नवीन प्रादेशिक पक्ष काढण्याचा विचार

0
296

>> माजी आमदार किरण कांदोळकर : पक्षीय राजकारणाला कंटाळून निर्णय

केंद्रीय पक्षाच्या राजकारणाला आपण विटलेलो असून आता एका प्रादेशिक पक्षाची स्थापना करण्याचा विचार असल्याचे काल भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले.

मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यापासून त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे संबंध दुरावल्यासारखे झाले होते आणि म्हणूनच आपण त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांची भेट घेतल्याचे त्यांनी या मुलाखतीतून बोलताना स्पष्ट केले. उत्पल पर्रीकर यांच्यामध्ये आपणाला त्यांचे वडिल व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची छबी दिसत असून ते गोव्याच्या राजकारणात चांगले काम करू शकणार असल्याने त्यांनी आता सक्रीय राजकारणात प्रवेश करावा, अशी सूचना आपण त्यांना या भेटीच्या वेळी केल्याचे कांदोळकर म्हणाले. काही नेते पर्रीकर यांना दूर ठेवू पाहत आहेत, असे सांगून त्यांच्याशी आपण सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी व कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा केल्याचे ते म्हणाले. त्यांनी माझी भेट घेतली याचा अर्थ मी स्थापन करणार असलेल्या राजकीय पक्षात ते प्रवेश करतील असा कुणी अर्थ काढू नये. असे सांगतानाच भविष्यातही आम्ही एकमेकांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपवर कायम निष्ठा असेल : उत्पल पर्रीकर

भाजपविषयीच्या आपल्या निष्ठेविषयी कुणीही संशय घेण्याचे कारण नसल्याचे काल उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

उत्पल पर्रीकर यांनी नुकतीच भाजपचे नेते किरण कांदोळकर यांची भेट घेतल्याने चर्चेला उत आल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी काल वरील मत व्यक्त केले. कांदोळकर यांनी भेटण्यास बोलावले होते. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली. त्या भेटीमागे राजकारण नव्हते, असा खुलासाही पर्रीकर यांनी केला. य भेटीमागे लपवून ठेवण्यासारखे काही असते तर आपण कांदोळकर यांच्याबरोबर भेटीचे छायाचित्र टिपू दिले नसते किंवा अत्यंत गुप्तरित्या त्यांची भेट घेतली असती.
असेही ते म्हणाले. आपल्या वडिलांनी ज्या नेत्यांना एकत्र आणून पक्ष बळकट केला त्यापैकी कांदोळकर हे एक होते. त्याचमुळे त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण त्यांची भेट घेतल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. माझ्या निष्ठेविषयी कुणी शंका घेण्याची गरज नाही. मी माझ्या वडिलांच्या तत्त्वांचे पालन करणार आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले.