‘नाईक’ आडनाव बदलण्यास भंडारी समाजाची तीव्र हरकत

0
503

>> समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल भंडारी समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व परराज्यातून येऊन गोव्यात स्थायिक होणारे काही बिगर गोमंतकीय आपले आडनाव बदलून ‘नाईक’ अशी दुरुस्ती करून घेऊ लागले असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले. नाईक हे भंडारी समाजाचे एक प्रमुख आडनावांपैकी एक असून ओबीसींना मिळणारे लाभ मिळवण्यासाठी हे लोक नाव बदलत असावेत अशी शंका त्यांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली.

ह्या लोकांमुळे राज्यातील भंडारी समाजाची प्रतिमाही खराब होण्याचा धोका आहे. या लोकांना अशा प्रकारे नावे बदलण्यास मुभा मिळू नये यासाठी सरकारने ‘गोवा नावे व आडनावे कायदा १९९०’ मध्ये बदल घडवून आणावा, अशी मागणी भंडारी समाजाने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली. गोव्याबाहेर जमलेल्याना गोव्यात येऊन अशा प्रकारे नावे बदलता येणार नाहीत, अशी दुरुस्ती ह्या कायद्यात केली जावी, अशी मागणी सदर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केली आहे.