव्या लागतात असा दावाही करण्यात येतो किंवा परिस्थितीची ढाल पुढे करण्यात येते.

सामाजिक दृष्टिकोनातून विचार केल्यास व्यक्तीच्या कौटुंबीक तसेच सामाजिक जीवनावर शहरीकरणाचा ङ्गार मोठा परिणाम होत असतो. इतकेच नव्हे तर प्रत्येकाच्या अंगी आत्मकेंद्रीकरणाचा प्रादुर्भाव इतका होत असतो, की आपल्या कुटुंबातील इन मिन तीन-चार माणसे सोडली तर इतराशी येणारा संबंध, आपुलकी, भावनिक जिव्हाळा या गोष्टीची जाणीवही मनाला स्पर्श करीत नाही. आणि तसे कुणी करण्याचा प्रयत्न केलाच तर त्या गोष्टीला मान्यता मिळण्याऐवजी विरोधालाच तोंड देण्याची पाळी आल्यावाचून राहात नाही.

या बदलत्या परिस्थितीत अधिक प्रमाणात कशाचा बळी जात असेल तर तो नातेसंबंधाचा. आज पाठ्यपुस्तकातील नातेवाचक शब्दाचा अर्थ लहान मुलांना पाठ करण्याची पाळी आलेली आहे. सुखसोईची प्रत्येक बाब नातेसंबधांना दूर करीत आहे असे दिसून येते. नात्यांना कुठेतरी स्वार्थाचा वास येत असल्याची अनेक उदाहरणे ऐकायला, पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांचे – युवा पिढीचे उदाहरण घेत असल्यास आज मुले आपल्या नातेवाईकांकडे जाण्यास नाक मुरडतात. कुणी नातेवाईक घरी आल्यास या मुलांच्या चेहर्‍यावरील भाव खूप काही सांगून जातात, जाणकारांच्या नजरेतून तो भावदर्शक चेहरा सुटत नसतो. त्याचबरोबर मनात कुठेतरी अपराधीपणाचा स्पर्श उमटवून जातो.

हे सर्व स्वीकारार्ह नसेल तर त्यातून काही मार्ग काढायलाच हवा. आज नातीसंबंध टिकवून ते बळकट करण्याचा विचार कुटुंबातील जबाबदार माणसांनी करायलाच हवा असे म्हणण्याची पाळी आली आहे. त्यासाठी आपल्याला आपला प्राधान्यक्रमही बदलावा लागेल, एकमेकांकडे जाणे- येणे हे कमी कमी होत जाणारा मार्ग पुन: एकदा प्राधान्यक्रमाने सुधारण्याची वेळ आली आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक अडचणींचा बाऊ करून आपल्या घरी असलेल्या कार्यक्रमाना, समारंभाला कुणाला आमंत्रित करायची याची यादीच सिमीत केली जात असल्याची उदाहरणे सापडतात. दुर्दैवाने या वगळलेल्या यादीत आपले नातेवाईकच जास्त असतात. दुसरा एक भाग म्हणजे अशा समारंभाला हजेरी लावणे हा एक सोपस्कार असल्याप्रमाणे उरकून टाकला जातो. अशावेळी दोन्ही घटकांनी दुसरा काही विचार करता येईल का हे पाहणे आजच्या काळात अधिक जरूरीचे वाटते. आपल्या घरचा हा समारंभ ही एक सर्व नात्यांना अधिक मजबूत करण्याची सुसंधी आहे असा विचार जर आपल्या मनात दृढ झाला तर खूप काही करता येईल.

गरज आहे समाजाच्या प्रगतीबरोबर दुरावत चाललेले नातेसंबध पुन: एकदा अधिक मजबूत करण्याचा विचार आपल्या प्रत्येक कुटुंबीयाच्या मनात दृढ करण्याची! हे सर्व करताना कदाचित अडचणीचा डोंगर आपल्या डोळ्यासमोर दिसू लागेल, पण त्यालासुद्धा टक्क्रर देण्यासाठी विविध मार्ग, उपाययोजना तेच मन आपल्याला देऊ शकेल !