नवी शिक्षण प्रणाली गरजेची

0
234
  •  प्रा. नागेश म. सरदेसाई

शिक्षण प्रशासन, अध्यापन, पालक आणि समाज या सर्व घटकांनी एकत्र येऊन एक नवी योग्य शिक्षण प्रणाली तयार करणे आता महत्त्वाचे ठरेल. त्यातूनच शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजाचा उत्कर्ष होईल, याबद्दल दुमत नसावे!

आज कोविद-१९ ने विश्‍वांत मोठ्या प्रमाणावर माणसांचे जीवन चलबिचल करून ठेवले आहे. जवळजवळ सर्व अर्थकारण ठप्प झालेले आहे. त्यात शेती, पर्यटन, उद्योग, दळणवळण इत्यादींचा समावेश आहे. माणसाचे जीवन याव्यतिरिक्त शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रावर बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. भारतामध्ये २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे शिक्षणाची व्यवस्था उध्वस्त झालेली आपल्याला दिसते. परिक्षांचं सत्र सध्या स्थगित अवस्थेत आहे.

१०वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर इत्यादी परीक्षा आज स्थगित झालेल्या आपण पाहतोय. याशिवाय स्पर्धा परिक्षांचे सत्र जे नेहमी आपल्या देशात एप्रिल महिन्यानंतर सुरू होते, त्यावरसुद्धा अंकुश बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर जर एक नजर टाकली तर आपल्याला यातून सुटण्याचा मार्ग काढणे कठीण दिसते. भारत देशामध्ये नवीन वर्षाचे शैक्षणिक सत्र जून-जुलै महिन्यांनंतर सुरू होतात. शाळा, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षणाचे वर्ग यावर्षी नेहमीच्या शालेय वर्षाप्रमाणे सुरू होतील का? आणि जर झाले तर ते केव्हा होतील?… हा मोठा प्रश्‍न शिक्षण व्यवस्थापन, प्रशासक तसेच शिक्षणतज्ज्ञांना आज भेडसावत आहे.

ब्रिटीशांचा काळ आणि त्यापूर्वीच्या काळात आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारांनी शिक्षण दिले जात होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या २१व्या शतकात आज आम्ही इंटरनेटचा प्रयोग करून आधुनिक तंत्र ज्याला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असे म्हणतात यांच्याद्वारे करतो आहोत. त्यात शाळा- महाविद्यालयांमध्ये स्मार्टक्लासेसचा समावेश झालेला आम्ही पाहतो. हा सर्व औपचारिक शिक्षणाचा प्रकार आहे. मुले, शाळा, अध्यापक इत्यादी गोष्टींचा समावेश असलेले शिक्षण आज एका मोठ्या चिंतादायक स्थितीत पोचले आहे.
ऑनलाईन शिक्षण किंवा संगणकाचा उपयोग करून शाळेमध्ये न येता शिक्षण आणि तेही गुणात्मक आणि दर्जेदार असे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, हा या संकल्पनेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. जर शिक्षण ऑनलाईन झालं, तर किती वेळासाठी? कुणासाठी? केवढं … या वेगवेगळ्या प्रश्‍नांना उत्तर देणे कठीण गोष्ट आहे. आज आम्ही नर्सरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच उच्चतर शिक्षण ६० ते ७० टक्के औपचारिकरीत्या घडवून आणतो. जवळपास १५ ते २० टक्के शिक्षण ऑनलाईन पद्धतीने मिळवण्याचा ध्यास जर घेतला तर ते कोणत्या प्रकारे मुलांसमोर मांडायचे यावर निर्णय होणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण हेसुद्धा गुणात्मक आणि दर्जात्मक असणे तितकेच महत्त्वाचे आहे व त्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आज जर विश्‍वातील प्रगत देशांमध्ये म्हणजेच अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण ऑनलाईन पद्धतीमध्ये घेण्याची व्यवस्था उपलब्ध आहे तर त्यात किती वेळ ऑनलाईन शिक्षण घ्यावे व त्याचे स्वरूप कसे असावे यावर निर्णय झालेला आहे. जगातल्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ऑनलाईन शिक्षण हे दिवसातील एक ते दीड तास देणे यात एकमत आहे. पण आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये तर ६-६ तास मुले शाळेमध्ये असतात आणि शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना खेळ, कौशल्य इत्यादींचा अनुभव दिला जातो.

आजच्या कोविद-१९ मुळे बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला भारत देशात ऑनलाईन शिक्षणाच्या व्याख्या निश्‍चित करणे हे फार आवश्यक कार्य करणे आहे. आजचं आपलं शिक्षण परिक्षेची तयारी आणि गुण कमविणे यावरच आधारलेलं आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीमध्ये घेऊन मुलांना गुण देऊन त्यांचे भवितव्य ठरविण्याचा हा एक मार्ग असतो पण आता आम्ही ऑनलाईन शिक्षणाच्या सीमा निश्‍चित करणे आवश्यक आहे. आपल्या या खंडप्राय देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणे ही या शिक्षणाची मोठी गरज आहे. गोवा राज्यातसुद्धा कनेक्टिव्हिटीच्या फार समस्या दिसून येतात. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या सर्व कुटुंबांची स्थिती लॅपटॉप किंवा संगणक खरेदी करण्यासारखी आहे की नाही हे पाहणेसुद्धा गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संगणक शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे ही आजच्या काळाची गरज आहे.

वरील सर्व प्रश्‍नांना योग्य उत्तरे मिळणे अत्यंत गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व शिक्षकांपर्यंत ठीकठाक पोचविणे ही गरजेची बाब आहे. संगणक प्रशिक्षण तसेच ऑनलाईन शिक्षण यात अंतर आहे. शिक्षणप्रणालीमध्ये एका शिक्षकाला संगणक प्रशिक्षित करणे याचा विचार करून योग्य पद्धतीने संगणक शिक्षण राबविणे गरजेचे आहे. आज शिक्षण खात्यातर्फे शिक्षक प्रशिक्षण सुरू असलेले आम्हाला दिसते. पण त्या प्रशिक्षणामध्ये योग्य प्रकारे हे सर्व काम केले जात आहे की नाही, असा प्रश्‍न येतो. प्रशासकीय व्यवस्थेला मान देऊन, शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा समावेश योग्य रीत्या होणे गरजेचे आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संगणक प्रशिक्षण पद्धतशीररीत्या व्हायचे असेल तर त्याला नियोजनाची गरज आहे. नियोजनाचा अभाव असेल तर कुठलीही नवीन प्रणाली घडवून आणणे अशक्य आहे. शिक्षणव्यवस्था सुचारुपणे चालण्यासाठी आज प्रशासन व्यवस्थेने आपले कर्तव्य समजून या प्रशिक्षणाला योग्य चालना देण्याची गरज आहे. याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही. ऑनलाईन संगणक प्रशिक्षण मुलांपर्यंत पोचवणे जरी आवश्यक असले तरीसुद्धा ‘नियोजना’शिवाय त्यात यश मिळणे शक्य दिसत नाही.
शिक्षण क्षेत्रात वावरणार्‍या मान्यवरांसोबत बसून जागतिक समस्यांचा अभ्यास करून नियोेजन करणे गरजेचे आहे.

आजच्या काळाची गरज जरी ऑनलाईन संगणक शिक्षण असली तरीसुद्धा ते फक्त ज्ञानाचे भांडार वाढविण्यापुरतेच नसावे तर मुलाला एक उत्तम नागरिक बनविण्याची गरजही त्यातून पूर्ण व्हावी. आजचे हे २१वे शतक हे संगणक युग असून आज शिक्षण हे वेगवेगळ्या पोर्टलद्वारे घेणे शक्य आहे. तरीही मुलांची क्षमता पाहून योग्य शिक्षण ‘ऑनलाईन प्रणालीमध्ये’ देणे हे एक आव्हान असणार आहे. त्याचबरोबर जीवनात नीतिमूल्ये जपणे, वृत्ती चौकस ठेवणे आणि आजच्या समाजासाठी उपयोगी ठरणे ही काळाची गरज आहे. २-३ महिन्यांनी आपली शिक्षणप्रणाली थोडी मागे राहिली, तर त्याने विशेष फरक पडणार नाही. फक्त त्यासाठी गरजेनुसार शिक्षण देऊन त्यांना या महामारीच्या काळात योग्य दर्जेदार जीवनाचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे.

या महामारीच्या काळात आम्ही सर्व एकसंघ होऊन शिक्षण या शब्दाचा खरा अर्थ समजून घेणे हिताचे ठरेल. अन्यथा फारसा बदल होणार नाही व प्रयत्न निष्फळ ठरतील. शिक्षण प्रशासन, अध्यापन, पालक आणि समाज या सर्व घटकांनी एकत्र येऊन एक नवी योग्य शिक्षण प्रणाली तयार करणे आता महत्त्वाचे ठरेल. त्यातून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजाचा उत्कर्ष होईल, याबद्दल दुमत नसावे!