नवे चेहरे

0
104

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. एकूण ५२८८ उमेदवारांमधून नवी पंचमंडळी आता निवडली जातील. महात्मा गांधींनी पाहिलेल्या ग्रामस्वराज्याचा मार्ग ह्या ग्रामपंचायतींमधूनच जातो. त्यामुळे विकासाची दृष्टी असलेले प्रामाणिक जनसेवक या सगळ्या पंचायतींवर निवडून यावेत आणि त्यांनी गोव्याच्या खेडोपाडी विकासाचे नवे पर्व सुरू करावे अशी अपेक्षा आहे. पंचायतराज व्यवस्थेविषयी आजवर खूप काही बोलले गेले, परंतु प्रत्यक्षात ही व्यवस्था जेवढी प्रभावी बनायला हवी होती तेवढी बनली नाही. आजही विकासाची गंगा वरून खाली अशी उलटीच वाहात असते. विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच राज्याचे तारणहार अशा प्रकारची धारणा बनून गेलेली आहे. परंतु खरे तर गावोगावचे पंच, सरपंच हे विकासाचा खरा पाया रचत असतात. त्यांची कल्पकता, त्यांची दूरदृष्टी यातून गावाच्या विकासाचे बीज रोवले जाऊ शकते. दुर्दैवाने पंचायतींवर निवडून येणारी मंडळी गावच्या विकासाऐवजी स्वविकासाला प्राधान्य देतात आणि त्याचा परिणाम म्हणून स्वार्थाची बजबजपुरी माजते. अनेक पंच – सरपंच निवडून येताच गब्बर कसे बनतात, त्यांचे बंगले कसे उभे राहतात आणि त्यावर अल्पावधीत संगमरवर कसा चढतो हा प्रश्न जनतेला पडत असतो. दुसरीकडे, केवळ जनसेवेसाठी पंचायतीच्या राजकारणात उतरणारी आणि सेवाव्रत म्हणून राजकारणाकडे पाहणारी मंडळीही अनेक आहेत. पंचवीस पंचवीस वर्षे पंचायतीच्या राजकारणात राहूनही सच्छील आणि सदाचारी राहिलेली माणसेही गोव्यात पुष्कळ आहेत. परंतु आता काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळासरशी नवी राजकीय संस्कृती पंचायत पातळीवरही झिरपलेली आहे. त्यात अलीकडे राजकीय मंडळी आपापल्या पंचायतींवर आपला राजकीय वरचष्मा ठेवण्याचा आटापिटा करीत असतात. अशा राजकारण्यांचे बगलबच्चे मग पंचायती आपल्याला आंदण मिळाल्यागत तेथे धुमाकूळ घालतात. अशा प्रवृत्तीला दूर सारण्यात मतदारांना यावेळी यश येते का हे पाहावे लागेल. महिलाही आज पंचायत राजकारणात हिरीरीने पुढे येताना दिसतात, परंतु महिलांसाठीच्या प्रभाग आरक्षणामुळे हा सहभाग असतो की खरोखर स्त्रियांनाही गावच्या विकासात रस निर्माण झाल्याने त्या निवडणुकीत उतरतात हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सरपंच पती’ संस्कृतीवर टीकास्त्र सोडले होेते. पत्नीच्या नावे पतीनेच कारभार पाहण्याचे प्रकार गोव्यातही सर्रास घडायचे. या निवडणुकीनंतर तरी अशा प्रकारांना पूर्ण आळा बसायला हवा. गोव्यातील पंचायतींचा सुवर्णमहोत्सव काही काळापूर्वी ताळगावात साजरा झाला होता. गावच्या विकासाचा मास्टरप्लॅन बनवावा, सरकार सर्वतोपरी साह्य देईल अशी ग्वाही त्यात देण्यात आली होती. आता नव्याने निवडून येणार्‍या पंचमंडळींनी क्षुल्लक राजकीय मतभेद बाजूला सारून एकदिलाने गावच्या विकासासाठी झटावे, गावाला नेमकी कशाची गरज आहे ते पाहावे, गावच्या समस्यांचा आढावा घ्यावा आणि कल्पकता आणि परिश्रमाद्वारे गावच्या विकासाचे नवे रोप लावावे. गोव्यातील गावांचे झपाट्याने शहरीकरण होत चालले आहे. पण त्यासरशी गावे बकालही होत चालली आहेत, अनेक समस्यांचा विळखा पडू लागलेला आहे. पाण्याचा प्रश्न, कचर्‍याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न असे अनेक नवे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. अशावेळी पंचायतींनी जर निर्धार केला, तर गावचे प्रश्न धसास लागू शकतात, समस्यांचे निराकरण होऊ शकते. दुर्दैवाने पंचायत निवडणुकीत उतरणार्‍या उमेदवारांपाशी अशा दृष्टीचाच अभाव दिसतो. निदान या निवडणुकीतून नव्याने निवडून येणार्‍या मंडळींनी हे चित्र बदलेल अशी आशा करूया.