नवी मराठी अकादमी सर्वसमावेशक

0
100

अस्थायी समितीच्या बैठकीत ग्वाही; जनतेला आवाहन
गोवा सरकारच्या वतीने स्थापन करण्यात येत असलेली गोवा मराठी अकादमी जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यामध्ये सर्व मराठीप्रेमींना स्थान असेल अशी ग्वाही गोवा मराठी अकादमीच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल गजानन सामंत यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना दिली.
अकादमीच्या कार्याचे तालुका स्तरावर विकेंद्रीकरण केले जाईल, गावागावांतील व्रतस्थ मराठी कार्यकर्त्यांना एकत्र आणले जाईल आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेले विविधांगी उपक्रम राबविले जातील अशा प्रकारे नव्या मराठी अकादमीची घटना बनवली जाईल असे त्यांनी सांगितले. मराठी अकादमीच्या या प्रस्तावित घटनेसंदर्भात मराठीप्रेमींनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात सेरारीरींहळ.सारळश्र.लेा या ईमेल पत्त्यावर किंवा समितीकडे पाठवाव्यात असे आवाहन श्री. सामंत यांनी यावेळी केले. आजवर ज्यांनी ज्यांनी मराठीसाठी योगदान दिलेले आहे, अशा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांशीही विचारविनिमय केला जाईल व मराठीचा झेंडा गोव्यात फडकत ठेवला जाईल, असे प्रा. सामंत म्हणाले.
या बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीत विद्यमान गोमंतक मराठी अकादमीच्या सदस्यांना नव्या अकादमीत सामावून कसे घेता येईल यासंबंधीही चर्चा झाली. अस्थायी समितीची पुढील बैठक नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीला अस्थायी समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, उपाध्यक्ष अशोक नाईक तुयेकर, सदस्य सर्वश्री चंद्रकांत महादेव गावस, दशरथ परब, जनार्दन वेर्लेकर, परेश प्रभू, सागर जावडेकर, पौर्णिमा केरकर, वल्लभ केळकर, तुषार टोपले, आनंद मयेकर, गजानन मांद्रेकर यांची उपस्थिती होती.