नव्या मांडवी पुलाच्या खांबाला अचानक आग

0
119

येथील मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या बांधकाम सुरू असलेल्या ३३ व्या खांबाला काल दुपारी २ च्या सुमारास लागली. मात्र, अग्निशामक दलाच्या जवांनानी आग वेळीच विझविल्याने धोका टळला. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून कंत्राटदाराला खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. तसेच आगीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.

पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वीज केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने खांबाच्या क्युरींगसाठी वापरण्यात आलेल्या हेसियन कापडाला आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग ताबडतोब आटोक्यात आणल्याने धोका टळला, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी या पुलाच्या खांबाचे वेल्डिंगचे काम करताना एका कामगाराचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला होता. महिनाभरापूर्वी पुलाच्या ठिकाणी कामासाठी वापरण्यात आलेली क्रेन नदीच्या पात्रात कोसळून अपघात झाला होता. खांबाला आग लागली त्यावेळी तेथे कामगार नव्हते, असा दावा केला जात आहे.

पुलाच्या खांबाला आग लागल्याची माहिती मिळताच पणजी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे पाण्याचा बंब घटनास्थळी नेण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.