नवे आकलन

0
183

कोरोनाचा धोका जगाला कळला त्याला आता सहा महिने उलटून गेले आहेत. एखादी गोष्ट जेवढी जुनी होते, तेवढी तिच्याविषयी अधिकाधिक माहिती आपल्याला कळत असते. कोरोनाच्या बाबतीतही तसेच झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संक्रमणाबाबत आजवर जे सांगितले आहे, त्याहून हे संक्रमण अधिक जटिल असल्याचे जगाला एव्हाना जाणवू लागले आहे. नुकतेच ३२ देशांतील २३९ वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला खुले पत्र लिहून कोरोना हा हवेतल्या हवेत देखील संक्रमित होऊ शकतो असा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे विषाणू हे बाधित व्यक्तीचे खोकणे, शिंकणे, बोलणे यावेळी एक – दीड मीटर अंतरापर्यंतच्या पृष्ठभागावर उसळणार्‍या तुषारांतून पसरतात असे आजवर सांगितले होते. ‘दो गज दूरी’चा आग्रह त्यासाठीच धरला गेला. हे सामाजिक अंतर पाळणार्‍यांच्या, वारंवार हात धुणार्‍यांच्या आणि मास्क वापरणार्‍यांच्या वाटेला कोरोना जाणार नाही असे जागतिक आरोग्य संघटना सांगत आली. मात्र, कोरोनाचे विषाणू हे हवेतल्या हवेत तरंगत राहू शकतात आणि खोलीभर पसरलेले असू शकतात आणि श्वसनावाटेही ते इतरांच्या शरीरात प्रवेश करू शकतात असे वरील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. अर्थात, जागतिक आरोग्य संघटनेला अद्याप हे मान्य नाही, परंतु कोरोनाचा ज्या प्रचंड प्रमाणात फैलाव जगभरात झाला आहे, तो पाहता ही शक्यताही अगदीच झटकून टाकता येत नाही. खरोखरच हवेतल्या हवेत संक्रमण जर होत असेल तर ते अधिक चिंताजनक ठरेल व त्यापासून बचावही तितकाच दुरापास्त ठरेल हेही तितकेच खरे आहे.
कोरोनासंदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे जे लोक यातून बरे होतात, त्यापैकी अनेकांची गंधसंवेदनाच कायमची नाहीशी झालेली दिसून आली आहे. त्यांना कसला वासच येत नाही. याला इंग्रजीत ‘ऍनॉस्मिया’ असे म्हणतात. कोरोनाबाबत असे अधिकाधिक आकलन दिवसेंदिवस जगाला होऊ लागले आहे. त्याचा नायनाट करणे मात्र अद्यापही शक्य झालेले नाही.
नुकत्याच भारतामध्ये त्यावरील लस विकसित होत असल्याच्या व आयसीएमआरने त्यासाठी १५ ऑगस्टची मुदत दिलेली असल्याच्या बातम्या आल्या. केंद्र सरकारच्याच विज्ञान मंत्रालयाने मात्र ही लस २०२१ पर्यंत येणे शक्य नसल्याचे म्हटले. त्यावरून वाद उसळला. एखादी लस प्रत्यक्षात वापरात आणण्यापूर्वी ज्या विविध प्रक्रिया असतात, त्या पूर्ण न करताच ती आणण्याची घाई करणे घातक ठरू शकते. लाल फितीची प्रक्रिया टाळणे इथपर्यंत ठीक, परंतु पंधरा ऑगस्टचा आयसीएमआरचा आग्रह निव्वळ राजकीय कारणांखातर असेल तर ते गैर आहे. जीवन-मरणाच्या या विषयामध्ये तरी राजकारण आणले जाऊ नये.
भारतामध्ये सध्या सात लाख कोरोनाबाधित आहेत. दिवसाला त्यात नव्या पंचवीस हजारांची भर पडणे हे काही चांगले चिन्ह नव्हे. वीस हजार लोकांचा आजवर बळी गेला आहे. त्यातून बरे होणार्‍यांचे प्रमाणही अर्थात मोठे आहे. वरील सात लाखांपैकी सव्वा चार लाख लोक आजवर बरेही झाले आहेत. परंतु त्याचा फैलाव मात्र आपल्याला अजूनही रोखता आलेला नाही ही खरी चिंतेची बाब आहे.
कोरोनाचा फैलाव वाढत राहील. मग तो शिखर गाठेल आणि नंतर हळूहळू त्याचे प्रमाण खाली खाली येत जाईल असे अंदाज संख्याशास्त्रज्ञांनी वर्तवलेले होते. परंतु तसे काही घडताना दिसून येत नाही. कोरोनाचा चढता आलेख चढताच राहिला आहे. संख्याशास्त्रीय अनुमाने वैद्यकीय गोष्टींमध्ये बरोबर ठरतातच असे नाही. त्यामुळे राज्यातील विद्यमान परिस्थितीसंदर्भातही अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करणे योग्य ठरणार नाही.
गोव्यापुरता विचार करायचा तर सध्याचे रुग्णांचे प्रमाण दर दहा लाखांमागे ११४४ रुग्ण असे पडते. बरे होणार्‍यांचे प्रमाण वाढून आता ते ५३ टक्क्यांवर आलेले आहे. होणार्‍या कोविड चाचण्यांचा विचार केला तर दहा लाख लोकसंख्येमागे ४९२१५ असे चाचण्यांचे प्रमाण आहे. मात्र, कोरोनाचा फैलाव आपल्याला रोखता आला नाही आणि कंटेनमेंट झोनचे नीट व्यवस्थापनही आपल्याला जमलेले दिसत नाही. ‘कोरोनाला घाबरण्याची गरज नाही’ असे सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांना ‘कोरोनाला लोक का घाबरत नाहीत’ असे विचारण्याची वेळ यावी एवढी राज्यातील कोरोना फैलावाची स्थिती चिंताजनक झालेली आहे. ती नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पर्यटकांना दारे खुले करण्याची घाई महाग पडू शकते. सरकारने जरा आपली प्राधान्ये तपासावीत. दिशा चुकत असेल तर बदलावी.