नव्या पीडीएसंदर्भात चर्चा करूनच निर्णय : सरदेसाई

0
66

कुठे कुठे नव्या पीडीएची गरज आहे त्यासंबंधी नगर आणि नियोजन मंडळाच्या बैठकीत चर्चा करून त्यासंबंधी योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नियोजन म्हणजे खेळ नव्हे. त्यामुळे कुणी मागणी केली म्हणून कुठल्याही भागासाठी नवी पीडीए स्थापन करता येणार नाही असे मगो पक्षाने फोंडा व पेडणे येथे नव्या पीडीए स्थापन करण्याची जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी विचारले असता सरदेसाई म्हणाले. मगो पक्षाला जर पेडणे व फोंडा भागासाठी नव्या पीडीए हव्या असतील तर पक्षाचे नेते मंत्रिमंडळ बैठकीत त्याविषयी का मागणी करीत नाहीत असा सवाल सरदेसाई यांनी यावेळी केला. उद्या जर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची रस्ते व पाणी या तत्वावर विभागणी करण्याची मागणी केली तर ती मान्य करण्यात येईल काय, असा सवालही यावेळी सरदेसाई यांनी केला. गोव्याचा नियोजनबद्धरित्या विकास करणे हे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री या नात्याने आपले कर्तव्य आहे व त्यादृष्टीनेच आपले प्रयत्न सुरू असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.