नागरी सेवा परीक्षा ः गोव्यातील तरुणांना आव्हान (civil services examination)

0
292

–  प्रा. नागेश सु. सरदेसाई

गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात फक्त १ किंवा २ गोवेकर तरुण आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. बनू शकलेले आहेत. आता बदलत्या काळात ही संख्या वाढेल अशी आशा आहे. प्रयत्न कायम ठेवा आणि यश पदरात पाडून घ्या. देशाची सेवा करण्याची ही एक सुंदर संधी आहे.

दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली या संविधानिक यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमी, भारतीय लष्कर अकादमी, इ. यांमध्ये सर्वांत महत्त्वाची आणि प्रतिष्ठित मानली जाणारी परीक्षा म्हणजे ‘नागरी सेवा परीक्षा’. या परिक्षेच्या गुणांवर केंद्र सरकारच्या अखिल भारतीय पातळीवरील नावाजलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा (इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस); भारतीय पोलिस सेवा (इंडियन पोलिस सर्व्हिस) तसेच विदेशी दूतावास सेवा (इंडियन फॉरेन सर्व्हिस). यांव्यतिरिक्त भारत सरकारच्या विविध सेवा उदा. रेल्वे, वित्त, डाक, दळणवळण इ. तसेच केंद्रशासित प्रदेशात प्रशासन आणि पोलिस सेवेसाठी जवळजवळ वीस सेवांचा समावेश आहे.

या परिक्षेला सर्वांत जास्त म्हणजे तीन ते चार लाख परिक्षार्थी दरवर्षी सामोरे जातात. ही परीक्षा दर वर्षी जून महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येते. यावर्षी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०३ मार्च २०२० ही आहे. सामान्य स्नातक या परिक्षेला बसू शकतो. त्यात वेगवेगळ्या विषयात प्राविण्य मिळवलेल्यांना संधी असते. इंजिनियर, सी.ए., डॉक्टर, वकील इत्यादी ज्ञान मिळवलेले तरुण-तरुणी परिक्षेला सामोरे जातात. या वर्षी फक्त ७९६ पदांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. वयोमर्यादा आयोगाने ठरविली आहे- २ ऑगस्ट २०२० रोजी वयाची २१ वर्षे पूर्ण केलेले तरुण-तरुणी परिक्षेस बसू शकतात. सर्वसामान्य वर्गासाठी, तसेच आरक्षित वर्गांसाठी किमान वयोमर्यादा आयोगाने ठेवली आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच दिव्यांगांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. परिक्षार्थींनी

ुुुर्.ीिील.र्सेीं.ळप

या संकेतस्थळावर जाऊन तपासणी करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर फक्त ५० रुपये शुल्क सर्वसामान्य आणि इतर मागासवर्गीय तरुणांकडून आकारण्यात येते. तरुणी तसेच अनुसूचित जाती-जमातींना शुल्कामध्ये सवलत आहे.
या परिक्षेला योग्य पद्धतीने आव्हान देण्यासाठी सर्वसामान्य वर्गाच्या परिक्षार्थींना चार वेळा परिक्षेला बसण्याची संधी (अटेम्प्ट्‌स) दिली जाते. इतर वर्गाच्या परिक्षाथींना सात वेळा तसेच अनुसूचित जाती-जमातींकरिता वयोमर्यादा ३५ वर्षांची देण्यात आलेली आहे. परीक्षा आव्हानात्मक असल्याने त्रिस्तरीय परीक्षा असते.

पहिला स्तर – विद्यार्थ्यांना दोन प्रश्‍नपत्रिका सोडवणे अनिवार्य असते. २०० गुणांच्या दोन प्रश्‍नपत्रिका या मल्टिपल चॉइस प्रश्‍नांच्या असतात व त्या दोन तासांमध्ये सोडवायच्या असतात. पहिली प्रश्‍नपत्रिका ही सामान्य ज्ञानावर आधारित असते व त्यात १०० प्रश्‍न असतात. हे प्रश्‍न संविधान, अर्थकारण, समाजकारण, वन्यजीव, इतिहास, भूगोल, तर्कशास्त्र इत्यादींवर आधारित असतात. दुसरी प्रश्‍नपत्रिका ही ऍप्टिट्यूड तपासण्यासाठी असते. यामध्ये गणित, तर्कशास्त्र, इंग्रजी भाषाप्रयोग इ.वर प्रश्‍न असतात. या दुसर्‍या प्रश्‍नपत्रिकेचे गुण दुसर्‍या स्तरावर जाण्यासाठी धरले जात नाहीत. फक्त पहिल्या प्रश्‍नपत्रिकेचे गुण मात्र महत्त्वाचे असतात कारण याच गुणांच्या आधारावर विद्यार्थी दुसर्‍या स्तरावर पोचतो.

दुसरा स्तर – यात आठ प्रश्‍नपत्रिका सोडवायच्या असतात. यात सर्व प्रश्‍नांची उत्तरे निबंध स्वरूपात द्यायची असतात. पहिले दोन पेपर्स हे इंग्रजी आणि दुसरी एक भाषा विषयाचे असून त्याला ३०० गुण असतात. त्यात फक्त उत्तीर्ण व्हायचे असते. गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी याचे गुण धरले जात नाहीत. ‘‘निबंध’’चा पेपर हा २५० गुणांचा असतो ज्यात दोन निबंध- प्रत्येकी १२५ गुणांचे लिहायचे असतात. याव्यतिरिक्त चार प्रश्‍नपत्रिका या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्‍नांच्या रूपात असतात. त्यामद्ये इतिहास- भारतीय व आंतरराष्ट्रीय; भारतीय संविधान; अर्थकारण; माहिती तंत्रज्ञान; स्टार्ट अप; भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती इ. विषयांवर आधारित प्रश्‍न विचारलेले असतात. ह्या पाच प्रश्‍नपत्रिकांशिवाय आणखी दोन प्रश्‍नपत्रिका एका विशेष विषयावर असतात. आयोगाने यासाठी वेगवेगळ्या ४८ विषयांची सुची दिलेली आहे.- त्यात विदेशी भाषा-साहित्य, संविधानातील भाषा-साहित्य, आणि इतर सर्व विषय- जसे राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अभियांत्रिकी, कायदा… इ.चा समावेश असतो. यांपैकी एका विषयाची निवड विद्यार्थ्याला करावी लागते. त्यात प्रत्येकी २५० गुणांच्या दोन प्रश्‍नपत्रिका असतात. ही परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या आसपास असते. या परिक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण होणार्‍या फक्त दोन ते तीनहजार विद्यार्थ्यांनाच तिसर्‍या चरणासाठी म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलावले जाते आणि त्यासाठी २७५ गुण असतात. या चाचण्या लोकसेवा आयोगाचे केंद्रीय कार्यालय, धोलपुर हाऊस, शाहजाह रोड, नवी दिल्ली येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. या व्यक्तिमत्त्व चाचण्या संविधानाने मान्य केलेल्या भाषांमध्येही देता येतात. उदा. गोव्याचे तरुण कोंकणी किंवा मराठीमध्ये दुसर्‍या व तिसर्‍या चरणातील चाचण्या देऊ शकतात. या परिक्षेचे आव्हान स्वीकारताना गोव्यातील तरुणांनी या गोष्टीची नोंद घेण्याची गरज आहे. यासाठी भाषांवर प्रेम केले व आवडीने काम केले तर तरुणांना काहीच अशक्य नाही. अखिल भारतीय पातळीवरील काही उदाहरणांवर नजर टाकली तर असे लक्षात येईल की कर्नाटकमधील डॉक्टर्स किंवा अन्य क्षेत्रातले तरुण कन्नड भाषेत किंवा महाराष्ट्रातले तरुण मराठी भाषेत ही परीक्षा देताना दिसतात.
या तिन्ही चरणांमधील परीक्षा आटोपल्यानंतर एक मेरीट लिस्ट म्हणजे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि परिक्षार्थींना एक ते अमुक अमुकपर्यंत स्थान देण्यात येते.

जवळजवळ १५० आय.ए.एस.; १५० आय.पी.एस.; ३० भारतीय विदेश सेवा तसेच बाकी केंद्र सरकारच्या ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीच्या विविध सेवांमध्ये तरुणांना रुजु करून घेतले जाते. अखिल भारतीय पातळीवर आय.ए.एस. तसेच आय.पी.एस.झालेल्या युवकांना एका विशिष्ट कॅडर (समूह किंवा गट) सेवेमध्ये पाठविण्यात येते.
गोवा राज्य हे क्षेत्रफळ तसेच लोकसंख्येच्या बाबतीतल तुलनेने लहान राज्य असल्याने- गोवा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि संघ प्रदेश (एजीएमयुटी) कॅडरमधील अधिकारी गोव्यात येतात. मोठी राज्ये, जसे महाराष्ट्र, पंजाब, केरळ, ओडिसा, तामिळनाडू, आसाम यांमध्ये प्रांतिय भाषांचा प्रयोग केला जातो, त्या राज्यांमध्ये या अधिकार्‍यांना ठराविक कालावधीमध्ये ती भाषा शिकणे अनिवार्य असते. उदा. केरळ कॅडरचा आय.ए.एस. अधिकारी मल्याळम भाषा शिकेल. गोव्यात हा उपक्रम राबवला जात नाही. कारण गोव्यात या अधिकार्‍यांना फक्त तीन वर्षांसाठी पाठवले जाते. नंतर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार बदल्या करण्यात येतात. या दृष्टीने जर विचार केला तर ‘गोवा कॅडर’ स्थापन होणे गरजेचे आहे. गोवा राज्य आता झपाट्याने बदलते आहे आणि लोकसंख्या तसेच अर्थकारण पाहता, प्रचंड बदल होताना दिसताहेत. भविष्यात जर गोवा कॅडरची निर्मिती झाली तर आम्हाला अखिल भारतीय स्तरावरून सक्षम तरुण गोव्याचा राज्यकारभार कोंकणी/मराठीतून करताना आपल्याला पाहायला मिळेल.

नागरी सेवा परिक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवेतील अधिकार्‍यांना मसुरी येथील लाल बहादूर अकादमीमध्ये वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते आणि त्याचा दर्जा वाढवण्यासाठी दिवसागणिक प्रयत्न केले जात आहेत. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सरदार पटेल अकादमी-हैदराबाद येथे तर विदेश सेवेतील अधिकारी दिल्ली येथील विदेश सेवा संस्थानात प्रशिक्षणासाठी पाठवले जातात. विशेष म्हणजे या अधिकार्‍यांना कोणत्याही एका विदेशी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य असते. भारताच्या सध्याच्या धोरणामध्ये बदल होऊन आता आमची राजदूत कार्यालये जवळजवळ २०० राष्ट्रांमध्ये स्थित आहेत. जगामधील भारताचे स्थान उंचावण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला आहे. नोकरशाही किंवा बाबुशाही ही प्रत्येक राष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा उचलते, हे लक्षात घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग आपल्या कार्यात बारकाईने लक्ष ठेवते. सरकारची वेगवेगळी धोरणे तसेच योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे ही आजच्या काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या एकूण ६०० वेगवेगळ्या योजना आज १३० करोड भारतियांपर्यंत पोहचवणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपला देश २०२२ सालापर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्स इतक्या अर्थकारण करण्याचा इच्छुक असेल तर सर्व भारतीयांनी आज सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे.

‘‘नागरी सेवा परीक्षा’’ आमच्या देशाच्या भवितव्यामध्ये मोलाची भूमिका बजावते. यामध्ये यशस्वी झालेले तरुण देशातील वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतात. दर वर्षी २१ एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्यक्षम अधिकार्‍यांचा या दिवशी सत्कार सन्मान केला जातो.

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यांचे वर्गीकरण करून एक अत्यंत मोलाची गोष्ट केलेली आहे. आपल्या देशात आज सातशेहून अधिक जिल्हे आहेत. यांपैकी ११२ जिल्हे हे मागासलेले असल्यामुळे त्यांना ऍस्पिरेशन्ड जिल्हे म्हणून संबोधित केले जाते. या जिल्ह्यांचा विकास जिल्हाधिकारी (कलेक्टर) तसेच जिल्हा पोलीस प्रमुख म्हणजे अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो.

आज आपला देश प्रगतीपथावर असून गोवा राज्यसुद्धा प्रगतीपथावर येणे फार गरजेचे आहे. यासाठी आपल्या तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेष म्हणजे कोंकणी भाषेतूनही नागरी सेवा परीक्षा दुसर्‍या स्तरावरून देता येते. तेव्हा गोव्याच्या तरुणाईसाठी कोंकणी/मराठीचा योग्य रीत्या वापर करून या परीक्षांना सामोरे जाणे कठीण नाही, असे समजून येईल. तरी गोव्याच्या तरुणांना आव्हान करावेसे वाटते की त्यांनी या परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन, मेहनत आणि जिद्द अंगिकारून कोंकणी/मराठी भाषेला सन्मान मिळवून द्यावा. त्यासाठी सर्व युवकांनो ३ मार्च ही अंतिम तिथी आहे. या परीक्षेला सर्वजण सकारात्मक रीतीने सामोरे जा, यश तुमचेच आहे! गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात फक्त १ किंवा २ गोवेकर तरुण आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. बनू शकलेले आहेत. आता बदलत्या काळात ही संख्या वाढेल अशी आशा आहे. प्रयत्न कायम ठेवा आणि यश पदरात पाडून घ्या. देशाची सेवा करण्याची ही एक सुंदर संधी आहे व ती सोडू नये असे मला वाटते. शिक्षण क्षेत्रात प्रगतीशील असलेला गोवा आता देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल, अशी आशा व प्रार्थना!!