नाण्यांचा प्रवास…

0
2730

– वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या जडणघडणीसाठी योग्य बदल घडत गेले. इतिहासाचा मागोवा घेताना अशा घटनांकडे जरा व्यापक दृष्टिकोनाने पाहावे लागते. कारण या घटनांची व्यापकता, परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असतो. उदाहरणार्थ, सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीची कला माणसाने अवगत केली व आजतागायत शेती हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.शेतीच्या विकासातून व्यापार वाढला, निरनिराळे उद्योग वाढले, शेती उद्योगासाठी लागणारी उपकरणे तयार झाली, वेगवेगळ्या मार्गांनी आपली उपजीविका निर्माण करणारे लोक तयार झाले, नगरे उदयास आली. हे सर्व सामाजिक व आर्थिक बदल घडत असतानाच व्यापार व एकंदरीत अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी स्वरूपाचा ठरावा असा ‘नाण्यांचा’ विकास झाला. व्यापारासाठी ‘देवाण-घेवाण’ या तत्कालीन व्यवस्थेवर अवलंबून न राहता अशा नाण्यांचा शोध लागल्यामुळे आर्थिक व्यवहार सुकर होऊ लागले. व्यापारामध्ये स्थैर्य आले व नागरिकरणाची प्रक्रिया सुरू झाली.
गतकाळाचा आढावा घेताना राजकीय, सामाजिक, आर्थिक, तत्कालीन कला, तंत्रज्ञान या सर्व बाजूंचा विचार करावा लागतो. इतिहास लेखनासाठी लागणारी जी साधने आहेत त्यांमध्ये लिखित साधने व पुरातत्वीय अवशेष या दोघांची सांगड घालावी लागते.
लिखित साधनांमध्ये धार्मिक, सरकारी ग्रंथ व कागदपत्रे, प्रवासवर्णने यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पुरातत्वीय साधनांची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामध्ये मानवनिर्मित वस्तू-वास्तू यांचा समावेश होतो. यामध्ये उत्खननातून सापडणारे अवशेष, ऐतिहासिक इमारती, मूर्ती, शिलालेख, अवजारे, दागिने, प्राणी व मानवी शरीरांचे अवशेष, प्राचीन चित्रकला, नाणी या सर्वांचा समावेश होतो.
सामान्यतः अभ्यासकांकडून दुय्यम स्थान मिळालेले, परंतु अव्वल दर्जाची ऐतिहासिक माहिती ज्यातून मिळू शकते असे पुरातत्वीय साधन म्हणजे प्राचीन नाणी होय. नाण्यांच्या शास्त्रीय स्वरूपाच्या अभ्यासशाखेला ‘नाणकशास्त्र’ (छणचखडचअढखउड) असे म्हणतात. नाणकशास्त्र ही पुरातत्त्वशास्त्राची (अठउकअएजङजॠध) उपशाखा होय. नाणकशास्त्राच्या अभ्यासातून इतिहास लेखनासाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होत असते.
भारतीय इतिहासाचा विचार करता आजच्या स्वरूपातील नाण्यांना सुमारे २७०० वर्षांचा इतिहास आहे. भारतातील व इतर देशांमध्ये असलेल्या वस्तुसंग्रहालयात लाखोंच्या संख्येने भारतीय नाणी आहेत. त्याशिवाय उत्खननांमध्ये नाणी सापडतात. प्राचीन इतिहास असलेल्या गावांमध्ये- शहरांमध्ये खोदकाम चालू असताना नाणी सापडतात. नाणी इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. नाण्यांच्या अभ्यासातून तत्कालीन अर्थव्यवस्था, राजकीय परिस्थिती, समाज, धार्मिक चालीरीती, तंत्रज्ञान, व्यापार, कला या सर्वांची माहिती मिळते. लिपीचा विकास, राजांची नावे व वंशावळ, वजन व मापन पद्धती यांबाबतदेखील अधिकृत माहिती मिळते.
नाण्यांचा उगम व विकासातील टप्पे
प्राचीनकाळी जेव्हा नुकतीच शेतीची कला मानवाने अवगत केली, अगदी तेव्हापासून मानवी वस्त्यांमध्ये आपापसांत धान्य किंवा शेतीची अवजारे यांची देवाण-घेवाण व्हायची. गव्हासाठी तांदूळ किंवा एखादे शेतीसाठी उपयुक्त अवजार यांच्या अदलाबदलीवर (इरीींशी ीूीींशा) आर्थिक-सामाजिक व्यवहार अवलंबून होते. यामध्ये व्यवहारसुलभता होती; पण आर्थिक न्याय नव्हता. शेतीसाठी एका नांगराच्या बदल्यात किती धान्य द्यायचे याचे प्रमाण निश्‍चित नव्हते. यातूनच अनेक समस्या उद्भवत. समस्या असली की समाधानासाठी खटपट करणे हा मानवी स्वभावगुण असल्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्राचीनकाळी मानवाने समान वजन असलेल्या ‘गुंजा’ (लाल व काळ्या रंगाच्या बिया), ‘कवडी’ (पांढर्‍या किंवा करड्या रंगाचे शिंपले) यांचा उपयोग आर्थिक व्यवहारांमध्ये सुरू केला. सहजपणे मिळणार्‍या गुंजा व कवडी यामुळे काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुकर झाले, परंतु प्रमाणबद्धता अजूनही निश्‍चित न झाल्यामुळे लांबच्या वसाहतीदरम्यानच्या व्यापारामध्ये समस्या येऊ लागल्या. ‘कवडीमोल दराने’, ‘फुटी कवडी’सारख्या उक्ती या ‘कवडी’रूपी नाण्यांमुळेच अस्तित्वात आल्या.
चांदी हा धातू भारतामध्ये सर्वप्रथम नाणी तयार करण्यासाठी वापरला गेला. इसवी सनापूर्वी ७ व्या ते ६ व्या शतकांदरम्यान चांदीची नाणी पाडली गेली. आयताकृती, चौकोनी व क्वचित गोलाकार स्वरूपाची ही नाणी प्रामुख्याने उत्तर भारतात सापडतात. यावर तत्कालीन राज्यांचे/शहरांचे किंवा व्यापारी वर्गाची चिन्हे सापडतात. नाणी चलनात आणणार्‍या व्यक्तीचे व संस्थेचे नाव कोरले नसल्यामुळे अशा नाण्यांबाबत निश्‍चितपणे काही सांगणे कठीण आहे. गांधार (आजचे अफगाणिस्थान) ते बंगालपर्यंत अशी नाणी सापडतात. त्या काळात भारतामध्ये चांदी हा धातू तयार करण्यासाठीची कला- तंत्रज्ञान अवगत होते. परंतु भारतीय नाण्यांसाठी लागणारी चांदी ही भारताबाहेरून येत असावी असा संशोधकांचा कयास आहे. समान वजनाच्या या चांदीच्या नाण्यांना त्यांच्या धातूमूल्यामुळे (चशींरश्र तरर्श्रीश) सर्वमान्यता होती व या प्रकारच्या नाण्यांमुळे व्यापार खर्‍या अर्थाने वाढला व पूर्ण भारतभर इ.स.पूर्व सुमारे ७०० ते इ.स. २०० पर्यंत शहरीकरण झाले. काशी, कोशल, गांधार, तक्षशिला, अयोध्या, मथुरा, उज्जैनसारख्या ठिकाणी अशी नाणी सापडली आहेत. या नाण्यांना पंच मार्केट कॉईन (पीएमसी) असे म्हणतात.
भारतावर शासन करणार्‍या अनेक राजवंशांमध्ये काही ग्रीक होते, फारसी होते, बॅक्ट्रीयन, ससानियन होते. यांनीदेखील आपली नाणी भारतामध्ये चलनात वापरली. सिकंदर राजाच्या भारत आक्रमणानंतरच्या काळात भारताचा काही भाग ग्रीक आधिपत्त्याखाली होता. या शासकांना इंडो-ग्रीक राजे असे संबोधले जाते. या प्रकारच्या नाण्यांमध्ये आढळणारे वैशिष्ट्य म्हणजे राजाची प्रतिमा! नाण्याच्या एका बाजूला राजाची प्रतिमा तर दुसर्‍या बाजूला ग्रीक देवतेची प्रतिमा कोरलेली असायची. याचसोबत राजाचे नाव ग्रीक व खरोष्टी लिपीमध्ये कोरलेले आढळते. नंतरच्या काळात ‘तांबा’ या धातूमध्येदेखील नाणी पाडली गेली व राजाचे नाव ब्राह्मी लिपीतून लिहिले जाऊ लागले.
भारतामधून चलनात असलेल्या इंडो-ग्रीक नाण्यांच्या मदतीने व शिलालेखांमधून सापडणार्‍या अक्षरांच्या अभ्यासातूनच खरोष्टी व ब्राह्मी लिपी वाचण्यात जेम्स प्रिंसेपला यश आले व भारतीय प्राचीन इतिहास ज्ञात झाला.
काही तुरळक पुरावे सोडता खर्‍या अर्थाने सुवर्णनाण्यांचा उपयोग सर्वप्रथम कुषाण राजवंशाने केला. शिव, विष्णूसारख्या देवदेवतांनादेखील याच काळात नाण्यांवर स्थान मिळाले. कनिष्क, वासुदेवसारख्या कुषाण राजांनी भारतीय संस्कृतीशी एकरूप होण्याची जी किमया करून दाखविली ती नाण्यांमधून समजून येते.
क्षत्रप (घीहरींीरि) राजवंशाच्या नाण्यांमधून तत्कालीन गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांतील आर्थिक परिस्थिती तर समजतेच, पण त्याचसोबत एकंदरीत राजकीय व्यवस्थेचादेखील अंदाज बांधता येतो. क्षत्रप राज्यांच्या नाण्यांवर ‘राज्ञो श्री महाक्षत्रपस’ किंवा ‘राज्ञो श्री क्षत्रपस’ अशी बिरुदे सापडतात. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेशांमध्ये सातवाहन राजांच्या राजवटींदरम्यान तांब्याची नाणी मोठ्या प्रमाणात चलनामध्ये होती. १९३० च्या दरम्यान ख्रिस्ती फादर हेन्री हेरास यांना चांदोर येथे सातवाहनकालीन नाणी सापडली होती. इसवी सनापूर्वी दुसरे शतक ते इसवी सन दुसरे शतक हा सातवाहन राजांचा काळ होय. याच काळात भारत व रोमन साम्राज्यादरम्यान व्यापार वृद्धिंगत झाला. याच व्यापारादरम्यानची अनेक रोमन सुवर्णनाणी भारतभर सापडली आहेत. भारताच्या ज्ञात इतिहासामध्ये अनेक राजवंश असेदेखील आहेत की त्यांच्याबद्दलची माहिती केवळ नाण्यांमधून प्राप्त झालेली आहे. बनवासी व कारवार येथून राज्य करणारे छुटू राजा व त्यांचा राजवंश हे एक उत्तम उदाहरण आहे.
क्षत्रप राजांच्या वंशावळीसाठी नाण्याएवढे विश्‍वसनीय दुसरे साधनच उपलब्ध नाही. क्षत्रपांच्या नाण्यांवर राजा, त्याचे क्षत्रप वा महाक्षत्रप हे बिरुद, वडिलांचे नाव व त्यांचे बिरुद, नाण्यांचे चलनात येण्याचे वर्ष ही सर्व माहिती दिलेली आहे. गुप्त काळासंदर्भात इतिहास सांगायचा असेल तर नाण्यांना वगळून तो पूर्ण होणारच नाही. या काळातील सुवर्णनाणी, त्यावरून आढळणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक जीवन, कलाकुसर, धातुशास्त्रीय तंत्रज्ञान हे सर्व वाखाणण्याजोगे आहे. सुवर्ण, रौप्य, तांबा या धातूंमधून आढळणारी गुप्त राजांची नाणी हा खर्‍या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. या नाण्यांवर गुप्त साम्राज्याचा गरुडध्वज, राजदंड, राजा, राजाचे नाव हे सर्वकाही आहे. विष्णू-लक्ष्मीसारख्या देवी-देवता आहेत. अश्‍वमेध यज्ञ केल्यानंतर पाडलेली नाणीदेखील आहेत. राजाचे चित्रणदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. अश्‍वारूढ राजा, वीणा वाजवणारा राजा, सिंहाची शिकार करणारा राजा, राणीसोबत राजा असे वेगवेगळे चित्रण गुप्त राज्यांच्या नाण्यांवर आढळते. चंद्रगुप्त, विक्रमादित्य, समुद्रगुप्त यांसारखे विश्‍वविख्यात शासक या काळात होऊन गेले.
गुप्त काळाच्या समाप्तीनंतर भारताच्या राजकीय व आर्थिक जीवनात अनेक स्थित्यंतरे आली. परकीय आक्रमणे, व्यापारातील मंदी यामुळे गुप्त काळानंतर कमी दर्जाची नाणी पाडलेली आढळतात. सोन्याच्या नाण्यांमधून सोन्याचे प्रमाण कमी झालेले आढळले. अनेक राजवंशांनी स्वतःची नाणी न काढता अगोदरची नाणी चलनात ठेवली. मुसलमानी आक्रमकांनी तर भारतातील अमाप संपत्ती लुटून नेली. हजारो-लाखो नाणी भारताबाहेर नेऊन वितळवण्यात आली. साधारणपणे ९ व्या शतकापासून सिंध, बलुचिस्तान, गांधार या प्रदेशांवर मुसलमानी शासक आपली सत्ता गाजवू लागले होते. त्यांनी जबाबदारी दिलेले अधिकारी (आमीर) आपापली नाणी पाडत होते. सिंध प्रांतातल्या आमीरनी पाडलेली नाणी ही भारतातील पहिली इस्लामिक शासकीय नाणी होय.
त्यानंतर महंमद बीन साम यांनी आपली नाणी छापली. कुराणातील आयत व स्वतःचे नाव ही इस्लामिक पद्धत होती. साधारणपणे १३ व्या शतकाच्या सुरुवातीपासून दिल्ली प्रदेशावर मामेलुक (गुलाम) या मुसलमानी राजवंशाची सत्ता प्रस्थापित झाली. मुसलमानी पद्धतीप्रमाणे नवीन शासकाला खुत्बा (धार्मिक अधिष्ठान) व सिक्का (स्वतःची वेगळी नाणी) हे करणे समाजमान्यतेच्या दृष्टीने गरजेचे होते. त्यामुळे प्रत्येक शासकासाठी स्वतःची नाणी असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले. तांबा, बिलन, चांदी आणि सोन्याची नाणी या शासकांनी पाडली. ‘टंका’ या नावाने चांदीची नाणी चलनात होती. वेगवेगळ्या काळात वजनानुसार या नाण्यांची नावे बदलत होती. रझिया सुलताना या महिला शासकानेदेखील सुरुवातीच्या काळात वडिलांच्या नावाने व नंतर स्वतःच्या नावाने नाणी काढली. अल्लाउद्दिन खिलजी, महंमद तुघलकसारख्या दिल्लीच्या मुसलमानांनी नाणकशास्त्राच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या अनेक प्रयोग केले.
दख्खन व दक्षिण भारतात हसन गंगू बहनमशाह याने बहनमी सलतनतेची स्थापना केली व आपली स्वतंत्र नाणी पाडली. या काळात गोव्यामध्येदेखील बहमनी नाणी चलनात होती. या बहमनी राजवटीचे १५ व्या शतकात ५ तुकडे झाले व गोव्यात आदिलशाही व विजयनगर साम्राज्याची नाणी चलनात आली. समुद्रमार्गे चालणार्‍या व्यापाराच्या सोयीसाठी आदिलशाही काळात ‘लारीन’ या पद्धतीचे एक नवीन नाणे अस्तित्वात आले. याचा आकार केसाच्या पीनसारखा होता. चांदीची आदिलशाही लारीन दाभोळ बंदरातून पाडली जायची.
बाबर या मुघल आक्रमकाने दिल्लीची सत्ता काबीज करून सोळाव्या शतकात मुघल राजवट स्थापन केली व नवीन प्रकारची नाणी पाडली. मुघलांविरुद्धच्या संघर्षामध्ये शेरशाह सुरी याने काही काळ सत्ता मिळविली व अनेक आर्थिक सुधार घडवून आणले. त्यातला सर्वात महत्त्वाचा सुधार म्हणजे ‘रुपया’ हे नाण्यांसाठीचे नाव होय. या रुपयाला ठराविक वजन होते. आजच्या भारतीय उपखंडातील चलनाचे नाव ‘रुपया’ ही शेरशाह सुरीची देणगी आहे असेच म्हणावे लागेल.
गोवा व दक्षिण भारतामध्ये विजयनगर राजांच्या काळात चांदी, सोने, तांबे या धातूंची नाणी प्रचलित होती. साधारणपणे ०.७ ग्रॅम ते ११.६ ग्रॅमपर्यंतच्या वजनाची वेगवेगळ्या किमतीची नाणी अस्तित्वात होती. विजयनगरच्या ‘पगोडा’ या नाण्याच्या आधारावर नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी आपली ‘होन’ ही नाणी पाडली.
मुघल शासक औरंगजेबची नाणी अनेक ठिकाणी असलेल्या टांकसाळीमधून (चळपीं) पाडली जायची. त्यांतील एक टांकसाळ डिचोली येथे होती. डिचोली टांकसाठीमधल्या नाण्यांची जशास तशी प्रतिमा सावंतवाडीच्या खेमसावंतांनी स्वतःची नाणी म्हणून वापरली. इतकेच नव्हे तर डिचोली येथल्या औरंगजेबच्या नाण्यांची प्रतिमा निपाणी (कर्नाटक), कापशी (कोल्हापूरजवळ) येथूनदेखील पाडली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तांब्याची ‘शिवराई’ ही नाणी अस्तित्वात होती. सोन्याच्या नाण्यांना ‘होन’ हे नाव होते.
वसाहतीच्या व व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या युरोपीयन व्यापार्‍यांनी अगोदरच्या काळात भारतीय राजांची नाणी वापरली, परंतु नंतरच्या काळात त्यांनी मुघलांकडून नाणी पाडण्याची परवानगी मिळवली. त्यात ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज होते. भारतीय पद्धतीनुसार व नंतर स्वतःच्या राजांची नाणी पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी काढली. युरोपीय टांकसाळीतून तयार होणारी नाणी ही सुबक व उत्तम दर्जाची असल्यामुळे अनेक भारतीय शासक ब्रिटिशांकडून आपल्या राज्यासाठी नाणी बनवून घेऊ लागले. यात मराठे होते तसेच मुघल शासकदेखील. युरोपीय यांत्रिकीकरणाचा प्रभाव भारतीय नाण्यांवरही दिसू लागला. मशिनीद्वारे बनवलेली नाणी चलनात आली. ग्वाल्हेर, बडोदासारख्या राज्यांची नाणी युरोपीय नाण्यांच्या धर्तीवर बनली. धातुमूल्याऐवजी टोकन पद्धती अस्तित्वात आली.
स्वतंत्र भारतात १९५० पासून नाणी व नोटा छापल्या गेल्या. १ पैसा ते १ रुपया, २ रुपये, ५ रुपये ही नाणी चलनात आली व कालांतराने त्यातली अनेक नाणी चलनातून अदृश्य झाली. नाण्यांचा इतिहास रंजक आहे. नाणी गोळा करणे हा एक आधुनिक छंद आहे. पण या नाण्यांच्या शिस्तबद्ध अभ्यासाने आपला इतिहास कळू शकतो हे आता अनेक अभ्यासकांच्या लक्षात आलेले आहे. नाणी व नोटांवरच्या चित्रणामधून तत्कालीन समाजाची ओळख होते.
रविवार, दि. ७ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत गोव्यात पणजी येथे होऊ घातलेल्या पहिल्या ‘कॉईन फेस्टिव्हल’च्या निमित्ताने वाचकांना भारताच्या नाणकशास्त्रीय इतिहासाची ओळख व्हावी म्हणून केलेला हा प्रयत्न.