नव्या समीकरणांकडे

0
95

दहशतवादाने खदखदत्या काश्मीरमध्ये पुन्हा एकवार नव्या सरकारच्या स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत. भाजपाने मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीपासून काडीमोड घेतल्यानंतर राज्याचा ताबा तूर्त राज्यपाल नरेंद्रनाथ वोहरा यांच्याकडे जरी सोपवण्यात आलेला असला, तरी ही व्यवस्था काही कायमस्वरुपी ठरू शकत नाही. पुन्हा मध्यावधी निवडणुका घ्यायचे म्हटले तर त्यासाठी अनुकूल वातावरण राज्यात नाही. अशा परिस्थितीत मुफ्ती आणि अब्दुल्ला या दोन्ही घराण्यांना बाजूला ठेवून भाजपाच्या मदतीने नवे सरकार घडवण्याचे मनसुबे पीडीपीमधील बंडखोर रचू लागले आहेत. मेहबुबांची सत्ता गेल्यापासून त्यांच्या पीडीपीमध्ये बंडाचे वारे वाहू लागलेले दिसू लागले. झाडीबलचे आमदार आबिद हुसेन अन्सारी यांनी मेहबुबा यांच्या विरोधात पहिल्यांदा उघडपणे बंडाची निशाणी रोवली. त्यांचे पुतण्ये आणि पट्टनचे आमदार इम्रान अन्सारी आणि तंगमर्गचे आमदार मोहंमद अब्बास वाणी हेही त्यांना येऊन मिळाले. आणखी अनेक जण त्यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्कात येऊ लागले आहेत. मेहबुबांनी सत्तेच्या आडून घराणेशाही राबवल्याचा ठपका या बंडखोरांनी ठेवला आहे. सत्तेवर येताच मेहबुबांनी पक्षामध्ये आणि सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर आपल्या नातलगांना आणले होते असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते खरेही आहे. मेहबुबांचे काका पीडीपीचे उपाध्यक्ष आहेत आणि भाऊही पक्षामध्ये महत्त्वाचा नेता बनला आहे. सरकार असतानाही याबाबत पक्षामध्ये अस्वस्थता होतीच. आता ती मुखर झाली आहे एवढेच. बंडाचा झेंडा रोवणारे अन्सारी शिया मुसलमान आहेत हेही येथे लक्षात घ्यायला हवे. काश्मीर खोर्‍याच्या उत्तर भागातून हे बंडखोरीचे वारे वाहते आहे. पीडीपीने भाजपाशी हातमिळवणी करून सरकार घडवल्याने दक्षिण काश्मीरमध्ये तीव्र नाराजी आहे. तो सारा भाग दहशतवाद्यांचा अड्डा गणला जातो. बहुतांशी चकमकी ह्या तेथेच झडत असतात. पीडीपीमध्ये बंडाळी दिसत असली तरी जम्मू काश्मीर विधानसभेची एकूण रचना लक्षात घेता, या बंडखोरांना खुद्द पीडीपीतील नेमक्या किती मंडळींची साथ असेल हे अद्याप स्पष्ट नाही. आपल्यामागे पक्षाच्या २८ पैकी बहुसंख्य आमदार आहेत असा त्यांचा दावा असला तरी पाच सहा आमदार सोडल्यास अद्याप कोणी उघडपणे समोर आलेले दिसत नाही. जम्मू काश्मीरमध्ये पक्षांतरबंदी कायदा कडक आहे हेही त्याचे कारण आहे. भाजपाने आपल्यावर पीडीपीमध्ये फूट पाडल्याचा ठपका ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येऊ नये, घोडेबाजाराचा आळ येऊ नये यासाठी विलक्षण चातुर्याने पावले टाकलेली दिसतात. त्यांना काश्मीरमध्ये नव्या राजकीय समीकरणांसाठी सज्जाद गनी लोनच्या रूपाने मोहरा सापडला आहे. सज्जाद लोन हा मोदींचा प्रशंसक आहे हे जगजाहीर आहे. त्याच्या पीपल्स कॉन्फरन्सचे दोन आमदार असले तरी पीडीपीमधील बंडखोर गट त्या पक्षात विलीन करण्याचा पर्याय भाजपा आजमावू शकते. जम्मू काश्मीर विधानसभेचे सभापती तर भाजपचेच आहेत. ते पीडीपीमधील बंडखोरांच्या स्वतंत्र गटाला वेगळी मान्यता देऊ शकतात किंवा अशा विलीनीकरणाला मान्यता मिळण्यातही त्यांच्यामुळे अडचण येणार नाही. प्रश्न एवढाच आहे की हा सगळा खटाटोप भाजपासाठी कितपत लाभदायक ठरेल! जम्मू काश्मीरची संवेदनशीलता लक्षात घेता संपूर्ण देशाचे तेथील घडामोडींकडे लक्ष असते. त्या राज्याला केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्व नाही, तर त्याहून अधिक महत्त्व राष्ट्रहिताच्या दृष्टीने आहे. काश्मीरच्या राजकीय व्यवस्थेशी छेडछाड करताना ती अतिशय काळजीपूर्वक केली गेली नाही तर त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू शकतात. शेवटी काश्मीरमधील सत्तेपेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे आहे आणि याची जाणीव सदैव जागी ठेवणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीनंतर पीडीपीसमवेत तेथे सरकार स्थापन करून राष्ट्रविरोधी शक्तींना मास्टरस्ट्रोक लगावला होता, परंतु दुर्दैवाने तो सारा प्रयोग पूर्णपणे फसला. भाजपची प्रतिष्ठाच पणाला लागल्याचे दिसू लागताच शेवटी पीडीपीशी काडीमोड घेणे त्याला भाग पडले. पक्षाचा तो निर्णय वादग्रस्त ठरला, कारण अशा वेळी भाजपाने सरकारमधून अंग काढून घेतले, जेव्हा काश्मीरला सरकारची खरोखर आवश्यकता होती. दहशतवादाने ग्रस्त काश्मीरला वार्‍यावर सोडण्याचा भाजपचा हा निर्णय म्हणूनच टीकेचा विषय ठरला. आजही काश्मीरमध्ये तीव्र अशांतता आहे. तेथे राजकीय व्यवस्था पूर्ववत प्रस्थापित करायची असेल तर काश्मीरला खरोखरच एका चांगल्या, कार्यक्षम प्रशासनाची आत्यंतिक आवश्यकता आहे. केंद्र सरकार काश्मीरला मदत करण्यास उत्सुक आहे. ते त्या राज्याला निधीची ददात भासू देणार नाही. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आवश्यक असलेला कणखरपणाही सध्या दिसतो आहे. अशा वेळी गरज आहे ती खोर्‍यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्याची. दहशतवाद्यांवर सतत वरचढ राहून आणि काश्मीरच्या विकासासाठी, रोजगारसंधींसाठी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे कार्यरत राहूनच तेथील लोकांची मने जिंकता येऊ शकतात.