नवीन पीडीए स्थापन करणे राज्याच्या हिताविरोधात : कॉंग्रेस

0
107

नवीन मल्टी पीडीए स्थापन करणे राज्याच्या हिताचे नाही, असे मत गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केले.
उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाची प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नवीन पीडीए स्थापन करण्यास मान्यता देणार नाही, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. परंतु, राजकीय दबावाखाली नवीन पीडीएला मान्यता दिली जाऊ शकते असे ते म्हणाले. नवीन पीडीए स्थापनेच्या प्रस्तावाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले आहे. आपण नगर नियोजन विविध कायद्याचे संकलन केले आहे. यात कायदे व नियमांचा समावेश आहे. तसेच सभागृहात विधेयकावर झालेल्या चर्चेला समावेश आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

संरक्षण मंत्रालय गोव्यातील पंचायत व नगरपालिकांमधील बांधकाम कायदे मानत नाही, असा आरोप माजी राज्यसभा खासदार नाईक यांनी केला. राज्यसभा खासदार कार्यकाळात याबाबतचा एक प्रश्‍न राज्यसभा सभागृहात विचारला होता. राज्यसभा सचिवांना या प्रश्‍नाचे लेखी उत्तर १० जानेवारी २०१७ रोजी पाठविले आहे असे त्यांनी सांगितले. नाविक दलाच्या बांधकामांसाठी राज्य सरकारच्या पंचायत आणि नगरपालिका कायद्याखाली परवानगी घेण्याची गरज नाही, असे उत्तरात म्हटले आहे. नाविक दल बांधकामासाठी गोव्यातील जमीन बळकावत आहे. तसेच येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांना आव्हान देत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या बांधकाम प्रकल्पाचा आढावा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असेही नाईक यांनी सांगितले.