नव वर्षात पेट्रोल महागले

0
249

>> विना अनुदानित सिलिंडर १९ रु. नी महागला

नवीन वर्षात पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ५९ पैसे एवढी वाढ झाली आहे. राज्य सरकारने व्हॅटमध्ये १ टक्के वाढ केली आहे. राज्य सरकारकडून २० टक्के व्हॅट आकारला जात होता.

१ जानेवारी २०२० पासून व्हॅट २१ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात ५९ पैसे एवढी वाढ झाली आहे. पणजीत पेट्रोलचा दर आता ७१.७३ पैसे असा झाला आहे. ३१ डिसेंबरला पेट्रोलचा दर ७१.२५ पैसे एवढा होता.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यावसायिक कर खात्याच्या अधिकार्‍यांसमोर घेतलेल्या बैठकीत सरकारी तिजोरीतील महसूल वाढविण्यासाठी व्हॅटमध्ये १ टक्का वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विना अनुदानित सिलिंडरच्या दरात १९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने वाहन उद्योगाला दिलेली रस्ता करातील ५० टक्के सवलतीची मुदत संपली आहे. १८ ऑक्टोबर २०१९ पासून नवीन वाहनांवरील रस्ता करात ५० टक्के सूट देण्यास प्रारंभ करण्यात आला होता.

सर्वसामान्यांना बसणार दर वाढीची झळ ः दिगंबर

नवीन वर्षात नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागले आहे. पेट्रोलच्या दरात झालेल्या दरवाढीची झळ सामान्य नागरिकांना बसणार आहे. सरकारी यंत्रणा दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरली आहे. वाढत्या महागाईमुळे घरगुती खर्चाचे अंदाजपत्रक कोसळत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.