नवीन वर्षा, तुझ्या स्वागता..

0
400

गतसालाचे स्मरण जागता
दाटुन येते मनामध्ये भय
पान नवे हे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय…
कवयित्री शांताबाई शेळक्यांनी आपल्या कवितेत विचारलेला हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक नववर्षाच्या सुरवातीला नक्कीच येत असतो. नववर्षाच्या ताटामध्ये काय वाढले असेल याचे कुतूहल, उत्सुकता बाळगून आणि सरत्या वर्षासरशी मिटलेल्या पानातल्या कटुगोड आठवणी, विषाद मागे ठेवून नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सज्ज होत असतो. आम्ही दरवर्षी आपल्या भारतीय परंपरेनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ मानत आलो आहोत, परंतु यंदा इंग्रजी नववर्षाचा हा प्रारंभ केवळ नव्या वर्षाचा प्रारंभ नाही. एकविसाव्या शतकातील एका दशकाचेही हे समाप्ती वर्ष आहे आणि हाच सन २०२० नजरेसमोर ठेवून आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी भारतापुढे एक भव्योदात्त स्वप्न ठेवले होते, जे आजही दुर्दैवाने अपुरेच राहिले आहे. भारताचे अंगभूत सामर्थ्य असलेल्या पाच क्षेत्रांचा विकास कलाम यांनी अपेक्षिला होता. शेती व अन्न प्रक्रिया, साधनसामुग्री आणि ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि संरक्षण तंत्रज्ञान या पाचही क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करून आणि विकास साधून देशाला एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प त्यांनी देशाला सोडायला लावला होता. गेल्या दशकामध्ये त्या दिशेने काम झाले नाही असे नाही, परंतु जी अंतिम उद्दिष्ट्ये त्यांनी समोर ठेवलेली होती, तेथवर आपण अजूनही पोहोचू शकलेलो नाही हे वास्तव आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी मिटवण्यापासून गरीबी निर्मुलनापर्यंत आणि शेती – उद्योग – सेवा क्षेत्राच्या समन्वयापासून सर्वांपर्यंत शिक्षण व मूल्यशिक्षण पोहोचविण्यापर्यंत जी नानाविध स्वप्ने कलाम यांच्यासारख्या द्रष्ट्या नेतृत्वाने आपल्या समोर ठेवली, तेथवर आपण खरेच पोहोचलो का? याचे उत्तर नकारार्थीच येते. गेल्या दशकाचा विचार केला तर जागतिक पातळीवर हे एक वादळी दशक ठरले. अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्वत्र राष्ट्रीयत्वाला प्राधान्य देण्याचा विचार बळावत गेला. अरब जगतामध्ये लिबिया, ईजिप्त, येमेन असे ठिकठिकाणी हुकूमशाही राजवटींविरुद्ध उठाव झाले, युरोपीय महासंघाचे एकजुटीचे स्वप्न पाहिले गेले आणि भंगतही गेले, पूर्वेकडील हॉंगकॉंगमध्ये लोकशाही प्रस्थापनेसाठी चीनविरुद्ध आजही जनआंदोलन चालले आहे, खुद्द भारतामध्ये भ्रष्टाचार, विदेशातील काळा पैसा आदी विषयांवरून जनआंदोलने उभी राहिली आणि लयालाही गेली, काश्मीरचे ३७० कलम, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, अयोध्या, शबरीमला अशा नानाविध विषयांनी हे सरते वर्षही तापले. महिला सुरक्षेच्या विषयातही आपण अपयशीच ठरलो. एकूणच हे दशक अस्वस्थतेचे दशक राहिले. जनतेच्या हाती या दशकाने एक अस्त्र दिले ते म्हणजे समाजमाध्यमांचे. त्याने या बर्‍यावाईट उठावांना बळ दिले. आज कोणतेही आंदोलन चिरडायचे असेल तर पहिला घाला या समाजमाध्यमांवर पडतो तो त्यामुळेच. कोणतीही गोष्ट जेव्हा वर जाते तेव्हा ती तितक्याच वेगाने खाली येण्याचा अधिक धोका असतो. समाजमाध्यमांच्या बाबतीतही आज हेच घडू लागले आहे. त्यांचा चाललेला दुरुपयोग पाहिला तर माणसे जेवढ्या असोशीने त्यांच्याद्वारे जोडली गेली आहेत, तेवढीच ती त्यापासून दूरही होऊ लागतील. आज जे आहे त्याची जागा दुसरे काही तरी घेईल. तंत्रज्ञानाचा वारू तर भरधाव दौडत चालला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परवलीचा शब्द आहे. मानवी मेंदूच्या कैक पट वेगाने विचार, विश्लेषण करण्याची, अन्वयार्थ काढण्याची ही प्रचंड क्षमता येणार्‍या कालखंडामध्ये काय काय किमया घडवील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. नवे दशक अधिक तंत्रसमृद्ध असेल यात शंकाच नाही, परंतु मानवी जीवनमूल्यांचा र्‍हास तर अधिक गतिमान होणार नाही ना हाही प्रश्‍न अनाठायी ठरणारा नाही. दहशतवादाचे सावट गत दशकावर राहिले. हळूहळू त्याचे सावट विरळ होत चालल्याचेही दिसले. अल कायदाचा नायनाट झाला. आयसिसचे थैमान थोपवण्यात सध्या तरी यश आले आहे. परंतु धोका टळलेला नाही. नवे राक्षस निर्माण होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. त्यांना खतपाणी घालणारे विषयही सतत ऐरणीवर येतच राहिले आहेत. जग बदलते आहे आणि बदलत जाणार आहे. नवे दशक, नवे वर्ष हा केवळ या स्थित्यंतरातला एक चुकार थांबा असतो. शेवटी शांताबाई म्हणतातच ना,
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू
नववर्षाला, सन २०२० ला कवेत घेण्यास सज्ज होऊया. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!