नाटकांचे दिवस

0
617

– संदीप मणेरीकर
याया अमरावती राज्यात पाऊल टाकताच मनाला किती आनंद झाला आहे.
आनंद झाला माझ्या मनाला
मोहुनी गेलो, या राज्याला’
भाईचं भाषण सुरू होतं. त्यानंतर गाणं सुरू होतं आणि त्यानंतर नाटकाला सुरूवात होते. मग मध्येच मी खलनायक किंवा राक्षस होऊन तलवार घेऊन येतो आणि मग आमची लढाई, त्यात अगोदर काही संवाद, आणि देव-दानव युद्ध होतं आणि त्यात राक्षस अर्थात दानव म्हणजे माझा मृत्यू. आणि या ठिकाणी नाटक संपतं. यात आमची सारी भावंडं कोण राणी, कोण दासी, कोण आणखी काही अशा रुपात वावरत असतात.
हे सारं काही प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच नाही. पण आमच पोफळीच्या, माडांच्या बागेत आम्ही सारी जण लहान असताना जमल्यानंतर हे नाट्य अवतरे. मग पोफळीची बाग हेच आमचं इंद्रप्रस्थ किंवा इंद्राची राजधानी अमरावती होत असे. एखादा उंच दगड हा किल्ला होत असे या युद्धाला कारण काहीही नाही. केवळ देव आणि दान यांच्यात युद्ध चालू असतं असं आम्ही लहान असताना वाचलेलं असल्यामुळे हे युद्ध केलं जात होतं. तसंच त्यावेळी आम्ही दशावतारी नाटकं मोठ्या प्रमाणात पहात होतो. मोर्ले गावात रामनवमीच्या दिवशी ऐतिहासिक नाटक केलं जात असे. यामुळे लढाई करण्याची खुमखुमी मोठी होती. त्यामुळे या सगळ्यांचा मिलाप होत लढाई करण्यासाठी दानव हे देवांवर हल्ले करत असत असा एक समज आमचा होता व त्यातून ही नाटकं केली जात असत.
नाटक हा कोकण परिसरातील लोकांचा जीव की प्राण. मग ते नाटक संगी नाटक असो किंवा दशावतारी नाटक. मालवणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेलं दशावतारी नाटक तर पाहण्यासाठी जीवाचं रान तेथील नागरिक करतात. गोव्याप्रमाणेच या कोकण परिसरात संगीत नाटकासाठी जीव ओवाळून टाकणारे काही नाट्यवेडे रसिक प्रेक्षक निर्माण झाले. कदाचित तीच आवड आमच्या रक्तात उतरी असावी. कारण नाटक हा येथील जमिनीचाच प्राण म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नाटक हाच या जमिनीचा संस्कार आहे. त्यामुळे आमच्याही अंगात ही नाट्यकला भिनली असावी.
असो, आम्ही करत असलेल्या या नाटकाला काळ-वेळ काहीही लागत नसे. चारजण जमा झालो की आमची नाट्यप्रतिभा स्फुरण पावत असे. नाटकासाठी संवादही पाठ करावे लागत नसत. ते दशावतारी नाटकं पाहून मनात तयार झालेले असत. त्यामुळे संवाद लिहिण्याचीही कधी कोणावर वेळ आली नाही. साधी सरळ हाताने उचलता येणारी अशी काठी ही आमची तलवार बनत असे. केव्हा केव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच सुरासूर युद्ध हा नाट्यप्रयोग करत असू. अर्थात त्यात नेहमीप्रमाणे राक्षसाचं काम मला मिळत असे. भाई आमच्या सगळ्यांत मोठा असल्यामुळे तो राजा होत असे. आणि मला तू विनोदी भूमिका छान करतोस म्हणून तू राक्षस किंवा दानव, खलनायक हो अशी माझी समजूत घातली जात असे. आणि मीही खलनायकाची भूमिका साकारत असे. परंतु विनोद आणि खलनायक यांचा काय संबंध आहे किंवा त्यांचा काहीच संबंध नाही हे मला त्यावेळी कधी कळलंच नाही.
केवळ आवड म्हणून मी अशा खलनायकी भूमिका करत होतो. माझ्या वाटेला कधीच राजाची किंवा हिरोची भूमिका आली नाही. अर्थात आम्ही ही नाटकं करत असताना वेशभूषा कधीच केली नाही. रंगभूषाही कधी केली नाही. आमचा भर पौराणिक कथा आणि ऐतिहासिक कथांवर असे. जागा पाहून आम्ही कथेचा विषय निवडत असू. संध्या, रुपा, वर्षा, पराग असे आम्ही नाटक करत असू. ऐतिहासिक नाट्यप्रयोगात अर्थात शिवाजी महाराजांची भूमिका ही साहाजिकच भाई आणि खान किंवा औरंगजेबाची भूमिका मला करावी लागत असे. आमच्या घरी बसस्टॉपवर वरच्या बाजूला एक डोंगर आहे. त्या डोंगरात एक मोठा खडक आहे. त्या खडकावर आम्ही बहुतेक हे नाटक करत असू. तो खडक हा आमचा राजगड, सिंहगड व्हायचा. आजूबाजूचा परिसर हा जावळीचं खोरं व्हायचा. झाडाझुडपातू शिवरायाची सेना लपायची आणि सरळ रस्त्याने माझी सेना ‘दीन दीन’ अशा आरोळ्या ठोकत यायची त्यावेळी ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करत मावळे झुडपातून माझ्या सेनेवर तुटून पडत आणि मग माझे सैनिक लगेच ‘भागो भागो’ असं म्हणून पळून जात. मी मात्र शिवरायांच्या ताब्यात सापडत असे. त्यावेळी आमची लढाई होई आणि माझा कोथळा बाहेर काढला जाईल.
चौथी-पाचवीच्या पुस्तकात वाचलेला इतिहास अशावेळी जागृत होई. ज्याचा परीक्षेत आम्ही कधी वापर केला नाही पण अशा नाटकात हमखास वापरला जात असे. अफजलखान-शिवाजी भेटीच्या वेळी अफजलखानाच्या तोंडी असलेला ‘या राजे, भेटा आम्हांला’ हा संवाद कोणी कोणास म्हटले या प्रश्‍नात कधी लिहिता आला नाही पण नाटकात हमखास अफजलखानाच्या तोंडी असे. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीचा अर्थ कधी आम्हांला कळला नाही पण या अपझलखान वधात ती म्हण आम्ही वापरत असू. त्याचप्रमाणे ‘आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे’ किंवा ‘गडावरचा दोर मी केव्हाच कापून टाकलाय. आता कड्यावरून उड्या मारून मरा किंवा शत्रूशी दोन हात करा’ हे संवाद आम्ही नाटकात चपखलपणे वापरत असू.
एखाद्या नाटकात ‘अरे पळून पळून पळणार कुठे? सरड्याची धाव कुंपणापर्यंतच ना?’ अशाप्रकारे म्हणींचा वापरही केला जात असे. त्या काळात नुकत्याच आलेल्या यशवंत रांजणकरांच्या संगीत अमृत मोहिनी नाटकाचाही आमच्यावर फार प्रभाव होता. ह्या नाटकातील बहुतेक गाणी व संवादही आम्हांला तोंडपाठ होते. याचं कारण आमच्या चुलत भावांनी, काकांनी ते नाटक स्वतः केलेलं होतं. त्यांची तालमी आमच्या शेजारच्या घरात चालत असत. सावंतवाडीला ते नाटक पहिल्यांदा झालं होतं, कंपनीचं. त्यानंतर त्या नाटकाचे खूप प्रयोग करण्यात आले. त्यामुळे आम्हांला त्यातील संवाद पाठ होते. त्यांचाही वापर बहुतेक करण्यात येत होता. वर्षा वगैरे सावंतवाडीतून आल्यानंतर त्यांचे काही वेगळे संवाद होते. ते संवादही आम्हांला नवीन काहीतरी शिकवून जात होते.
वायंगणात असलेल्या शेतातील माळ्यावरही आमचं नाटक चालत असे. हा माळा म्हणजे उन्हाळ्यात भाताची राखण करण्यासाठी घातला जातो. त्या माळ्यावर बसून ‘आम्ही हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ अशा विविध संवादांनी नाटक रंगवित असू. हा माळा गड, इंद्रप्रस्थ किंवा अमरावती व्हायची.
वह्यांच्या कागदांचे मुकूट तयार करायचे. मुकूट डोक्यावर घट्ट बसण्यासाठी त्याला पाठीमागून एक रबर लावला जात असे. तो कागद कोरा असेल तर त्यावर पेनाने नक्षीकाम केले जाईल. कमरेला तलवार अडकली जाई. कधी कधी राजे लोकांच्या मनगटावर बांधण्यात येत असलेल्या शेल्याप्रमाणे आम्ही मनगटावर सुपारीच्या झाडांच्या ‘पवल्या’ बांधत असू. नुकत्याच पाहून आलेल्या कुठल्यातरी दशावतारी नाटकातील पात्र मग आमच्यात संचारत असत. ‘हे राज्य आबादीआबाद करण्यासाठी….’ अशा संवादांनी नाट्यप्रयोग रंगत असे.
ही नाटकाची आवड एवढी होती पण कधी रंगमंचावर जाऊन नाटक करण्याचा योग आला नाही त्या काळात. शाळेत असताना दोन नाटकांत मला काम मिळालेलं होतं. त्यातील एक नाटक इयत्ता पाचवीत असताना मिळालं. मीही अगदी समरसून काम करण्याचं ठरवून मनापासून त्या नाटकातील संवाद पाठ करत होतो. मात्र एक दिवशी मला गुरूजींनी ते नाटक रद्द करण्यात आल्याची उद्घोषणा केली आणि रंगभूमीवरचं पदार्पण लांबलं. त्यांतर पुन्हा एकदा सातवीत आल्यानंतर मला गुरूजींनी संधी दिली. त्यावेळीही मी अशीच मनापासून भूमिका रंगवण्याचं ठरवलं पण त्यावेळीही गुरूजींनी उद्घोषणा करत नाटक रद्द केलं आणि पुुन्हा एकदा माझं पदार्पण लांबलं.
मात्र कॉलेज लाईफ, महाविद्यालयीन जीवनात मी आमच्या एनएसएसच्या विविध कार्यक्रमात नाटकं केली. पण प्राथमिक शाळेत असतानाची मजा या नाटकात नव्हती. त्यानंतर विविध प्रकारच्या भूमिका केल्या. आयुष्याच्या रंगमंचावरही विविध भूमिका साकारण्याची वेळ आली आणि नाटक म्हणजे खरं तर काय असतं याचा प्रत्यय येऊ लागला. नाटकातला अभिनय हा तीन तासांपुरता असतो पण वास्तवात मात्र आपल्याला आयुष्यभर कसला ना कसला अभिनय करावा लागतो हेच पुढे दिसून आलं.
हे नाटकाचे दिवस किती रम्य होते. आज ते दिवस आठवले की आपण काय गमावलं ते कळलं. आजच्या मुलांनाही ते सोन्याचे दिवस सापडणार नाहीत. कारण आजच्या मुलांचे खेळ वेगळे. काळाचा महिमा. दुसरं काय? पण ते सोन्याचे आमचे दिवस आता काही येणार नाहीत हीच खरी खंत आहे.