नाट्यसंगीताचा बुलंद गोमंतस्वर

0
713

– जनार्दन वेर्लेकर
संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक वेधक, लोभस, हवाहवासा वाटणारा आकृतीबंध. ‘वेध तुझा लागे सतत मनी’ या नाट्यपदाप्रमाणे नाट्यसंगीत आणि संगीत नाटक यांचा दुहेरी वेध न लागलेला मराठी नाट्यरसिक विरळा. गोमंतभूमीने तर नाट्यसंगीत आणि संगीत नाटक या परस्परपूरक आकृतीबंधांवर जिवापाड प्रेम केले आहे. एवढेच नव्हे तर नाट्यसंगीताचा बुलंद गोमंतस्वर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आजतागायत निनादत राहिला आहे. ज्या स्वनामधन्य गोमंतकीय कलाकारांनी नाट्यसंगीताचा अभिजात वारसा एक प्रकारच्या समर्पित निष्ठेने जपला, जोपासला आणि संगीत रंगभूमीची निगराणी केली त्यांच्या नुसत्या आठवानेही ‘जाहली रोमांचित ही तनू’ अशी माझी अवस्था होते. कुठून सुरुवात करावी या स्मरणयात्रेला या विचारानेही माझे मन सैरभैर होऊन जाते.मा. दीनानाथ यांच्या लाडक्या लेकीने बालवयातच नाट्यसंगीत आत्मविश्‍वासाने आळवून आणि धिटाईने संगीत रंगभूमीवर पदार्पण करून रसिकांना अचंबित केले होते ही आख्यायिका वा सांगोवांगीची गोष्ट नाही. भारतरत्न लता मंगेशकर यांच्याच शब्दांत ती अशी – ‘‘मी आणि माझे बाबा यांच्या संयुक्त जलशाचा कार्यक्रम लोकांना परिचित झाला आणि थोड्याच दिवसांत आम्ही दोघेही एकत्र रंगभूमीवर आलो. ‘सौभद्र’ नाटकात एकदा मला नारदाची भूमिका करावी लागली. कारण त्या दिवशी नारदाची भूमिका करणारा नट काही कारणामुळे ऐन वेळी येऊ तर शकला नाही किंवा आजारी पडला. नक्की कारण मला आता आठवत नाही. पण नाटकाला गर्दी चांगली झालेली. बाबा फार काळजीत पडले. तेव्हा मी स्वतः धीटपणे त्यांना सांगितले- ‘मी करेन नारदाचे काम. शिवाय, गाण्याला वन्समोअर पण मिळवीन.’ बाबांनी नाईलाजाने संमती दिली. अन् आश्‍चर्याची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी नारदाचे काम तर चांगले केलेच, ‘पावना वामना’ या पदाला खरोखरीच वन्समोअर मिळवला. बाबांना पराकोटीचा आनंद झाला. कौतुकाने मला त्यांनी हृदयाशी धरले. माझ्या बालपणीच्या ज्या काही आठवणी माझ्या मनःपटलावर चित्रवत धावतात त्यातली ही एक प्रमुख आठवण आहे. ‘पुण्यप्रभाव’मध्ये युवराजचे कामही मी केले. माझी ती भूमिका पाहून काही वृद्ध मंडळीनी ‘वा! मास्टर दीनानाथांची ही बालप्रतिमाच आहे जणू!’ असे उद्गार काढले.’’
आज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर वजा हिंदी, खरे तर भारतीय चित्रपटसंगीत, ही कल्पनाही अशक्य कोटीतली वाटावी एवढं दीदींचं संगीत विश्‍वाला योगदान आहे. भारतीय माणसाचे कान सुरेल करण्याचे श्रेय आपण त्यांना द्यायला हवे. दुसरेही एक उदाहरण द्यायचा मोह मला इथे आवरत नाही. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या विश्‍वातील एक परमआदरणीय व्यक्तिमत्त्व. जयपूर-अत्रौली गायकीच्या त्या समर्थ वारसदार आणि सर्वमान्य गुरू. तुम्ही विचाराल त्यांचं आणि नाट्यसंगीताचं नातं काय? खरी गोष्ट अशी की बालवयातच मोगूबाईंनी संगीत नाटकांतून भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद या भूमिका साकारल्या होत्या. प्रथम गोव्यातील श्रीचंद्रेश्‍वर-भूतनाथ संगीत नाटक कंपनीत तर नंतर सांगली येथे स्त्रियांच्या सातारकर संगीत नाटक कंपनीतून नाट्यसृष्टीत वावरण्याचा बरा-वाईट अनुभव त्यांच्या गाठीला होता. लतादीदी आणि मोगूबाईंवर कोवळ्या वयात नाट्यसंगीताचे संस्कार झाले हा प्राचीन नव्हे तर अलीकडचा इतिहास आहे.
नाट्यसंगीताच्या बुलंद गोमंतस्वराचे अग्रमानांकित उदाहरण अर्थातच मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या तेजस्वी गायनीकळेचे. बालगंधर्व आणि मा. दीनानाथ हे संगीत रंगभूमीचे जणू चंद्र-सूर्य. बालगंधर्वांची गायकी चंद्रशीतल चांदण्यासारखी, तर मा. दीनानाथांची मर्दानी, आक्रमक, तप्त, प्रखर तेजोबलाने युक्त, चमत्कृतीने ओतप्रोत, उंचावरून कोसळणार्‍या प्रपातासारखी. शृंगार, शांत, भक्ती, करुणा, वत्सल हे रस बालगंधर्वी गायकीचे गुणविशेष, तर वीर, उदात्त, अद्भुत, रौद्र रसानुकूल गायकी मा. दीनानाथांची. तडफदार, जोरकस, स्फुरणदायी आणि नवनिर्मितीचा ध्यास घेतलेली त्यांची गायकी विद्युल्लतेसारखी. डोळे दिपवणारी. मात्र या दोघा कलावंतांना परस्परांविषयी पूर्ण आदरभाव होता. दीनानाथांचे उद्गार आहेत- ‘नारायणरावांसारखा मोठा माणूस आमच्या नाट्यसृष्टीत दुसरा झाला नाही.’ आणि बालगंधर्वांचे शब्द तर मा. दीनानाथांच्या कौतुकाने निथळणारे आहेत. दीनानाथ पोरसवदा होता तेव्हाच ते म्हणाले होते- ‘हा मुलगा माझ्या कंपनीत येईल तर त्याच्यासाठी मंगेशीपासून मुंबईपर्यंत मी चंदेरी रुपयाच्या पायघड्या पसरेन.’
पारंपरिक नाट्यसंगीताला मा. दीनानाथांनी आपल्या नवनवोन्मेषाली प्रतिभेचा परीसस्पर्श आणि साज दिला. धैर्यधर असो वा तेजस्विनी. वीररसात्मक, देशप्रेमाने युक्त अशा भूमिका त्यांच्या मूळच्या स्वभावाला आणि गानप्रतिभेला स्फुरण आणणार्‍या. म्हणूनच ‘शुरा मी वंदिलें’, ‘झालें युवती मना’, ‘जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा’, ‘वितरी प्रखर तेजोबल’, ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ ही नाट्यपदे त्यांच्या गायकीतून विशेष प्रभावी वाटतात. मात्र शृंगाररसप्रधान आणि कोमल भाव व्यक्त करणारी त्यांची नाट्यपदेही रसिकांना तेवढीच प्रिय आहेत. उदाहरणार्थ, ‘प्रेम सेवा शरण सहज जिंकी मना’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘या नव नवलनयोेनत्सवा’, ‘दे हाता या शरणागता’, ‘भालीं चंद्र असे धरीला’, ‘कठीण कठीण कठीण किती’, ‘सुहास्य तुझे मनास मोही’, ‘शांतदांत कालिकाही’, ‘शतजन्म शोधीताना’, ‘भासे जनात राया’, ‘विलोपलें मधु मिलनात या’, ‘सुकतातची जगीं या’ ही नाट्यपदे मा. दीनानाथांच्या खास ठेवणीतली म्हणून आजही रसिकांच्या मनात घर करून राहिली आहेत.
वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षीं मा. दीनानाथांची प्राणज्योत मालवली आणि त्यांच्या अकाली निधनाने अवघी नाट्यसृष्टी हळहळली. मा. दीनानाथांचा संगीत रंगभूमीवरील उदय आणि अस्त एखाद्या ग्रीक शोकांतिकेसारखा. मनाला घोर चटका लावून जाणारा. मा. दीनानाथ जणू शापित यक्ष- अपेशी, हतभागी. संगीताचे जग पादाक्रांत करणार्‍या आपल्या गुणी पंचप्राणांचे यश, कीर्ती, वैभव याचि देही याची डोळा पाहणे नियतीने त्यांच्या ललाटात लिहिले नव्हते एवढे खरे.
गोव्यातील सावकार घराण्याने संगीत रंगभूमीची निष्ठापूर्वक सेवा केली आहे. रंगदेवता रघुवीर सावकार हे बालगंधर्वांचे समकालीन. ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ ही त्यांची नाट्यसंस्था. आपल्या एकाहून एक सरस स्त्रीभूमिकांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. विठ्ठलभाई पटेल यांनी त्यांना ‘रंगदेवता’ हा किताब दिला होता. त्यांच्या नाट्यसंस्थेचा पेटंट, हातखंडा प्रयोग ‘संगीत संशयकल्लोळ.’ या नाटकातली त्यांची रुपगुणसुंदर भूमिका अर्थातच रेवती. असे सांगतात की या नाटकातील जलशाच्या प्रवेशात अदा करीत ‘चुराकर चले’ व ‘ना मारो पिचकारी’ या रचना ते गात. तो प्रवेश बघण्यासाठी कित्येक धनिकवणिक बाळे खास येत असत. ‘संशयकल्लोळ’ तसे चिरतरुण, सदाबहार नाटक. अनेक नाट्य कंपन्या या नाटकाचा प्रयोग करीत असत. मात्र रेवती म्हणजे रघुवीर सावकार, हे समीकरण त्यांच्या निधनापर्यंत अबाधित राहिले. बालगंधर्व, मा. दीनानाथ, रघुवीर सावकार यांना प्रत्यक्ष रंगमंचावर वावरताना मी पाहिले नाही. परंतु माझे भाग्य थोर म्हणून मी वसंतराव सावकारांचा आणि रघुवीर नेवरेकरांचा ‘फाल्गुनराव’, गोपीनाथ सावकारांचा ‘भादव्या’ पाहून झपाटून गेलो. कृतकृत्य झालो. आजच्या काळातील आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसाद सावकार हे रघुवीर सावकार यांचे सुपुत्र. प्रसादजींचा जन्म बडोद्याचा. त्यांच्या वडिलांच्या कंपनीचा मुक्काम तेव्हा याच शहरात होता. प्रसाद सावकारांच्या वेधक भूमिका पाहण्याचा योग वेळोवेळी आला आणि या घराण्याने संगीत रंगभूमीची जी कायावाचामने सेवा केली तिच्याप्रति मी नेहमीच नतमस्तक झालो. ‘लग्नाची बेडी’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘कट्यार काळजांत घुसली’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘अमृतमोहिनी’, ‘अवघा रंग एक झाला’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका त्यांच्या अभिनय आणि गाण्यासाठी रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांचा स्वभाव मिश्किल, गमत्या, चेहरा सदा हसतमुख. बोलणे मिठास, लाघवी. सध्या गोव्यात स्थायिक. संगीताच्या मैफलींना, संमेलनांना त्यांची उपस्थिती आयोजकांना हवीहवीशी, प्रेरणादायी वाटते. समोरच्या चाहत्याला, व्यक्तीला ते आपल्या वयाचे, ज्येष्ठतेचे दडपण जाणवू देत नाहीत. वृत्ती खुशालचेंडू. मी त्यांच्या सहवासाचा लोभी, भुकेला. ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ पण कुणालाही न दुखावता ही त्यांची वृत्ती मला आवडते. कारण ती दुर्मीळ. आजच्या स्वकेंद्रित काळात अशी व्यक्ती आणि वल्ली विरळा.
गोव्याच्या ज्योत्स्नाबाई भोळे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. पूर्वाश्रमीचे नाव दुर्गा केळेकर. त्यांच्या भगिनी गिरीजाबाई केळेकर, मंगला रानडे, केशरबाई बांदोडकर. सर्वांनी आपापल्या परीने संगीत रंगभूमीचा वारसा जोपासला आहे. नाट्याभिनय, नाट्यसंगीत, भावगीत गायन, शास्त्रीय गायन, नाट्यलेखन, वक्तृत्व असा ज्योत्स्नाबाईंचा सर्वसंचारी वावर. ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकातली त्यांची ‘बिम्बा’ ही पहिलीच भूमिका एवढी गाजली की, कुलीन स्त्रियांनी रंगभूमीवर कामे करावी की नाही, हा वाद आपोआप मिटला. ‘नाट्यमन्वंतर’ आणि पुढे ‘नाट्यनिकेतन’ या नाट्यसंस्थांनी त्यांच्या कलागुणांना वाव दिला, प्रोत्साहन दिले. प्रसिद्ध संगीतकार, समीक्षक केशवराव भोळे हे त्यांचे पती, मार्गदर्शक, वाटाड्या-फ्रेंड, फिलोसोफर, गाईड. मो. ग. रांगणेकर हे हरहुन्नरी नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक. त्यांच्या तालमीत ज्योत्स्नाबाईंचं कलाजीवन बहरलं. ‘कुलवधू’ या नाटकातील त्यांच्या ‘भानुमती’ या भूमिकेने त्यांना अमाप यश, कीर्ती बहाल केली. ‘एक होता म्हातारा’, ‘आशीर्वाद’, ‘रंभा’, ‘भूमीकन्या सीता’, ‘राधामाई’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मनरमणा मधुसुदना मुखीं राहो माझ्या तुझे हें नाम सदा’, ‘भाग्यवती मी त्रिभूवनी झाले कुबेर माझा धनी’, ‘बोला अमृत बोला’ ही त्यांनी गायिलेली नाट्यपदे अवीट गोडीची. त्यांना रंगभूमीवर पाहण्याचा योग माझ्या भाळी नव्हता. मात्र गोव्यात मांडवीच्या तीरावर, गोवा कला अकादमीच्या वास्तूत साजर्‍या झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. मायभूमीत त्यांना हा मान मिळाला होता. त्यावेळी त्यांचं वक्तव्य आणि सोज्वळ, हसतमुख सान्निध्य दुरून का होईना मला न्याहाळता आलं. त्यावेळी ‘सुहास्य तुझे मनास मोही’ हे पद मी गुणगुणत राहिलो हे आजतागायत मी विसरलेलो नाही.
महाराष्ट्र गंधर्व पं. सुरेश हळदणकर यांचे राजबिंडे, राजस, सुकुमार, मदनाचा पुतळाच म्हणता येईल असे रूपलावण्य माझ्या स्मृतिमंदिरात, गाभार्‍यातील मूर्तीसारखे निरंतर वास करून आहे. आणि त्यांच्या सुमधुर कंठाचे माधुर्य, त्यांच्या गळ्याची फिरत, टपोर्‍या मोत्यांच्या माळेसारखी त्यांची स्वच्छ, सुरेल, दर्जेदार तान मी कर्णसंपुटात साठवली आहे. पं. सुरेश हळदणकर मूळ गोव्याचे. पाळण्यातलं त्यांचं नाव अमृत. पुण्याचे बॅरिस्टर खाजगीवाले यांच्या ‘महेश संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेत अमृत दाखल झाला तो रत्नपारखी खाजगीवाले यांच्या निवडीमुळे. अमृतच्या गाण्यावर ते भाळले. त्यांनीच त्यांचे ‘सुरेश’ हे नामकरण केले. संगीत रंगभूमी आणि शास्त्रीय संगीत ही दोन्ही कलाक्षेत्रे त्यांनी पादाक्रांत केली. बापूराव केतकर, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर यांनी त्यांना शास्त्रीय गायनात पारंगत केले. पं. गोविंदराव टेंबे यांच्याकडून त्यांना नाट्यसंगीताची संथा मिळाली. अर्जुन, नारद, कच, धैर्यधर, आश्‍विनशेट या त्यांच्या भूमिका गाजल्या. मुंबई मराठी साहित्य संघाने ‘होनाजी बाळा’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सुरेश हळदणकर ‘होनाजी’ तर भालचंद्र पेंढारकर ‘बाळा’ या संचात नाटकाची कीर्ती दशदिशांत पसरली. त्यांची ‘श्रीरंगा कमलाकांता’ ही पहाडी रागातली गौळण आजतागायत लोकप्रिय आहे. ‘श्री अनंता मधूसुदना, पद्मनाभा नारायणा’ हा अभंग त्यांच्या कंठातून ऐकणे हा रसिकांसाठी परमानंद. ‘विद्याहरण’ नाटकातील कचाच्या भूमिकेतील ‘विमल अधर निकटी मोह हा पापी’ व ‘सूरसुखखनी तू विमला’ ही नाट्यपदे खास त्यांच्या ठेवणीतली. ‘संशयकल्लोळ’ या नाटकातली त्यांची आश्‍विनशेट ही एकमात्र भूमिका मी पाहिली आणि संतांच्या शब्दात सांगायचे तर ‘हृदय बंदीखाना केला आंत विठ्ठल कोंडीला’ असा त्यांंचा ‘आश्‍विनशेट’ मी मनाच्या गाभार्‍यात कोंडून ठेवला आहे. ‘सुकांत चंद्रानना पातली’, ‘कर हा करीं धरीला शुभांगी’, ‘धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना’, ‘मानिली आपुली तुजसी मी एकदां’, ‘कुटील हेतू तुझा फसला’ ही त्यांनी आळवलेली एकाहून एक सरस गोडीची नाट्यपदे आजही माझ्या कानामनात रेवतीच्या पायांतील पैजणांसारखी रुमझुम करीत आहेत. वसंतराव सावकारांचा ‘फाल्गुनराव’ व गोपीनाथ सावकारांचा ‘भादव्या’ मी याच प्रयोगात पाहून धन्य धन्य झालो. वसंतरावांचा अफलातून फाल्गुनराव या सम हा. असा फाल्गुनराव पुन्हा होणे नाही हा माझा निष्कर्ष. नंतर पाहिलेले ‘फाल्गुनराव’ त्यांच्या पासंगाला पुरणारे नाहीत- नव्हते, एवढं खरं. याच प्रयोगात जलशाच्या प्रवेशात मी गोव्याचे सुपुत्र पं. गोविंदराव अग्नी यांचे जोरकस गाणे ऐकून सुखावलो. पं. गोविंदराव अग्नी यांच्या तालमीत अनेक शिष्य नाट्यसंगीत आत्मविश्‍वासाने, तयारीने गाऊ लागले. रामदास कामत आणि आशालता वाबगावकर मूळ गोव्याचेच. अग्नी यांच्या अगणित शिष्यांपैकी ही दोन सुपरिचित नावे. आचार्य अत्रे यांनी पं. सुरेश हळदणकर यांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही उपाधी दिली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश माननीय यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून मुंबईत आणला. त्या समारंभात पं. सुरेश हळदणकर यांचा त्यांच्या मूळ नावाला साजेसा अमृततुल्य सूर निनादला. त्यांना दुसर्‍यांदा मी पाहिलं-एकलं ते गोव्यातील मडगाव शहरातील प्रसिद्ध दिंडी उत्सवात. आजचे प्रसिद्ध गोमंतकीय गायक पं. प्रभाकर कारेकर हे हळदणकरबुवांचे सत्शिष्य. कारेकरांच्या गळ्याची फिरत त्यांच्या गुरूची सय जागवणारी.
मेघगर्जनेप्रमाणे गगनाच्या गाभार्‍यात घुमणारा बुलंद, खणखणीत स्वर नाट्यरत्न श्रीपादराव नेवरेकर या गायकनटाचा. नेवरेकरांचे नाट्यसंगीत ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना ‘नाट्यरत्न’ या उपाधीने गौरविले. खाडीलकरांच्या संगीत स्वयंवर या नाटकात भीष्मकाच्या तोंडी एक वीररसानुकूल नाट्यपद आहे. हे पद मालकंस या भारदस्त रागावर बेतलेले आहे. पदाचे शब्द- ‘जा भय न मम मना मंडप सबल.’ नेवरेकरांचे स्वरसामर्थ्य या पदात एकवटले आहे या माझ्या विधानात तीळमात्र अतिशयोक्ती नाही. पंढरपूरकरबुवा, पटवर्धनबुवा, लोंढे आदी गायकनटांनी हे नाट्यपद आपापल्या परीने तयारीने गायल्याचे सांगण्यात येते. मात्र नेवरेकर आणि हे नाट्यपद यांचे सख्य भल्याभल्यांनी अचंबित होऊन गौरवले आहे.
‘रंगबोधेच्छु’ या सावकारांच्या नाट्यसंस्थेत तसेच बालगंधर्वांच्या गंधर्व कंपनीत नेवरेकरांच्या नाट्यसंगीताला सुगीचे दिवस आले. गंधर्वमंडळीत मास्टर कृष्णराव, पटवर्धनबुवा, गणपतराव बोडस, कृष्णराव चोणकर, भांडारकर आणि साक्षात बालगंधर्व यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांच्या उपजत चढ्या आवाजाला धार आली. ‘रंगबोधेच्छु’ या नाट्यसंस्थेत वसंतराव सावकार, गोपीनाथ सावकार, कृष्णराव गोरे, विसुभाऊ भडकमकर, नानासाहेब चापेकर, सदाशिव नेवरेकर, गोविंदराव अग्नी, अनंत दामले, बंडोपंत सोहनी अशा उत्कृष्ट नटसंचात ते वावरले. ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’, ‘वरवंचना’ या नाटकांतल्या त्यांच्या भूमिका नावाजल्या गेल्या. मात्र ‘स्वयंवर’ (भीष्मक), ‘एकच प्याला’ (रामलाल) आणि ‘शारदा’ (कोदंड) या तीन भूमिकांचा खास बोलबाला झाला. ‘झणी दे कर या दिना’, ‘परम गहन ईश काम’, ‘वसुधा तलरमणी असुधाकर’ (एकच प्याला), ‘जठरानल शमवाया नीचा कां न भक्षिसी गोमय ताजें’, ‘स्वार्थी ही प्रीत मनुजाची सहज ती’ (शारदा) या नाट्यपदांवर नेवरेकरांच्या झंझावाती, घणाघाती, आवेशयुक्त गायकीची अमीट छाप आहे.
नेवरेकर हे प्रख्यात गायकनट रामदास कामत यांचे मामा. नात्याचे हे भावबंधन रामदास कामत यांच्या खड्या, कणखर, गायकीत परावर्तीत, प्रतिबिंबीत झाले आहे. ‘मत्स्यगंधा’ या नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे नाट्यपद माझ्या मते या भावबंधनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. मामा-भाच्याची ही जोडगोळी आम्हा गोवेकरांना कशी वाटते सांगू? पुन्हा त्यासाठी गद्याऐवजी पद्याचाच आधार घ्यायला हवा- ‘मर्मबंधातली ठेव ही प्रेममय| ठेवी जपोनी सुखाने सुखवी जीव॥
अस्सल गोवेकराला मत्स्यगंध अतिशय प्रिय. ‘गंगातिरी सत्यवतीच्या रूपाचा- कायेचा नव्हे, प्रणयगंध परीमळला’ आणि ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशीं’ अशी तपोधन पराशराची अवस्था झाली. पुढचे महाभारत आम्हा भारतीयांना सर्वज्ञात आहे. गोव्याच्या मुंबईस्थित ‘दि गोवा हिंदु असोसिएशन’ या नाट्यसंस्थेने नाटककार वसंतराव कानेटकर यांचे हे नाट्यपुष्प रंगमंचावर आणले आणि या नाटकापासून पं. जितेंद्र अभिषेकी यांचा एक सर्जनशील संगीत-दिग्दर्शक असा स्वरप्रवास सुरू झाला. अभिषेकी मूळ गोव्याचे हे सांगणे नलगे. बालवयापासून त्यांच्यावर भजन, कीर्तन, नाट्यसंगीताचे संस्कार झालेलेे. त्यांचे वडील बाळूबुवा अभिषेकी गोव्यातील पट्टीचे कीर्तनकार. ‘मत्स्यगंधा’ या नाटकाला संगीतसाज कुणी द्यायचा हा विषय चर्चेला आला तेव्हा मुंबईस्थित गोव्याचे रसिकाग्रणी आणि संगीत समीक्षक कै. गोपाळकृष्ण भोबे यांनी जितेंद्र अभिषेकींच्या नावाची आग्रही शिफारस केली. अभिषेकीबुवांनी मिळालेल्या या पहिल्याच संधीचं सोनं केलं आणि साठोत्तरी मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी मिळवून दिली.
रामदास कामत आणि आशालता वाबगावकर यांनी या नाटकात गायलेल्या नाट्यपदांनी रसिकमनावर गारूड केलं. या नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका तडाखेबंद खपल्या. २०१४ हे संगीत ‘मत्स्यगंधा’चे सुवर्णमहोत्सवी वर्ष. नंतरच्या काळात अभिषेकीबुवांच्या संगीताने गर्भश्रीमंती लाभलेल्या संगीत नाटकांना बहर आला. ‘ययाती आणि देवयानी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘धाडीला राम तिने का वनी’, ‘संत गोरा कुंभार’, ‘मीरा मधुरा’, ‘कट्यार काळजांत घुसली’ या नाटकांनी अभिषेकीबुवांना एक गुणाढ्य संगीत दिग्दर्शक म्हणून अमाप कीर्ती मिळवून दिली. नाट्यसंगीताचा अभिजात वसा आणि वारसा जोपासणार्‍या, वर्धिष्णु करणार्‍या मांदियाळीत मोजकीच नावे सुवर्णाक्षरांनी नोंदून ठेवावीत अशी आहेत. अण्णासाहेब किर्लोस्कर, भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, रामकृष्णबुवा वझे, मास्टर कृष्णराव यांनी आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेने नाट्यसंगीताच्या नंदनवनाची निगराणी आणि मशागत केली. अभिषेकीबुवांनी आपल्या सांगीतिक प्रतिभासामर्थ्याने या मांदियाळीत आपले नाव चिरस्थायी करून ठेवले आहे. मराठी संगीत रंगभूमीला लाभलेला मंगेशाचा स्वरप्रसाद म्हणजेच मा. दीनानाथ आणि पंडित जितेंद्र अभिषेकी. या दोन्ही युगप्रवर्तक गोमंतकीय सुपुत्रांचे स्मरण निरंतर प्रेरणादायी. ‘पिकतं तिथं विकत नाही’ अशी एक म्हण आहे. गोव्यातील संगीत रंगभूमीच्या उपासकांना ही म्हण तंतोतंत लागू पडणारी आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यसंगीत; ‘बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी’ हे भावगीत जणू माझ्या या विधानाला पुष्टी देणारे. पारिजातकाचे झाड गोव्यात, मात्र फुलांचा सडा आणि दरवळ शेजारच्या महाराष्ट्रात. हेच गोमंतकीय कलाकारांचे भागधेय म्हणता येईल. रामदास कामत, आशालता वाबगावकर, पं. प्रभाकर कारेकर (त्यांचे ‘प्रिये पहा’ हे नाट्यपद कोण विसरेल?) अजित कडकडे यांचा भाग्योदय झाला तो महाराष्ट्रात. ज्या कलाकारांना गोव्याची वेस ओलांडणे जमले नाही त्यांच्या गुणांची पारख झाली नाही. त्यांना पुरेशी मानमान्यता मिळाली नाही. मात्र त्यांच्या नावाचा ऋणनिर्देश करायलाच हवा. कविराज बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत ‘परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा- नाही पणती| तेथें कर माझे जुळती॥ ही या आठवामागची माझी भावना.
किर्लोस्करी नाट्यसंगीताचा वारसा चालवणारे रघुवीरदादा नमशीकर, मायलेकी चंपा पर्वतकर, सुरंगा पर्वतकर, गोव्याचे बालगंधर्व अशी ज्यांची ख्याती ते मास्टर काशिनाथ शिरोडकर, ललितकलादर्श नाट्यकंपनीत स्त्रीपार्टी म्हणून गाजलेले गोविंद माशेलकर, नानासाहेब शिरगोपीकरांच्या आनंद संगीत मंडळीत ‘भाव तोची देव’सारख्या भक्तिरसप्रधान नाटकात संत एकनाथांची भूमिका तन्मयतेने वठवणारे अनंतराव वेर्णेकर, मा. दीनानाथांचे साथीदार बाबी बोरकर व यशवंत विठ्ठल नाईक ऊर्फ वल्लेमाम, सावकारांच्या नाट्यसंस्थांतून नायिकेच्या भूमिका गाजवलेल्या मीनाक्षी शिरोडकर, सुरंगा पर्वतकर यांच्या सुकन्या अलका वेलिंगकर, गायकनट सर्वश्री जयकृष्ण भाटीकर, नरहरी वळवईकर, स्त्रीभूमिका वठवणारे पांडुरंग महाले, हौशी रंगभूमीचे शिलेदार व्यंकटेश अनंत पै रायकर, श्रीधर रावजी कुडाळकर ऊर्फ श्रीमेस्त, हंस संगीत मंडळीचे विश्‍वनाथ नाईक, तुळशीदास लोटलीकर, तातोबा वेलिंगकर आणि सुर्या वाघ, मा. दीनानाथांच्या गायकीचा वारसा जपणारे रामनाथ मठकर, बालगंधर्वांची गायकी समरसून आळवणारे गोविंदराव वेर्लेकर, गद्यनट श्रीरंग नार्वेकर, गजानन भर्तू, उत्कृष्ट हार्मोनिअमवादक सखारामपंत बर्वे, तळीराम, फाल्गुनराव या भूमिका अफलातून वठवणारे दामाजी कोसंबे, सव्यसाची नट आणि दिग्दर्शक मास्टर दत्ताराम, मास्टर गंगाराम, भिकु पै आंगले, दासराज तेलंग, सदाशिव बांदेकर, उत्तम सावर्डेकर, कृष्णा लक्ष्मण मोये, वसंतराव आमोणकर, नरेश आमोणकर, सोमनाथ पै धुंगट अशी ही श्रेयनामावली. ती पूर्ण नाही याची मला पुरेपूर कल्पना आहे. मात्र ‘मान ठेवी वडिलांचा’ या भावनेने मी केलेले हे गुणसंकीर्तन. तसा मी मूढमती. मात्र ‘फोडीलें भांडार| धन्याचा हा माल| मी तो हमाल भारवाही|’ हीच माझी ऐपत आणि भूमिका. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत ‘शाकुंतल’ या नाटकातील नांदीच्या शेवटच्या ओळी जरा आठवून पहा-
ईश वराचा लेश मिळे जरी| मूढ यत्न शेवटीं जातो॥
तसा हा प्रयत्न. पुन्हा वडीलधार्‍यांच्या शब्दांत ‘यत्न तो देव जाणावा’ या विनम्र भावनेने केलेला.
(संदर्भ सूची ः १. फुले वेचिता – लता मंगेशकर, २. स्वरसौहार्द – प्रभाकर जठार, ३. लाल शालजोडी जरतारी – केशव नारायण बर्वे.)